computer

पृथ्वीच्या पोटातले तेलाचे साठे कसे शोधतात माहिती आहे? वाचा मग इथे...

सध्या प्रत्येकाच्या तोंडी एकच विषय आहे… गॅस आणि पेट्रोलियम पदार्थांच्या वाढलेल्या किमती! खरंतर आपण या ऊर्जेच्या साधनांवर इतके अवलंबून आहोत की, यांची किंमत कमी जास्त झाली तर आपल्या दैनंदिन आयुष्यावर त्याचा सरळ परिणाम होतो. या नैसर्गिक ऊर्जेच्या स्रोतांचा साठा दिवसेंदिवस झपाट्याने कमी होतोय.  या धोक्याबाबत जगातील सगळ्या देशांचे भूगर्भशास्त्रज्ञ कानी कपाळी ओरडून सांगत असताना आपण मात्र तिकडे दुर्लक्ष करत आहोत. असो! 

तर कधी विचार केलाय का की, जमिनीच्या आत असणारे हे ऊर्जेचे साठे मुळात शोधले कसे जातात? नाही ना? चला तर मग या लेखातून समजून घेऊया की पृथ्वीच्या अगदी आत असणारे पेट्रोलियमचे साठे नेमके कुठे दडून बसले आहेत हे शास्त्रज्ञ शोधतात तरी कसे… 

तत्पूर्वी हे साठे तयार कसे झाले याची माहिती घेऊया.

आपली पृथ्वी अनंत काळापासून अस्तित्वात आहे आणि यावर जीवसृष्टी सुद्धा वाढली हे आपण जाणतोच. मानव प्राणी उत्क्रांत होण्याच्या आधीपासून पृथ्वीवर सजीव प्राणी, पक्षी, झाडे, वेली अस्तित्वात आहेत. या पृथ्वीवर हजारो लाखो वर्षात अनेक वेळा उलथापालथ झाली. बरेच मोठमोठे भूकंप आले आणि सजीवसृष्टी जमिनीखाली गाडली गेली. जमिनीच्या आत तप्त लाव्हा आणि गरमीमुळे त्या सजीवांवर प्रक्रिया होऊन त्यांच्यापासून वायू आणि द्रव तयार बनले. हे वायू आणि द्रव पदार्थ हजारो वर्षांपासून दगडांच्या आत पोकळ जागेत साचत गेले आणि त्यांच्यात रासायनिक प्रक्रियांमुळे ज्वलनशील गुणधर्म तयार झाले. हेच आपले पेट्रोलियम पदार्थ, ज्यांवर शुद्धीकरणाची प्रक्रिया करून आपण त्यांना केरोसीन, पेट्रोल, डिझेल, गॅस अश्या विविध प्रकारात उपयोगात आणतो आणि आपली ऊर्जेची गरज भागवतो. 

आता मुख्य मुद्दा असा की, यांना शोधले कसे जाते ?

कारण यांचे साठे मर्यादित स्वरूपात असल्याने कुठेही खोदले आणि पेट्रोलियम सापडले असे कधी होत नाही. त्यांची नेमकी जागा शोधणे हे अतिशय कौशल्याचे काम आहे. त्यासोबतच ते खर्चीकही आहे. जर जागा शोधण्यात चूक झाली तर भयंकर मोठ्या आर्थिक नुकसानाला सामोरे जावे लागते हे निश्चित! 

जमीन आणि समुद्रात अश्या दोन्ही ठिकाणी पेट्रोलियम पदार्थांचे साठे आढळून येतात आणि दोन्ही ठिकाणी शोध घेण्याच्या पद्धती वेगवेगळ्या आहेत. जमिनीवर शोधताना काही विशिष्ट अंदाज बांधून शोध घेण्याची जागा आधी निश्चित केली जाते. त्यानंतर ठरवलेल्या ठिकाणी जवळपास दोनशे फुटांपर्यंत बोअरवेल खोदली जाते. या बोरिंग मध्ये अडीच किलोग्राम वजनाचा डायनामाईट नावाचा स्फोटक पदार्थ सोडून त्याचा खोलवर स्फोट घडवला जातो. या स्फोटाची कंपने दहा किलोमीटर पर्यंतच्या भुभागाला प्रभावित करू शकतात. स्फोटानंतर जमिनीमधून येणाऱ्या तरंगांना ‘सिस्मिक फोन’ (seismic phone) नावाच्या जागोजागी ठेवलेल्या यंत्रात पकडले जाते. ही सगळी माहिती एकत्रित गोळा करून त्याचे सुपर कॉम्प्युटरद्वारे विश्लेषण केले जाते. यातून त्या ठिकाणी किती प्रमाणात साठा आहे याची माहिती मिळते आणि नंतर त्या ठिकाणी साठा बाहेर काढण्यासाठी खोदकाम केले जाते. 

ही झाली जमिनीवरची पद्धत! समुद्रात मात्र थोड्या वेगळ्या पद्धतीचा अवलंब करावा लागतो. एका मोठ्या जहाजात सिस्मिक तरंग सोडणारी यंत्रे बसवली असतात. खोल समुद्रात यंत्रामधून ‘शॉक वेव्हज’ सोडल्या असता, त्या वेव्हज समुद्रखालील तळावरील जमिनीला, दगडांना आपटून परत येतात. ते परत आलेले तरंग यंत्रात पकडून त्यांचे विश्लेषण करून साठा आहे किंवा नाही, आणि असलाच तर तो किती प्रमाणात आहे हे निश्चित केले जाते. 

हे आपल्याला वाचण्यास सोपं वाटत असलं तरी प्रत्यक्षात एकदा शोध घेण्याची मोहीम हाती घेतली तर त्याला वर्षभराचा वेळ लागू शकतो इतकी किचकट पद्धत आहे ही !

तर मित्रहो, पुढच्या वेळी आपल्या वाहनात इंधन भरताना आणि ते निष्कारण वाया घालवताना त्या इंधनाच्या एका थेंबाला कुठून कुठपर्यंत प्रवास करावा लागला आहे हे ध्यानात असू द्या !

सबस्क्राईब करा

* indicates required