computer

चक्क मोबाईल कॅमेऱ्याने चंद्र आणि शनीचा फोटो घेतला ? कसं शक्य झालं हे ?

२९ मार्च रोजी चंद्र आणि शनी अशा स्थितीत होते की बघणाऱ्याला वाटेल की दोन्ही ग्रह एकमेकांना कधीही धडक देतील. हा क्षण चक्क Samsung Galaxy S8 फोनच्या कॅमेऱ्याने टिपण्यात आलाय असं जर सांगितलं तर तुम्हाला विश्वास बसेल का ? नाहीच बसणार. पण हा चमत्कार खरोखर घडलाय.

हे भन्नाट काम केलं आहे खगोलशास्त्रज्ञ ग्रँट पीटरसन यांनी. साऊथ आफ्रिका येथून त्यांनी हा क्षण टिपला आहे. यासाठी त्यांनी एका अत्याधुनिक दुर्बिणीसोबत Samsung Galaxy S8 फोन जोडला होता. तुम्ही पाहत असलेला फोटो हा पीटरसन यांनी टिपलेल्या अनेक फोटोंनी मिळून बनला आहे. हे फोटो अगदी वेळेवर घेतले गेले आहेत. बरोबर वेळ साधली नसती तर लवकरच शनी चंद्राच्या मागे गडप झाला असता.

पीटरसन यांना असे दुर्मिळ क्षण टिपायला आवडतात. चंद्र आणि शनीच्या संयोगाची ते जानेवारी पासून वाट पाहत होते. २९ मार्च रोजी जेव्हा अखेर तो क्षण आला त्याच्या आदल्या दिवशी साऊथ आफ्रिकेत पाऊस पडला होता आणि वातावरण ढगाळ होतं. त्यांना असं वाटलं की आपल्या सगळ्या योजनेवर पाऊस पडला. सुदैवाने २९ तारखेला आकाश स्वच्छ होतं.

मंडळी, सकाळी ४ वाजता उठून त्यांनी सर्व तयारी केली. २ तासांनी जेव्हा तो क्षण आला तेव्हा त्यांनी दर सेकंदाला ६० फ्रेम्स या पद्धतीने फोटो घेतले. नंतर या सर्व फोटोजन स्टॅकिंग तंत्रज्ञानाने एकत्र जोडलं. स्टॅकिंग तंत्रज्ञान वेगवेगळ्या फोटोंना एकत्र जोडून चांगल्या दर्ज्याची एकच एक इमेज तयार करण्यासाठी वापरलं जातं.

मंडळी, आपण फोटोत जो क्षण पाहत आहोत त्याला म्हणतात conjunction. म्हणजे शुद्ध मराठीत ‘संयोग’. हे कंजक्षन केवळ एक प्रकारचा दृष्टिभ्रम असतो. दोन ग्रह खरोखरचे एकत्र येत नसतात. बऱ्याचदा कंजक्षन हे चंद्र आणि इतर ग्रहांच्या बाबतीत होत असतं. असे क्षण या पूर्वी पण येऊन गेले आहेत.

तर मंडळी, एका साध्या फोनने पण काय कमाल होऊ शकते त्याचं उदाहरण आपल्या सामोरच आहे.

सबस्क्राईब करा

* indicates required