computer

अंतराळात गेलेली पहिली स्पॅनिशभाषिक बाई. तिने तिथे चक्क बासरी वाजवून विश्वविक्रम केला!!

माणसाला आकाशाबद्दल जितकं कुतूहल आहे, तितकं कदाचित आपण राहतो त्या पृथ्वीबद्दलही नसेल. भलेही पुराणकाळात रामाला चंद्राच्या प्रतिमेवर समाधान मानावं लागलं असेल, पण आधुनिक माणसाने चंद्राला स्पर्श करून दाखवला. अजून एक पाऊल पुढे टाकून मंगळावरही स्वारी झाली, शुक्राला गवसणी घालण्याचे प्रयत्न झाले. गुरु, शनी ही मंडळीही एक ना एक दिवस आपल्या कचाट्यात सापडतील. तिथे जाण्यासाठी काय करावं लागेल यासंबंधी संशोधन सुरू आहेच. या उचापती आणि उठाठेवींमुळे विश्वाचं अज्ञात रहस्य आपल्यासमोर उलगडू शकलं आहे. याशिवाय या अवकाश मोहिमांमुळे अवकाशातल्या इतर गोष्टींचा अभ्यास, हवामानविषयक अंदाज हेही शक्य होत आहे. यासाठी हे आव्हानात्मक काम करणाऱ्या अंतराळवीरांचे आभार मानावे तितके थोडे आहेत.

माणसाने आकाशाला गवसणी घातल्याची गोष्ट तशी अलीकडचीच. १९६१ मध्ये रशियन अंतराळवीर युरी गागारिनने अवकाशात जाऊन पहिली पृथ्वी प्रदक्षिणा पूर्ण करत इतिहास घडवला. यानंतर तब्बल दोन दशकांनंतर, १९९३ मध्ये, या इतिहासाच्या पानावर अजून एक नाव कोरलं गेलं- ते म्हणजे एलेन ओचोआ. अंतराळप्रवास करणारी ही पहिलीच स्पॅनिशभाषिक स्त्री.

एलेनचा जन्म १९५८ मध्ये लॉस एंजेलिसमध्ये झाला. घरातलं वातावरण शिक्षणाला पोषक होतं. इतर अनेक अमेरिकनांप्रमाणेच नासाने सुरू केलेल्या चांद्रमोहिमा बघत एलेन लहानाची मोठी झाली. पण म्हणून भविष्यात अंतराळवीर वगैरे व्हायचं तिने बिलकुल ठरवलं नव्हतं. तिला संगीतात रस होता. संगीतक्षेत्रात, बासरीवादनात करिअर करायचं तिचं स्वप्न होतं. पण तिच्या आईच्या आग्रहामुळे तिने उच्च शिक्षण घ्यायचं ठरवलं. महाविद्यालयीन आयुष्यात तिला विज्ञानाची गोडी लागली. त्या काळात विज्ञान, अभियांत्रिकी या क्षेत्रांकडे स्त्रिया फारशा वळत नसत. एलेनने मात्र या परंपरेला छेद देऊन भौतिकशास्त्र या विषयात पदवी मिळवली. यानंतर तिने इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये मास्टर्स डिग्री आणि डॉक्टरेट मिळवली.

१९८३ मध्ये ती ऑप्टिक्स विषयात पीएचडी करत असताना सॅली राईड ही अंतराळात जाणारी पहिली अमेरिकन महिला ठरली. आता एलेनलाही 'आसमान को छूने की' स्वप्नं पडू लागली. कदाचित सॅलीने हा इतिहास घडवला नसता तर एलेनही अवकाशात गेली नसती. पण सॅलीमुळे का होईना, अंतराळप्रवास करण्याचा किडा तिला चावला! अर्थात ते इतकं सोपं नव्हतं. अंतराळवीर व्हायचं तर नासामध्ये त्यासाठीचं प्रशिक्षण घ्यावं लागायचं. नासाने दोन वेळा तिला अंतराळवीर प्रशिक्षण द्यायला नकार दिला. पण एलेन हार मानायला तयार नव्हती. या काळात तिने पायलट म्हणून शिक्षण घेत प्रयत्न सुरू ठेवले. शेवटी १९९० मध्ये नासाने तिला मान्यता दिली आणि पुढचं वर्षभर अंतराळवीर म्हणून तिचं प्रशिक्षण सुरू राहिलं. त्याकाळात तिने ९५० तासांपेक्षा जास्त काळ अंतराळात घालवला.

