computer

डॉक्टरांना हात धुवायला शिकवणाऱ्या डॉक्टरची गोष्ट!! वाचा हात न धुतल्यानं काय होत ते...

मंडळी, जंतू, जंतूसंसर्ग, जंतूनाशक हे शब्द अस्तित्वातही नव्हते त्या काळात चार संशोधकांनी आपल्या अथक परिश्रमाने आणि संशोधनाने मानव समाजाला जीवघेण्या आजारातून वर काढले आणि संजीवनी दिली. या महान चार संशोधकांवरील लेखमालिकेतला हा पहिला लेख आहे.

"बंटी, तेरा साबुन स्लो है क्या"!! काय मस्त जाहिरात आहे ना ही? चिमुरडी मुलं जेवणाआधी हात धुतात ते पाहून बरं वाटतं. पण हात धुण्याची ही सवय आपल्याला लावली कोणी हा विचार कधी तुम्ही केलाय का ? 

आता तुम्ही म्हणाल, हा काय प्रश्न झाला? हातावर जंतू असतात आणि ते पोटात जाऊन आजार होऊ नयेत म्हणून हात धुणे गरजेचे असते. अगदी बरोबर! पण मंडळी, हे आपल्याला आता माहीत आहे.  पण पूर्वीच्या काळी हे कुणाला माहीतच नव्हतं. हात धुण्याची क्रिया हा स्वच्छतेचा  प्राथमिक धडा आता आपण सहज गिरवतो, पण एकेकाळी हॉस्पिटलमध्ये काम करणारे डॉक्टर देखील पेशंटला तपासण्यापूर्वी हात धुवायचे नाहीत. हात न धुण्याचा आणि आजाराचा काहीतरी संबंध आहे हे सिध्द करणार्‍या डॉक्टरचे नाव आहे डॉक्टर इग्नाझ फिलिप सेमेलविज!!. डॉक्टरांना हात धुवायला शिकवणारा डॉक्टर असेही याला म्हणता येईल. या शोधाची कहाणी जितकी उत्कंठापूर्ण, तितकाच या कहाणीचा अंत करूण आहे. 

चला तर मग,  जाणून घेऊया… 

सतरावे शतक संपण्याचा आणि अठरावे शतक सुरू होण्याचा तो काळ. डॉ. इग्नाझ हे तेव्हा ‘व्हिएन्ना जनरल हॉस्पिटल’ येथेकाम करत होते. या काळात अनेक वैज्ञानिक स्थित्यंतरे होत होती. त्यातच एक म्हणजे बाळंतपण हॉस्पिटलमध्ये करण्याची सुविधा. व्हिएन्नाच्या या दवाखान्यात बाळंतपणासाठी दोन वेगवेगळे वॉर्ड होते . एका वॉर्डमध्ये पारंपरिक पद्धतीने सुईणीद्वारे बाळंतपणं केली जात, तर दुसऱ्या वॉर्डमध्ये  बाळतपणं शिकाऊ डॉक्टरांमार्फत केली जात. शिकाऊ डॉक्टरांच्या  वॉर्डमध्ये  बाळंतज्वराचे आणि त्यामुळे होणार्‍या मृत्यूचे प्रमाण जास्त होते. सुईणींमार्फत चालणार्‍या वॉर्डात मात्र मृत्यूचे प्रमाण बरेच कमी होते.

त्याकाळी आजार हे हवेतल्या विषारी वाफांनी होतात, ज्यांना या विषारी वाफा झेपत नाहीत, ते रुग्ण मरण पावतात अशी डॉक्टरांची समजूत होती. या विषारी वाफांना "मियास्मा" म्हटले जायचे. मियास्मा दोन्ही वॉर्डात असेल तर आपल्याच वॉर्डात मृत्यू का होतात या विचाराने डॉ. इग्नाझ अत्यंत व्यथित आणि अस्वस्थ होते. या मागे काय कारण असेल याचा छडा लावण्याचा ध्यास त्यांनी घेतला आणि वैज्ञानिकदृष्ट्या अतिशय साध्या पण मानवजातीवर उपकार असणाऱ्या महत्वाच्या गोष्टीचा शोध लावला. 

