जाणून घ्या मोठमोठ्या शास्त्रज्ञांनी बनवलेलं भारतीय सौर-कॅलँडर अडगळीत कसं गेलं?

१९४७ साली भारताला स्वातंत्र्य तर मिळालं. पण त्यानंतर भारतात बरेच बदल होणं आवश्यक होतं. त्यातलाच एक खूप गरजेचा बदल होता - देशाच्या वजनमाप पद्धतीत बदल करून तिला  आधुनिक बनवण्याचा.  तेव्हाचे पंतप्रधान नेहरूंनी  यात पुढाकार घेतला आणि १९५७ साली भारतीय मापन पद्धतीत आमूलाग्र बदल केले.

पहिला बदल होता चलनाचा, अर्थातच तो  एका रात्रीत आला नाही. तेव्हा आपण एक पै -पैसा-आणा-रुपया वापरायचो. त्याजागी फक्त पैसे आणि रुपयाची दशमान पद्धती आली. वजनात तोळा, मासा, गुंज , शेर, रत्तल, मण वापरायचो. त्याठिकाणी मग  ग्रॅम-किलोग्रॅमची पद्धती आली. अंतरं मोजण्यासाठीचं इंच-फूट-मैल, गुंठा, बिघा जाऊन त्याजागी मीटर आणि किलोमीटर आलं. हळूहळू सर्व जुनी वजनमापं दशमान पद्धतीत आली आणि रुळलीसुद्धा. आता एक मण म्हणजे किती किलो हे आपल्या आजीलासुद्धा पटकन आठवायचं नाही. 

स्त्रोत

पण इतकाच बदल पुरेसा नव्हता. यासोबतच आणखी एक बदल अत्यंत आवश्यक होता, तो म्हणजे कालगणनेच्या म्हणजेच कॅलँडरपद्धतीचा. विश्वास बसणार नाही, पण आपल्याला स्वातंत्र्य मिळालं तेव्हा हिंदू पंचांगं तर होतीच, पण त्यांच्यासोबत वेगवेगळी ३० कॅलेंडरं भारतात वापरली जायची. प्रत्येक पंचांगात  वेगवेगळे सन वापरले जायचे. उत्तरेत विक्रमसंवत तर दक्षिणेत शालीवाहन संवत वापरला जायचा. मुस्लीम संस्थानात हिजरी सन वापरला जायचा. सोबत ब्रिटिशांनी आणलेलं कॅलँडर- जे आपण आता वापरतो आहे- पण होतंच. या सगळ्या खिचडीत स्वतंत्र भारताची स्वतःची एकमेव अशी कालगणनेची पद्धती उपलब्ध नव्हती. 

मग काय, यावर उपाय तर हवा होता. मग पंतप्रधान जवाहरलाल नेहरुंनी त्यासाठी सुप्रसिद्ध खगोल शास्त्रज्ञ मेघनाद साहा यांच्या अध्यक्षतेखाली  सरळ एक कॅलेंडर कमिटीच स्थापन केली. या कमिटीनं अहोरात्र परिश्रम आणि खूप विचारमंथन करून भारतीय सौरदिनांक असलेलं कॅलेंडर तयार केलं. शालिवाहन शकाचा पहिला दिवस मार्चमध्ये असतो. म्हणून त्याप्रमाणं त्या शकांचा संदर्भ म्हणून वापर करण्यात आला. महिन्यांची नावे पण चैत्र-वैशाख-ज्येष्ठ-आषाढ अशीच ठेवण्यात आली. अपवाद फक्त मार्गशिर्ष महिन्याचा होता. त्या महिन्याला अग्रहायण हे नाव देण्यात आलं. 

“यात काय, पंचांगात आणि स्वतंत्र भारताच्या कालगणनेत फरक तो काय राहिला?” असा प्रश्न पडला असेल ना तुम्हांला?  फरक होता. या नव्या कॅलँडरमध्ये  महिन्यांची नावं आणि शालीवाहन शक हे दोन्ही सारखं असलं तरी इतर बरेच काही बदल केले गेले होते.
या कॅलँडरनुसार वर्षाची सुरूवात  २१/२२ मार्चला होते. असं करण्याचं कारण असं की,  या दिवशी दिवस आणि रात्र दोन्ही नेमके बारा-बारा तासांचे असतात. पंचांगाच्या वर्षात ३६० दिवस असतात. सौर दिनांकाच्या दिनदर्शिकेत म्हणजेच नव्या कॅलँडरमध्ये  एका वर्षाचे ३६५ दिवस असतात. काही महिने ३० दिवसांचे तर काही ३१ दिवसांचे असतात.  पण ते ३०-३१-३० अशा क्रमात नसतात. वैशाख ते भाद्रपद हे महिने ३१ दिवसांचे तर अश्विन ते फाल्गुन हे महिने ३० दिवसांचे असतात. शासकीय पत्रकं, परिपत्रकं म्हणजेच शुद्ध मराठीत सर्क्युलर्स, आकाशवाणीची दिवसाची पहिली उदघोषणा  हे सगळं या सौर दिनांकाप्रमाणं असतात. इतकंच नाही, तर आपण चेकवर पण सौर दिनदर्शिकेची तारीख टाकू शकतो आणि तो चेक पास करण्याची जबाबदारी बँकेची आहे. खरं सांगायचं तर १९५७ सालानंतरच्या जन्मतारखेच्या नोंदी पण नगरपालिका आणि शाळा यांनी सौर दिनांकाप्रमाणे ठेवायच्या होत्या. 

असं आहे आपलं भारतीय सौर-कॅलँडर

स्त्रोत
पण... पण.. असं काहीच झालं नाही. आपण सर्वांनी जानेवारी ते डिसेंबर हेच म्हणजे सध्या वापरत असलेलं ग्रेगोरियन कॅलेंडर वापरलं आणि अनेक वर्षाच्या मेहनतीतून तयार झालेली भारतीय सौरदिनांक पध्दती अडगळीत गेली.

 

सबस्क्राईब करा

* indicates required