computer

गुगल मॅपवर दिसलेल्या या गूढ काळ्या बेटाने इंटरनेट शंकाकुशंकांनी पेटवलंय. काय आहे हे प्रकरण?

आजवर अनेक सिनेमे, कादंबऱ्या, कथा यांच्यात एखादी जागा असते जी प्रचंड रहस्यमयी दाखवलेली असते. त्या जागेपासून वेगळेच काहीतरी सुरू होत असते. अशी जागा खरोखर असू शकते का असा विचारही तुम्ही अनेकवेळा केला असेल. सध्या मात्र गुगल मॅपवर दिसून आलेले एक बेट लोकांच्या मेंदूचा भुगा करत आहे.

समुद्राच्या बरोबर मध्यभागी एक बेट गुगल मॅपवर दिसले आहे. हे नेमके काय आहे हे समजण्याआधीच जगभर याबद्दल विविध अंदाज लावले जाण्यास सुरुवात झाली आहे. समुद्राच्या मध्यभागी ब्लॅक होल तर नाही? किंवा एखादा ज्वालामुखी? असे अंदाज लोक लावत आहेत.

काही काही भाऊ-बहीण लोक जालीम असतात. आपल्या मनात आलेली थियरी खरी सांगून लिहून टाकतात. त्यांच्याहून महान भाऊ-बहीण लोक हे फॉरवर्ड पण करतात. या बेटाच्या बाबतीत पण तसेच होत आहे. काहींनी तर याला एरिया ५१ पण म्हणून टाकले आहे. आता एरिया ५१ म्हणजे काय हा प्रश्न पडला असेल तर हा लेख वाचायलाच हवा:

१० लाख लोक अमेरिकेच्या ‘एरिया ५१’ वर छापा का घालणार आहेत?? असं काय आहे एरिया ५१ मध्ये??

१० लाख लोक अमेरिकेच्या ‘एरिया ५१’ वर छापा का घालणार आहेत?? असं काय आहे एरिया ५१ मध्ये??

तर काही चक्क याला नव्या जगाचे प्रवेशद्वार म्हणत आहेत. लॉस्ट या टीव्ही सिरीजप्रमाणे इथून काल्पनिक जगाची सुरुवात होते असे लॉजिक काहींनी लावले तर काहींनी याला सेन्सर्ड जागा घोषित करून टाकले आहे.

काही नेटकऱ्यांनी मात्र ही जागा रिपब्लिक ऑफ किरिबाटी येथील वोस्टोक बेट असल्याचे म्हटले आहे. मध्य प्रशांत महासागराच्या ठिकाणी ३२ प्रवाळ द्विपांची ही जागा आहे. तर यावर काहींनी मग ही जागा काळी का दाखवली असे विचारले आहे. यावर घनदाट झाडांमुळे ही जागा काळी दिसत असून हिरवी झाडे ही वरून काळी दिसत असल्याचा निष्कर्ष काढला आहे. पण तरीही अजून एकाही अधिकृत संस्थेने किंवा भौगोलिक तज्ञाने ही जागा नेमकी काय आहे हे स्पष्ट केलेले नाही.

जोवर ही जागा कोणती आहे यावर अधिकृत शिक्कामोर्तब होत नाही तोवर लोकांचे डोक्यालिटी लावणे सुरूच राहील. तुम्हीही यात मागे राहण्याची गरज नाही. ही जागा काय असू शकते याचे अंदाज कॉमेंटबॉक्समध्ये आम्हाला सांगा.

उदय पाटील

सबस्क्राईब करा

* indicates required