computer

भारतीय विद्यार्थी रशिया-युक्रेनला शिकायला का जातात हे आधी समजून घ्या!!

युक्रेनमधून अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांच्या बातम्या रोज येत आहेत. सरकार त्यांची सुटका करण्याचा प्रयत्न करत आहे. काही प्रमाणात त्याला यशही मिळालं आहे. पण तरी परिस्थिती गंभीरच आहे. एकीकडे मुलांची सुटका झाली याबद्दल आनंद व्यक्त होत आहे, तर दुसरीकडे ही मुलं तिकडे गेलीच कशाला? इकडे शिक्षण घेता येत नाही का? मोठ्या बापाची पोरं, स्वतःच्या मर्जीने गेली तर आता परत आणायचा खर्च सरकारने का उचलावा? आधी कल्पना दिली होती, तेव्हा परत यायला काय झालं होतं? अशा अनेक प्रतिक्रिया येत आहेत. या प्रतिक्रिया योग्य की अयोग्य हा बोभाटाचा विषय नाही. पण युक्रेनसारख्या दूरदेशात ही मुलं का जातात हे समजून घेण्याची मात्र हीच वेळ आहे. हा विषय शक्य तितक्या सोप्या रितीने आज आपण समजून घेऊ.

चांगल्या मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश मिळवणं हा दरवर्षी हजारो विद्यार्थ्यांपुढचा प्रश्न असतो. भारतामध्ये तर सरकारी मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश मिळणं महाकठीण. त्यासाठी फार थोडे विद्यार्थी पात्र ठरतात. त्यामुळे बरेच विद्यार्थी खाजगी महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेऊन डॉक्टर व्हायची स्वप्नं पाहतात. पण या खाजगी वैद्यकीय महाविद्यालयांचं प्रकरणही सोपं नाही. त्यांची भूक मोठी असते. इथली अव्वाच्या सव्वा फी सगळ्यांना परवडतेच असं नाही. मग थोड्याशा गुणांनी नीट हुकलेल्यांनी आणि कोट्यवधी रुपये जवळ नसलेल्यांनी काय करायचं? त्यांच्यासाठी परदेशातल्या मेडिकल कॉलेजचा पर्याय आहे. तोही कमी खर्चात. थोडक्यात, भारतातल्या वैद्यकीय महाविद्यालयांच्या तुलनेत परदेशातल्या वैद्यकीय महाविद्यालयांची फी बरीच कमी आहे, हे तिकडे जाण्याचं मुख्य कारण.

आजकाल बरेच देश वाजवी फीमध्ये उच्च दर्जाचं वैद्यकीय शिक्षण पुरवतात. भारताव्यतिरिक्त नेपाळ, चीन, बांग्लादेश या देशातले विद्यार्थीही या परदेशी विद्यापीठांमध्ये वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी जातात. रशिया, युक्रेन, जर्मनी हे देश रास्त दरात उच्च दर्जाचं वैद्यकीय शिक्षण देण्यात आघाडीवर आहेत. या देशांमध्ये शिकवला जाणारा वैद्यकीय अभ्यासक्रम जागतिक दर्जाचा आहे. या विद्यापीठांना डब्ल्यूएचओची मान्यता आहे. शिवाय त्यांना मेडिकल कौन्सिल ऑफ इंडियाचीही मान्यता आहे.
इथला अभ्यासक्रम खिशाला परवडणारा तर आहेच, पण या शिक्षणाचा दर्जाही चांगला आहे. शिवाय परदेशी विद्यापीठांमध्ये प्रवेश घेण्याची प्रक्रिया अतिशय साधीसोपी, सरळ आहे. या प्रवेशासाठी टोफेल किंवा आयईएलटीएस यासारखी कोणतीही प्रवेश परीक्षा द्यावी लागत नाही. अर्थात हे शिक्षण घेऊन भारतात परत आल्यावर या विद्यार्थ्यांना इथे एक प्रवेश परीक्षा द्यावी लागते आणि त्यात उत्तीर्ण झालं तरच भारतात प्रॅक्टिस करण्याचे दरवाजे खुले होतात.

आता परदेशात शिक्षण घेण्याचे कोणकोणते फायदे आहेत ते पाहू.
१. परवडणाऱ्या दरात एमबीबीएस होता येतं.
परदेशात एमबीबीएसच्या शिक्षणासाठी केवळ १५ ते २५ लाख रुपये एवढा खर्च येतो, जो भारताच्या तुलनेत बराच कमी आहे.

२. डोनेशन किंवा कॅपिटेशन फीची गरज नसते.
भारतात वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी बऱ्याचदा विद्यार्थ्यांना भरपूर डोनेशन किंवा कॅपिटेशन फी द्यावी लागते. याशिवाय वर्षभराची ट्युशन फी भरावी लागते ती वेगळीच. परदेशात मात्र असं नाही. रशिया, युक्रेन, किरगिझस्तान, चीन यांसारख्या देशांमध्ये डोनेशन किंवा कॅपिटेशन फी आकारली जात नाही.

