computer

जगाला हादरवून टाकणारे ५ अतिभयंकर अणुअपघात !!!

मंडळी, आज जगातला सर्वश्रेष्ठ ऊर्जास्त्रोत म्हणजे अणूऊर्जा. आज प्रत्येक देशाने ठिकठिकाणी अणूऊर्जाकेंद्रं उभारली आहेत. आता काही देश त्यांचा उपयोग त्यांच्या विकासासाठी करतात तर काहीजण राष्ट्रीय सुरक्षेच्या नावाखाली महाभयंकर अण्वस्त्रं तयार करतात, ही बाब वेगळी!! पण काहीवेळा अणूऊर्जाकेंद्रांमधे काही तांत्रिक बिघाड होतात, आणि ह्या सगळ्याचं रूपांतर अतिविध्वंसक अशा आण्विक अपघातात (Nuclear Accidents) होतं. आत्ता एचबीओ आणि हॉटस्टारवर प्रसिद्ध झालेली चेर्नोबिल ही सीरीज चेर्नोबिलच्या आण्विक अपघातावर आधारित आहे, हे आपल्याला सगळ्यांना माहीत आहेच. पण असे अनेक प्रकार जगाच्या विविध भागात घडत असतात. इंटरनॅशनल ॲटोमिक एनर्जी एजन्सीने (International Atomic Energy Agency) ठरवून दिलेल्या INES ह्या स्केलच्या आधारे आण्विक अपघातांची तीव्रता मोजली जाते. अशा टॉप ५ विध्वंसक आण्विक अपघातांची माहिती घेऊया आजच्या लेखात....

१) चेर्नोबिल, युक्रेन

आत्ता जरी हे ठिकाण युक्रेनमधे असलं तरी जेव्हा हा अपघात घडला तेव्हा ते सोव्हिएट युनियनमधे होतं. हा अपघात जगातला सर्वात विध्वंसक आण्विक अपघात आहे. रिअॅक्टर सिस्टीम चाचणी दरम्यान तांत्रिक बिघाडामुळे हा अपघात घडून आला. ह्या आण्विक अपघातामुळे इतका किरणोत्सर्ग झाला, की सर्व रहिवाशांना तिथून ताबडतोब हलवण्यात आलं. तरीही थेट किरणोत्सर्गामुळे ३१ लोकांचा मृत्यू झाला. तसंच २,००,००० लोक निर्वासित झाले ते वेगळंच!! INES स्केलच्या अनुसार ह्या अणुअपघाताची तीव्रता लेव्हल ७ म्हणजे सर्वोच्च ठरवण्यात आली!

२) फुकुशिमा दाईची, जपान

हा जगातील मोठ्या अणुअपघातांपैकी एक मानला जातो. हा अपघात एवढा मोठा होता, की ह्या स्फोटानंतर एक जोरदार भूकंप आणि एक १५ मीटरची त्सुनामी उत्पन्न झाली आणि त्यामुळे १६०० नागरिकांचा मृत्यू झाला!! INES स्केलच्या अनुसार प्रचंड किरणोत्सर्गामुळे ह्या अणुअपघाताची तीव्रता लेव्हल ७ एवढी ठरवण्यात आली होती.

३) थ्री माईल आयलंड, यूएसए

१९७८ साली घडलेला हा अपघात म्हणजे अमेरिकेच्या इतिहासातील एक वाईट घटना म्हणून नोंदवण्यात येते. पेनसिल्व्हेनिया इथे झालेल्या ह्या अपघातात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. तसंच किरणोत्सर्गही अत्यंत कमी झाल्याने संभाव्य धोक्यांचं प्रमाण कमी झालं. पण अमेरिकेचं अॅटोमिक सिक्रेट मात्र फुटलं ना राव!!!

४) किस्टीम, सोव्हिएट युनियन

१९५७ साली न्यूक्लिअर प्लॅंटमधल्या कूलिंग सिस्टीममधे बिघाड झाल्याने रासायनिक स्फोट झाला आणि हा भयंकर अणूअपघात घडून आला. ह्या स्फोटाने ७०-८० टन किरणोत्सर्गी पदार्थ हवेत फेकले गेले आणि परिणामी ३०० लोक किरणोत्सर्गाने विषबाधा होऊन मेले!!! INES स्केलनुसार ह्या अणूअपघाताची तीव्रता लेव्हल ६ एवढी ठरवण्यात आली होती.

५) विंडस्केल, इंग्लंड

विंडस्केल इथे बांधलेलं हे अणुऊर्जाकेंद्र ब्रिटीश युद्धोत्तर अॅटोमिक बॉम्ब प्रकल्पाचा (British post-war atomic bomb project) भाग होतं. १९५७ साली इथल्या ग्रॅफाइट-कोअर रिअॅक्टरला आग लागल्यामुळे मोठ्या प्रमाणात किरणोत्सर्ग घडून आला. तसंच किरणोत्सर्गाने २०० लोकांना कॅन्सर झाल्याचं आढळून आलं. नंतर तो रिअॅक्टर गाडून टाकण्यात आला. INES स्केलनुसार ह्या अणुअपघाताची तीव्रता लेव्हल ५ एवढी ठरवण्यात आली होती.

तर मंडळी, ह्या भयानक आण्विक अपघातांविषयी तुमचं काय मत आहे ते आम्हाला जरूर कळवा!!

 

लेखक : प्रथमेश बिवलकर.

 

आणखी वाचा : 

जादूगुडातील किरणोत्सर्गाचे बळी...वाचा भारताच्या युरेनियम खाणीचे काळे सत्य !!

ही आहे तब्बल २०,००० वर्षांसाठी बंद असलेली जागा....या जागी नेमकं काय घडलं होतं ?

सबस्क्राईब करा

* indicates required