computer

चीनी रॉकेटच्या आधी नासाच्या स्कायलॅबने जगात कशी खळबळ माजवली होती? हे किस्से एकदा वाचाच

दोन दिवसांपूर्वी चीनचे  Long March 5B नावाचे रॉकेट अवकाशात भरकटल्याची बातमी तुम्ही वाचलीच असेल. आता हे भरकटलेले रॉकेट कुठे पडेल, कधी पडेल याची कोणालाही काही कल्पना नाही. अशा प्रकारचा हा पहिला अपघात नाही आणि शेवटचाही नसेल. अवकाशातील प्रयोगशाळा किंवा स्पेस स्टेशन असं कोसळत नाही. कारण, ते उतरवण्याची व्यवस्था (प्रोग्रॅम) निश्चित केला असतो. २००१ साली रशियाचे 'मीर' नावाचे स्पेस स्टेशन पृथ्वीवर पडले तेव्हा ते कुठे उतरवायचे हे ठरवून पृथ्वीवर उतरवण्यात आले होते.

('मीर' स्पेस स्टेशन)

पण १९७८ साली असेच एक रशियन रॉकेट अंतराळातून पृथ्वीवर कॅनडाच्या उत्तरेकडल्या पर्वतराजीत कोसळले तेव्हा मात्र ती चिंतेची बाब ठरली होती कारण त्यात किरणोत्सर्गी युरेनियम भरलेले होते. तेव्हा रशियात मिडीयाची फारशी पोहोच नसल्याने त्याचा फारसा गवगवा झाला नाही. पण १९७९ साली अमेरिकेची अंतराळातील एक प्रयोगशाळा वरून कोसळणार अशी बातमी आल्यावर काय घडले होते ते तुम्ही बाबांना किंवा घरातल्या मोठ्या पिढीला विचारा ते नक्की ती आठवण सांगतील. ही अंतराळातील प्रयोगशाळा म्हणजे 'स्कायलॅब'.

स्कायलॅब आकाशातून पडणार असं कळल्यावर भारतात त्या दिवशी बर्‍याच शाळांना सुट्टी जाहिर करण्यात आली होती. पोरांना त्या दिवशी घराबाहेर पडण्याची सक्त मनाई होती, इतकंच काय घरातून बाहेर पडलेली लोकं त्या दिवशी डोक्यावर छत्री घेऊन फिरत होती !! १२ जुलैच्या पहाटे स्कायलॅब ऑस्ट्रेलीयाच्या जवळ समुद्रात आणि काही भूभागात तुकड्यातुकड्यात पडली पण तोपर्यंत बर्‍याच गमती जगात घडल्या ! चला तर या निमित्ताने वाचू या 'स्कायलॅब' बद्दल काही गंमतीदार गोष्टी !!

पण त्याआधी थोडं 'स्कायलॅब बद्दल !

स्कायलॅब अमेरिकेची अंतराळातील पहिली प्रयोगशाळा होती. येणार्‍या भविष्यात बरेच दिवस अंतराळात वास्तव्य करून अनेक वैज्ञानीक प्रयोगांची तयारी आणि सिध्दता करणे हा स्कायलॅब अंतराळात स्थापित करण्याचा उद्देश होता. स्कायलॅब १४ मे १९७३ रोजी अंतराळात पोहचली. अंतराळवीरांच्या तीन वेगवेगळ्या टीमने या लॅबमध्ये वास्तव्य करून एकूण ३०० हून अधिक प्रयोग केले. स्कायलॅबचे उद्दीष्ट अपेक्षेपलीकडे सफल झाले.

नासाच्या अंदाजानुसार लॅब वापरणे बंद केल्यावरही ती पृथ्वीभोवती बरीच वर्षे भ्रमण करणार होती, पण १९७८ साली स्कायलॅबच्या भ्रमण काळामध्ये फरक पडायला लागून ती पृथ्वीच्या जवळ यायला सुरुवात झाली. या समस्येला कसे तोंड द्यायचे याचे उत्तर नासाकडे नव्हते. या प्रयत्नांसाठी जो खर्च लागणार होता तो सरकारकडून मान्य होईपर्यंत फार फार उशीर झाला होता. म्हणजे थोडक्यात झालं असं की, नासाने पतंग उडवला पण ती पुन्हा खाली उतरवण्याची व्यवस्थाच केली नव्हती. त्यामुळे असं समजा की पृथ्वीच्या वातावरणात एक ७०/८० टनाचा तोफेचा गोळा लटकत होता आणि तो कधी डोक्यावर पडेल याची शाश्वती नव्हती. 