३. प्रवेश घेण्यासाठी प्रवेश परीक्षेची गरज नसते.
परदेशात वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी कमीत कमी ५० टक्के गुणांसह फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी हे विषय घेऊन बारावी उत्तीर्ण असणं गरजेचं असतं. बाकी त्यांना कोणतीही प्रवेश परीक्षा द्यावी लागत नाही.

४. परदेशात राहणीमानाचा खर्च कमी आहे.
वैद्यकीय शिक्षण देऊ करणारे बहुसंख्य देश युरोपात येतात आणि तिथे राहणीमानाचा खर्च बराच कमी आहे. अगदी रशियाचं उदाहरण घेतलं, तर साधारण दीडशे डॉलर्समध्ये पूर्ण महिन्याचा खर्च निघू शकतो. अर्थात हे त्या त्या विद्यार्थ्याच्या वैयक्तिक सवयी, आवडीनिवडी यावरही अवलंबून असतं.

५. परदेशी वैद्यकीय महाविद्यालयात जागतिक दर्जाचे इन्फ्रास्ट्रक्चर आणि सुविधा आहेत.
हाही एक महत्त्वाचा मुद्दा आहे. परदेशातली बहुतेक विद्यापीठं आपल्या विद्यार्थ्यांना उच्च दर्जाच्या सुविधा देतात. यामध्ये अद्ययावत उपकरणं, प्रयोगशाळा, लायब्ररी यासारख्या सुविधांचा समावेश होतो.

६. आंतरराष्ट्रीय बाबींशी ओळख होते.
परदेशातल्या वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये भारतीय विद्यार्थ्यांप्रमाणेच इतर देशांमधलेही विद्यार्थी असतात. त्यामुळे विविध देशांच्या संस्कृती आणि वैद्यकीय पार्श्वभूमीची ओळख होते. याचा फायदा परदेशात स्थिर होऊन वैद्यकीय प्रॅक्टिस करू पाहणाऱ्या विद्यार्थ्यांना नक्कीच होतो.

७. कोणताही देश असला तरी शिकवण्याचं माध्यम इंग्रजी असतं.
याचाही भारतीय विद्यार्थ्यांना बराच फायदा होतो. त्यांना त्या देशाची भाषा शिकावी लागत नाही. अर्थात तिथली स्थानिक भाषा शिकून घेण्याचे वेगळे फायदे असतात. पण ती येत नसेल तरीही त्यावाचून वैद्यकीय शिक्षण अडत नाही.

८. परदेशातही उत्तम दर्जाच्या हॉस्टेलची सोय असते.
परदेशात सर्व वैद्यकीय महाविद्यालयं उत्तम दर्जाच्या हॉस्टेलची सुविधा पुरवतात. यापैकी अनेक ठिकाणी भारतीय पद्धतीचं जेवणही मिळतं.

आशिया खंडात असलेल्या चीन, बांगलादेश, किरगिझस्तान, कझाकिस्तान यांसारख्या देशांमध्ये वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना इतर काही फायदे मिळतात -
१. जेवण आणि राहण्याची सोय यांसह एकूण खर्च सरासरी २५ ते ३५ लाखांच्या घरात होतो.
२. यात किरगिझस्तान हे आशियाचं वैद्यकीय शिक्षणासाठीचं केंद्र आहे. इथे तर केवळ १० ते १५ लाखांत तुम्ही डॉक्टर होता.
३. बहुतेक विद्यापीठांना मेडिकल कौन्सिल ऑफ इंडियाची मान्यता आहे.
४. अनेक ठिकाणी भारतात आल्यानंतर द्यायच्या परीक्षेची तयारी करून घेतली जाते.
५. बऱ्याच विद्यापीठांत भारतीय जेवण मिळतं. याशिवाय बांगलादेश सारख्या देशाची संस्कृती आपल्यासारखीच असल्याने विद्यार्थी इथे चटकन रुळतात.

युरोपातल्या वैद्यकीय शिक्षणाचेही काही फायदे आहेत.
सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथे असलेल्या सुविधा आणि इन्फ्रास्ट्रक्चर उच्च दर्जाचं आहे. या महाविद्यालयांना संलग्न असलेल्या हॉस्पिटल्स मध्ये उत्तम दर्जाची यंत्रसामग्री असते आणि भरपूर रुग्ण हाताळायला मिळाल्याने चांगला अनुभवही मिळतो.

जोवर आपल्याकडचं वैद्यकीय शिक्षण आणि महाविद्यालयं फी, सोयीसुविधा या बाबतीत या विद्यापीठांशी बरोबरी करत नाहीत तोवर हे चित्र असंच राहणार.

स्मिता जोगळेकर

सबस्क्राईब करा

* indicates required