एप्रिल १९९३ मध्ये अखेर तिने अवकाशात झेप घेतली. अंतराळात जाणारी ती पहिली लॅटिन महिला ठरली. या मोहिमेदरम्यान त्यांच्या चमूने सूर्य आणि त्याची पृथ्वीच्या वातावरणाशी होणारी आंतरक्रिया यांचा अभ्यास करण्यासाठी काही प्रयोग केले. या अभियानात तिने प्रोग्रॅमद्वारे नियंत्रित करता येणाऱ्या यांत्रिक हातांचा म्हणजेच रोबोटिक आर्मचा वापर केला. याद्वारे त्यांनी यशस्वीपणे स्पार्टन हा उपग्रह अवकाशात प्रस्थापित केला आणि दोन दिवसांनी तो परत घेतला. या उपग्रहाने सौर वाऱ्यांचा अभ्यास केला. एलेनने आणखी तीन वेळा अवकाशाची सफर केली. यात १९९९ च्या अभियानाचा समावेश होता. या अभियानात तिने रोबोटिक आर्मच्या साहाय्याने इंटरनॅशनल स्पेस स्टेशनला आवश्यक गोष्टींचा पुरवठा केला. (यात अन्न, पाणी, इंधन, गॅस, यंत्रांचे सुटे भाग अशा गोष्टी येतात). एवढंच नाही तर २००२ च्या आपल्या शेवटच्या अवकाश प्रवासादरम्यान रोबोटिक आर्मचा वापर करून तिने इंटरनॅशनल स्पेस स्टेशनवर सोलर पॅनेल्सदेखील बसवली.

त्याआधी इंटरनॅशनल स्पेस स्टेशन म्हणजे काय हे माहीत आहे का? इंटरनॅशनल स्पेस स्टेशन हा मुळात एक उपग्रहच आहे. तो अवकाशात असला तरी पृथ्वीच्या पृष्ठभागापासून जवळ किंवा कमी उंचीवर (low orbit) आहे. याचा कारभार पाच वेगवेगळ्या देशांच्या एजन्सीजकडून चालतो. नासा ही यांपैकीच एक. अवकाशातल्या वातावरणावर संशोधन करण्यासाठी या स्टेशनमध्ये प्रयोगशाळाही आहे.

आपल्या पहिल्याच अवकाशप्रवासादरम्यान एलेन ओचोआ हिने शून्य गुरुत्वाकर्षणाखाली बासरी वाजवत एक नवीन विक्रम केला. मिशन कंट्रोलची डायरेक्टर म्हणून काम करत असताना तिने इतरांना, विशेषतः लॅटिन आणि इतर देशांच्या महिलांना, सतत प्रेरणा दिली. शेवटच्या अवकाश प्रवासानंतरही एलेनचं आकाशाशी जुळलेलं नातं कायम राहिलं. नासाच्या जॉन्सन स्पेस सेंटर येथे तिने डेप्युटी डायरेक्टर आणि डायरेक्टर अशा जबाबदाऱ्या पार पाडल्या. या पदापर्यंत पोहोचलेली ती पहिली स्पॅनिश व्यक्ती आणि दुसरी महिला!

एलेनने तिच्या क्षेत्रातील अनेक बदल स्वतः बघितले. डिपार्टमेंट ऑफ एनर्जी लॅबमध्ये काम करत असताना ६० लोकांच्या टीममध्ये ती एकमेव महिला होती. नासामध्ये उत्तरोत्तर महिलांचं प्रमाण वाढत गेलं. ती काम करत असलेल्या विभागात एक चतुर्थांश महिला काम करताना पाहणं हा तिच्यासाठी आनंदाचा, अभिमानाचा क्षण होता.

आज ती तिथेच आहे. आपण आपल्या देशासाठी आणि जगासाठी अत्यंत महत्त्वाचं योगदान देत आहोत याबद्दल तिला सार्थ अभिमान आहे. या स्पेस सेंटरमध्ये ती भविष्यातील मोहिमांसाठीची कार्यप्रणाली, संशोधन यांवर देखरेख करते. संपूर्ण कारकिर्दीदरम्यान तिने महिलांना विज्ञान, अभियांत्रिकी या शाखांचा अभ्यास करण्यासाठी उद्युक्त केलं आहे. परिणामी विज्ञान, अभियांत्रिकी, गणित, तंत्रज्ञान या क्षेत्रांत आज अनेक महिला काम करताना दिसतात.

Be either the first, or the best, or different असं सांगणं सोपं असलं तरी प्रत्यक्षात आणणं चांगलंच कठीण आहे. एलेन ओचोआने मात्र या तिन्ही गोष्टी साध्य केल्या आहेत. तुम्हाला काय वाटतं?

स्मिता जोगळेकर

सबस्क्राईब करा

* indicates required