अनेक दिवसांच्या निरीक्षणातून इग्नाझ यांच्या असं लक्षात आलं की डॉक्टरांच्या आणि सुईणींच्या कार्यपद्धतीत फरक आहे. सुईणी फक्त बाळंतपणाची कामे करतात.  मात्र डॉक्टर मंडळी बाजूलाच असणाऱ्या शवविच्छेदन कक्षात  आधी शव हाताळतात आणि नंतर हात न धुता तसेच इकडे येऊन बाळंतपण सुद्धा करतात. अशी काहीतरी गोष्ट आहे, जी डॉक्टरांच्या हातामार्फत शवविच्छेदन खोलीतून बाळंतपणाच्या खोलीत येत आहे हे नक्की झालं.

या दरम्यान त्यांच्या एका डॉक्टर मित्राच्या हाताला शवविच्छेदन करताना सुरीने जखम झाली. त्यानंतर काहीच दिवसात ताप येऊन त्या मित्राचा मृत्यू झाला. आपल्या मित्राच्या अशा एका छोट्या जखमेच्या कारणाने जाण्याचे कारण शोधून  काढण्यासाठी सेमेलवीस त्याच्या विच्छेदनाला हजर राहिला आणि एक विस्मयकारक गोष्ट त्याच्या लक्षात आली.  बाळंतरोगाने गेलेल्या स्त्रीच्या शरीरांतर्गत ज्या खुणा दिसायच्या, त्याच खुणा त्या मेलेल्या मित्राच्या अवयवावर होत्या.

यानंतर इग्नाझ यांनी सर्व डॉक्टरांना बाळंतपण करण्यापूर्वी हात धुवायला उद्युक्त केलं. त्यासाठी बराच विचार करून त्यांनी ‘क्लोरीनेटेड लाईम’ नावाचे शुद्धीकरण जल वापरण्यास सांगितलं. सुरुवातीला सगळ्या डॉक्टरांना हे कटकटीचे काम वाटले.  मग मात्र सर्वांना इग्नाझच्या बोलण्याचे महत्व पटले आणि सर्वांनी बाळंतपणा पूर्वी आणि दोन बाळंतपणामध्ये आवर्जून हात धुवायला सुरुवात केली. याचा परिणाम थोड्याच दिवसात दिसू लागला. मृत्यू होण्याचे प्रमाण खूप घटले. 

एखाद्याचे दुर्दैव कसे असते बघा, डॉ. इग्नाझ यांचे हे यश धडधडीत समोर असूनही अनेक प्रस्थापित डॉक्टरांनी या शोधाला कडाडून विरोध केला.  तेव्हा ऑस्ट्रिया आणि हंगेरी यांचे वैर होते म्हणून अनेक ऑस्ट्रियन डॉक्टर या शोधाचा स्वीकार करण्याऐवजी खिल्ली उडवू लागले. तसेच डॉक्टरांच्या चुकीमुळे मृत्यू होतात हे मानायला तयार नसणे हा ही एक कोन या विरोधाला होता. शेवटी इग्नाझ यांनी पदाचा राजीनामा दिला आणि एका कॉलेजात प्रोफेसर बनून सेवा देऊ लागले.  पण शेवटपर्यंत त्यांनी आपले म्हणणे सोडले नाही. या आत्यंतिक विरोधाचा परिणाम त्यांच्या मानसिक स्वास्थ्यावर झाला. ते डिप्रेशनचे शिकार झाले आणि त्यांच्या डोक्यावर परिणाम झाला. त्यांना मेंटल हॉस्पिटलमध्ये दाखल केले गेले. तिथे दाखल झाल्यावर अवघ्या दोनच आठवड्यात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला! कशामुळे माहीत आहे? आयुष्यभर ज्या रोगाविरोधात ते लढले, त्याच सेप्टिसेमिया या रोगामुळे! 

त्यानंतर कित्येक वर्षांनी लुई पाश्चर या शास्त्रज्ञाने जिवाणूंचा शोध लावला आणि डॉ. इग्नाझ जे तळमळीने सांगत होते ते खरेच होते याची खात्री सर्वांना पटली!  मंडळी, आज बुडापेस्ट येथील डॉ. इग्नाझ यांचे घर स्मारक बनले आहे. त्यांचा भव्य पुतळा तिथे उभारला गेलाय. पण त्यांच्या हयातीत त्यांना मानसन्मान मिळाला नाही ही खंत वैद्यकीय इतिहासात  कायमस्वरूपी राहणार आहे.

 

लेखक : अनुप कुलकर्णी