इकडे अमेरिकेत काय घडत होतं ?

जून १९७९

या दरम्यान अमेरिकन जनता सरकारी कारभाराला उबगलेली होती. त्यातून लॅब डोक्यावर कोसळणार या बातमीने वैतागलेल्या लोकांनी चक्क स्कायलॅब पार्ट्या आयोजित करायला सुरुवात केली. कॅरोलीनात एका हॉटेलने 'इथेच' पडणार स्कायलॅब अशी जाहिरात करून संध्याकाळी 'पूल साइड पार्टी' सुरु केली. काही लोकांनी स्कायलॅबचे चित्र असलेले फोटो छापून टी -शर्ट बनवून विकायला सुरुवात केली. संध्याकळच्या पार्टीला या पण येताना डोक्यावर हॅट घालून या अशी निमंत्रणे देऊन पार्ट्या जोरात सुरु झाल्या. पण असं वातावरण सगळीकडे नव्हतं. काही देशात लोकं प्रचंड घाबरली होती. 

भारतात करीमनगर मध्ये तर ......

आंध्र प्रदेशातल्या करीमनगर जिल्ह्यातल्या लोकांची खात्रीच पटली होती की स्कायलॅब त्यांच्याच डोक्यावर पडणार आहे. त्यामुळे घाबरलेल्या लोकांनी रातोरात मिळेल त्या किमतीला घरं विकली. आपण मरणार आहोतच पण मुक्या जनावरांनी काय करावं या विचाराने लोकांनी त्याची दुभती जनावरं विकून टाकली. दुनिया बुडेल पण  तिरुपती किंवा काशीला काही होणार नाही अशा विचाराने श्रीमंत लोकं घरं बंद करून  तिकडे निघून गेली. ज्यांना हे काही जमलं नाही त्यांनी घरातल्या महागड्या चिजवस्तू विहिरीत टाकल्या. अशी एक ना दोन हजारो प्रकरणं झाली. 

जगायचे थोडेच् दिवस उरलेत या भावनेनं अनेकांनी हाय खाल्ली. कित्येकजण अपुऱ्या इच्छा पूर्ण करायला धडपडू लागले. कापडाचोपडाची खरेदी करू लागले कर्ज काढून मुलाबाळांना खाऊपिऊ घालू लागले. हवी ती चैन करू लागले. काहींनी नातेवाईकांसोबत पार्ट्यांचे प्लान्स आखले. ग्रामीण भागात गावजेवणाच्या पंगती उठू  लागल्या. भोजनाला जोडून कीर्तन, प्रवचनाला कार्यक्रम असायचा. गावकीत, भावकीत  झालेली भांडणं विसरून लोक एकमेकांच्या घरी मांडीला मांडी लावून जेवू लागले. अर्थात, हे सारं करण्यामागं दुःखाची किनार आणि निराशेची छाया होती.

हे झालं भारतात पण तिकडे युरोपात ...

इंग्लंडमध्ये फिरायला आलेले प्रवासी लोकं गुहेत लपून बसले. ब्रुसेल्स शहरात हजारो भोंगे बसवण्यात आले. याआधी लेखात सांगीतल्याप्रमाणे रशियन रॉकेट कोसळले तेव्हा त्यातून युरेनियम सांडले होते, नासाच्या म्हणण्याप्रमाणे स्कायलॅबच्या प्रयोगशाळेत असे काही नव्हते, पण लोकं विश्वास ठेवायला तयार नव्हती. नासाने या दरम्यान जास्त मनुष्यहानी झालीच तर त्याचे 'चान्सेस' वर्तवले. त्यांनी १:१५२ अशी शक्यता वर्तवल्यावर त्या आकड्यावर चर्चा सुरु झाल्या. काही इन्सुरन्स कंपन्यांनी स्कायलॅब इन्शुरन्स पॉलिसी विकायला सुरुवात केली आहे अशा अफवा वर्तवल्या जाऊ लागल्या. एकूण काय तर सगळीकडे घबराट-अफवा आणि गोंधळच गोंधळ ! 

