f
computer

फळांवर फवारणी केलेले किटकनाशक घालवायचा हा सर्वोत्तम उपाय आहे !!

बाजरातून आणलेल्या फळांवर व भाज्यांवर हानिकारक घटकांचा एक थर असतो. यात कीटकनाशक, धूळ तसेच जीवाणू सुद्धा असू शकतात. त्यामुळे अन्नपदार्थ न धुता तशीच पोटात गेल्यास पोटाचे विकार होण्याची शक्यता असते. आता यावर घरगुती उपाय म्हणजे फळे आणि भाज्या धुवून खावेत. पण राव फक्त धुतल्याने फळांवरची धूळ, कीटकनाशक आणि जीवाणू साफ होतात का ? याचं उत्तर विज्ञानाने शोधून काढलंय राव.

नवीन वैज्ञानिक प्रयोगातून फळे आणि भाज्या धुण्याच्या पद्धतीचा अभ्यास करण्यात आला आहे. या परीक्षणात विविध पद्धतींचा अभ्यास केला गेला आणि त्यांचा परिणाम तपासला गेला. यात सर्वोत्तम कोणता पर्याय ठरला...चला बघूया....

१. पाणी

फळे-भाज्या धुण्यासाठी पाण्याचा वापर हा योग्य असला तरी तो परिपूर्ण नसतो. पाणी फक्त २०% कीटकनाशक साफ करू शकतं. हे पाणी सुद्धा फिल्टर केलेलं असणं गरजेचं असतं. फिल्टर केलेल्या पाण्यात फळे भाज्या थोड्यावेळ भिजत ठेवल्यास जास्त फायदा होऊ शकतो.

२. साबण

अन्नपदार्थ खास करून फळे धुण्यासाठी काहीजण साबण वापरतात. साबणाने कीटकनाशक आणि धूळ जास्त प्रभावीपणे साफ होऊ शकते पण फळांच्या आत साबणातील रसायनांचा शिरकाव सुद्धा होऊ शकतो. त्यामुळे साबण हा पर्याय पूर्णपणे बाद होतो.

३. फळे आणि भाज्या धुण्याचं प्रोडक्ट

बाजारात अन्नपदार्थ धुण्यासाठी एकप्रकारचं प्रोडक्ट मिळतं. या प्रोडक्टने फळे आणि भाज्या चुटकीसरशी साफ होतात असा दावा केला जातो. खरं तर फिल्टर केलेल्या पाण्यात अन्नपदार्थ धुतल्याने जो फायदा होतो तोच फायदा या प्रोडक्टने होतो. मग कशाला पैसे घालवायचे राव ? म्हणजे हा पर्याय सुद्धा बाद.

४. व्हिनेगर

व्हिनेगरच्या वापराने अन्नपदार्थ जवळजवळ ९४ टक्के साफ होतात हे संशोधनातून सिद्ध झालं आहे. अन्नपदार्थ धुण्यासाठी व्हिनेगर नक्कीच चांगला पर्याय असू शकतो. यासाठी तुम्ही एक स्प्रे सुद्धा तयार करू शकता. या स्प्रेचे चार भाग करा. तीन भागात पाणी आणि एका भागात व्हिनेगर एकत्र करून त्याचा वापर करता येऊ शकतो.

५. बेकिंग सोडा

वरच्या चारही उपायांपेक्षा बेकिंग सोडाचा पर्याय सर्वात जास्त प्रभावी आहे. मॅसेच्युसेट्स विद्यापीठातील संशोधकांनी आपल्या अहवालात ही माहिती दिली आहे. पाण्यात बेकिंग सोडा मिसळून त्यात फळे धुतल्यास जवळजवळ १००% हानिकारक घटक साफ होतात. बेकिंग सोडामुळे हे काम फक्त १५ मिनिटात होतं.

 

मंडळी, एवढी खबरदारी घेऊन सुद्धा कीटकनाशके अन्नपदार्थांच्या आत प्रवेश करू शकतात तेव्हा भाज्या किंवा फळभाज्या शिजवून घेणे हा सर्वात चांगला पर्याय असू शकतो. फळांच्या बाबतीत फळे सोलून खाणे हा योग्य पर्याय असू शकतो. ही खबरदारी ऑरगॅनिक फुडच्या बाबतीतही घ्यायला हवी. कारण ऑरगॅनिक पद्धतीने पिक घेताना सुद्धा कीटकनाशक वापरलेली असू शकतात. 

सबस्क्राईब करा

* indicates required