किडल- छोट्यांचं स्वत:चं सर्च इंजिन.. माहिती आहे का याच्याबद्दल?

इंटरनेट हा बागुलबुवा तर आहेच. माहितीचा खजिना असं त्याचं वर्णन केलं तरी कधी कधी नको त्या गोष्टी समोर येतात. मोठ्यांचं एकवेळ ठीक आहे हो, पण लहान मुलांना नको ते प्रश्न पडतात. कधी कधी त्यांचं वय इतकं लहान असतं की त्यांना काही समजावून सांगताही येत नाही. अशानं गोंधळात भर पडत जाते ते वेगळंच.

आपले दिवस भारी होते राव..  शाळा म्हणजे दोन-चार पुस्तकं, पाटी आणि पेन्सिल असायची. फारतर शिसपेन्सिल.. होमवर्क नावालाच असायचा आणि मग शाळा सुटली की मनसोक्त  हुंदाडणं असायचं. आताच्या मुलांना दुसरी-तिसरीत असतानाच प्रोजेक्ट्स, प्रेझेंटेशन आणि काय काय असतं.. जेवढी शाळा मोठी, तेवढं  काम आणखीच अवघड. फक्त प्रोजेक्ट्स म्हणूनच नाही, पण या एवढ्याशा चिमुरड्यांना प्रश्न पण खूप असतात. जर त्यांची उत्तरं त्यांनी स्वत:च गुगल करायचं ठरवलं, तर ती मुलं माहितीच्या जंजाळात हरवूनच जातील..

म्हणून बोभाटा घेऊन आलंय लहान मुलांना उपयोगी पडेल आणि आवडेल अशा किड्स फ्रेंडली विझ्युअल सर्च इंजिनची माहिती.. नांव आहे किडल..

९किडल इन्सायक्लोपिडिया मधलीही माहिती देते..)

 

किडल कसं काम करतं?

विझ्युअल सर्च इंजिन हे आपल्याला हव्या असलेल्या माहितीशी संबंधित असलेली चित्रं, आकृत्या, आकार आणि आकृतीबंध शोधतं. किडल त्याच्याही पुढे जाऊन त्या सर्च रिझल्ट्समध्ये  काही आक्षेपजनक शब्द आहे का पाहातं.  किडल किड्ससाठी असलं तरी नुसतंच बाळबोध नाहीय. त्यांच्या वेबसाईटनुसार, त्यांच्या सर्व रिझल्टसचं ३ गटांत वर्गीकरण करण्यात येतं.

१. पहिले एक ते तीन रिझल्ट्स असतात खास  मुलांसाठी लिहिलेल्या निर्धोक किंवा आपण ज्यांना विश्वसनीय म्हणू शकतो अशा  वेबसाईट्सचे आणि पेजेसचे. हे रिझल्ट्स किडलच्या संपादकांनी निवडलेले आणि त्यांच्या नजरेखालून गेलेले असतात. म्हणजेच हे  रिझल्ट्स नक्कीच तुमच्या पाल्यासाठी योग्य असतात.

२. पुढचे चार ते सात रिझल्ट्स हे मुलांसाठी खास लिहिलेल्या वेबसाईट्सचे नसतात. पण या वेबसाईट्सवरचा मजकूर मुलांना कळेल अशा साध्यासोप्या भाषेत लिहिलेला असतो. पहिल्या गटासारखीच या वर्गातल्या वेबसाईट्ससुद्धा किडलच्या संपादकांनी निवडलेल्या आणि त्यांच्या नजरेखालून गेलेल्या असतात, तसेच या सगळ्या लिंक्स विश्वसनीयही असतात.

३. पुढचे सगळे सर्च रिझल्ट्स या तिसर्‍या गटात येतात. या लिंक्सही लहान मुलांसाठी निर्धोक असतात, पण  इथं लिहिलेला मजकूर हा मोठ्या लोकांसाठी असतो. बरेचदा ही माहिती त्या त्या क्षेत्रांतल्या खास जाणकारांनी लिहिलेली असते. ही माहिती समजायला छोट्यांना चांगलंच जड जाऊ शकतं. इथले सर्च रिझल्ट्ससुद्धा ’गुगल सेफ सर्च’च्या चाळणीतून बाहेर पडलेले असतात.

 

म्हणजेच, अगदी बाळबोध, थोडं अवघड आणि अतिअवघड अशा वेगवेगळ्या पायर्‍यांची उत्तरं या किडलमधून मिळू शकतात, आणि तीही लहान मुलांच्या मनावर विपरित परिणाम होईल अशी माहिती त्यांच्यापर्यंत न पोचता.

(किडलच्या पानावर मिळणारा जुना सर्च रिझल्ट.. आता ही माहिती मुलांना मिळतेय - स्रोत)

काय आहे किडल?

 खरंतर हे किडल  २०१४ मध्येच आलं आहे.   किडलचा तसा गुगल या कंपनीशी काही संबंध नाही, पण त्यांनी गुगलचा आधार मात्र घेतला आहे. तांत्रिक भाषेत याला पॉवर्ड बाय गुगल असं म्हणतात. या साईटचा संस्थापक किंवा मालक कोण आहे हे त्यांच्या वेबसाईटवर दिलं नाहीय. पण बीबीसीच्या एका बातमीनुसार ती बहुधा फ्रिकिंग न्यूजच्या रशियन  संस्थापकानं सुरू केली असावी. त्यांनी प्रथमत: कोणकोणते शब्द ब्लॉक केले जावेत यासाठी लोकांना असे शब्द पाठवण्यासाठी आवाहन केलं. त्यानुसार त्यांनी कंटेट ब्लॉक करायला सुरूवातही केली होती. बीबीसीच्या गेल्या वर्षीच्या एका बातमीनुसार किडलवर LGBT किंवा मासिक पाळी यावरची माहिती मुलांना न मिळू दिल्याबद्दल आरोप झाले होते. आता मात्र अशा विषयांविषयीची माहिती तिथं मिळतेय असं दिसतं. इतर विषय उदा. पामेला ऍंडरसन किंवा इतर असेच काही शब्द शोधायची विनंती किडलला केलीत, तर “Oops, try again” असा संदेश मिळतो.

एक पालक म्हणून तुम्हांलाही त्यांच्या ब्लॉक्ड शब्दांच्या यादीत किंवा मुलांसाठी योग्य नसलेल्या वेबसाईट्सच्या यादीत भर घालायची असेल, तर ते ही करू शकता. ही लिंक आहे वाईट शब्द देण्याची तर ही लिंक आहे वाईट वेबसाईट्स किडलला कळवण्याची..

 

नाहीतरी मूल मोठं झाल्यानंतर त्याला सगळं काही कळणार तर आहेच. पण नको त्या गोष्टींनी मुलांचं बालपण हिरावून न घेता माहितीचा खजिना त्यांच्यासमोर खुला होणार असेल, तर याहून आणखी काय हवं?

सबस्क्राईब करा

* indicates required