ऑस्ट्रेलीयातल्या एका पोराने १०,००० डॉलर कमावले. 

सॅन फ्रान्सीस्को एक्झामीनर या पेपराने एक मजेदार ऑफर दिली. स्कायलॅब कोसळल्यावर जे तुकडे पृथ्वीवर पडतील त्याचा तुकडा ७२ तासाच्या आत आमच्या ऑफीसात आणून दाखवा आणि १०,००० डॉलर कमवा ! हे जवळजवळ अशक्यच आहे समजून त्यांनी ही ऑफर दिली पण १२ जुलैच्या पहाटे ऑस्ट्रेलीयातल्या एका खेड्यात-एस्पेरान्समध्ये' स्कायलॅबचे तुकडे पडले.  स्टॅन थ्राँटन नावाच्या एका मुलाच्या घरावरही काही तुकडे पडले. या पठ्ठ्याने ती जाहिरात वाचली होती. तो मिळेल त्या विमानाने अमेरिकेत पोहचला. अर्थातच १०.००० डॉलरचे बक्षिस त्याला मिळाले.

अमेरिकन राष्ट्राध्यक्षांनी ऑस्ट्रेलीयाची माफी मागीतली पण दंड भरला नाही.

त्यावेळीचे अमेरिकेचे अध्यक्ष जिमी कार्टर यांनी ऑस्ट्रेलीयाची माफी मागीतली. ते म्हणाले .
"I was concerned to learn that fragments of Skylab may have landed in Australia. I am relieved to hear your Government's preliminary assessment that no injuries have resulted. Nevertheless, I have instructed the Department of State to be in touch with your Government immediately and to offer any assistance that you may need."

ज्या एस्पेरान्स नावाच्या खेड्यात स्कायलॅबचे तुकडे पडले त्या गावाच्या पंचायतीने सार्वजनिक क्षेत्रात कचरा केल्याबद्दल अमेरिकेला ४०० डॉलरचा दंड केला. तो मात्र अमेरिकन सरकारने २००९ सालपर्यंत भरला नाही. २००९ साली एका सेवाभावी संस्थेने तो भरून प्रकरण मिटवले. या गावाजवळच्या शहरात एका म्युझियममध्ये स्कायलॅबचे तुकडे आजही जतन केलेले बघायला मिळतात.

१९७९ साली जे घडले ते आता कदाचित घडणार नाही कारण आकाशातून पडणार्‍या चीनी रॉकेटच्या तुकड्यापेक्षा चीनमधून आलेल्या कोव्हीडची दहशत सध्या जास्त आहे. 

आता तुम्हाला खूपच उत्साह असेल आणि मानवानी आकाशात सोडलेले सॅटेलाइट बघायचेच असतील तर त्यासाठी दुर्बिणीची गरज नाही अगदी उघड्या डोळ्याने हे सॅटेलाइट रोज आकाशात कसे बघायचे ते बोभाटा तुम्हाला लवकरच सांगणार आहे.

 

ता. क.

 

हा लेख लिहित असतानाच एक बातमी हाताशी आली आहे ती अशी की या शनिवारी रात्री ११ वाजेपर्यंत हे चीनी रॉकेट Long March-5B rocket पृथ्वीवर पडण्याची शक्यता आहे. चीन सरकारच्या एका घोषणेप्रमाणे जिवीत हानी होण्याची शक्यता फारच कमी आहे पण पेंटागॉनच्या म्हणण्याप्रमाणे रॉकेटच्या आकाराचा विचार करता मोठे तुकडे वरून पडण्याची शक्यता आहे.त्याखेरीज इतर अनेक अवकाश संस्थांनी त्यांचे मत दिले आहे. त्याचा आढावा घेतला तर असं लक्षात येतं की या आठवड्याच्या शनि/रविवारी कधीही ही घटना घडू शकते

सबस्क्राईब करा

* indicates required