computer

अ‍ॅमेझॉन खोर्‍यातल्या अनेक चमत्कारापैकी एक : उकळत्या पाण्याची नदी

आपल्याकडे वज्रेश्वरी, गणेशपुरी, अकलोळीसारख्या ठिकाणी गरम पाण्याचे कुंड असल्याचे तुम्ही ऐकून असाल. काही लोक तर प्रत्यक्ष बघूनही आले असतील. पण कधी संपूर्ण नदीचंच पाणी गरम असल्याचं ऐकलं आहे का? खरेतर अशा काही नद्या जगभरात आढळतात. आज आपण अशाच एका नदीबद्दल जाणून घेणार आहोत.
ही नदी दक्षिण अमेरिकेतल्या परू(पेरु) देशातल्या Mayantuyocu भागात आहे. अमेझॉनच्या घनदाट जंगलातून ही नदी वाहते. ह्या नदीचं पाणी एवढं उष्ण आहे की ते अक्षरशः उकळतं. अचूक सांगायचं झालं तर नदीचं साधारण तापमान ५० ते ९० डिग्री सेंटीग्रेड एवढं असतं. काही वेळा हे तापमान १०० डिग्री सेंटीग्रेडपर्यंतही जातं. अमेझॉनच्या जंगलात अशा प्रकारचे गरम पाण्याचे स्त्रोत तज्ञांनी शोधून काढले आहेत, पण एवढ्या प्रचंड प्रमाणातील गरम पाण्याचा स्रोत सापडला नव्हता.
या नदीला तसं नाव नाही, पण स्थानिक लोक या नदीला shanya timpishka म्हणतात. याचा अर्थ होतो सूर्याच्या दाहकतेने उष्ण झालेल्या पाण्याची नदी. स्थानिक लोकांमध्ये पसरलेल्या एका दंतकथेनुसार एक सापाच्या आकाराची देवता हे गरम पाणी नदीत सोडत असते. या नदीची खोली म्हणाल तर ती ६ मीटर आहे आणि रुंदी २५ मीटर. लांबीला ती ६.४ किलोमीटर लांब आहे. या पाण्याच्या उष्णतेमुळे अनेक जनावरं या नदीत पडून मरण पावली आहेत.

नदीबद्दल जाणून घेतल्यानंतर आता वळूया नदीच्या शोधाबद्दल...

नदीचा शोध कसा लागला ही गोष्टही रोचक आहे. अनेक वर्षांपासून अशा एखाद्या नदीची दंतकथा प्रसिद्ध होती. पण शास्त्रज्ञांना त्यावर विश्वास नव्हता. याचे कारण म्हणजे पाण्याची उष्णता वाढवण्यासाठी जी उर्जा लागते ती या नदीच्या जवळपास कुठेच आढळत नाही. जवळपास ज्वालामुखी असेल तर नदीचं पाणी उष्ण होऊ शकतं, पण या नदीच्या जवळपास असलेला ज्वालामुखी ४०० मैल लांब आहे. त्यामुळे ज्वालामुखीच्या उष्णतेने नदीचं पाणी उष्ण होण्याची शक्यताच संपते. ही दंतकथा इतर कोणत्याही शास्त्रज्ञाच्या कानावर पडेल तशी अमेरिकेच्या एका शास्त्रज्ञानाच्या कानावर पडली होती. हा शास्त्रज्ञ म्हणजे आंद्रेस रुझो. आंद्रेस हे जिओथर्मल वैज्ञानिक आहेत. आंद्रेस यांना आपल्या आजोबांकडून नदीची गोष्ट ऐकायला मिळाली होती. आजोबांच्या मते एक स्पानिश टोळी सोन्याच्या शोधात अमेझॉन जंगलाच्या अति दुर्गम भागात गेली होती. तिथे त्यांना ही नदी आढळली. या टोळीतील लोकांनी सांगितलेल्या गोष्टी कोणत्याही दंतकथेला शोभतील अशाच होत्या. त्यांच्या मते या घनदाट जंगलात विषारी पाणी, अनेक रोगराया, माणसांना खाणारे साप आणि उकळत्या पाण्याची नदी आहे.

इतर कोणीही विश्वास ठेवला नसला तरी आंद्रेस यांनी या नदीच्या कथेवर विश्वास ठेवला. कारण त्यांना समजले की खुद्द त्यांची आत्त्याच ही नदी पाहून आली आहे.
आंद्रेस यांनी या नदीवर The Boiling River: Adventure and Discovery in the Amazon हे पुस्तक लिहिले आहे. ते नदीवर अभ्यासही करत आहेत. त्यांना वाटते की या उकळत्या नदीतही काही जीव राहत असावेत. यासाठी ते सूक्ष्मजीवांवर अभ्यास करणाऱ्या शास्त्रज्ञांसोबत काम करत आहेत.

आता तुम्ही म्हणाल की एवढं सगळं सांगितलं, पण नदीचं पाणी उष्ण का आहे हे नाही सांगितलं. त्याचं उत्तर असं की शास्त्रज्ञांच्या मते ह्या नदीचा स्रोत हा पृथ्वीच्या आतील आवरणाच्या जवळ असल्याने नदीचं पाणी उष्ण आहे. खरे तर नदीच्या तळाशी असलेलं तापमान प्रचंड मोठ्या प्रमाणात असण्याची शक्यता आहे.
अमेझॉनमध्ये पडत असलेल्या पावसाचे पाणी जमिनीत मुरून ते अत्याधिक खोलवर जात असावे असा एक अंदाज बांधण्यात आला आहे. हे पाणी पृथ्वीच्या आतील आवरणाच्या जवळ जाऊन पोचते. तिथे असलेल्या लाव्हारसामुळे पाण्याची उष्णता वाढते. हेच पाणी वरच्या भागातील पाण्याची उष्णता वाढवते.

तर, अमेझॉनच्या जंगलात असलेल्या अनेक विचित्र आणि जगावेगळ्या गोष्टींपैकी ही एक नदी आहे. अमेझॉनच्या जंगलात असलेल्या अशाच काही रोचक गोष्टी आम्ही तुमच्या समोर आणू. तूर्तास हा लेख आवडला असेल तर शेअर करायला विसरू नका.

सबस्क्राईब करा

* indicates required