computer

T-20 वर्ल्डकपमध्ये सर्वात जास्त धावा काढणारे १० बॅट्समन!! यादीत कोण कुठे असेल असा तुमचा अंदाज आहे?

T-20 सामना म्हटला म्हणजे धावांचा पाऊस आणि चित्तथरारक घटनांची रेलचेल असते. त्यात वर्ल्डकप असला की उत्सुकता अधिकच ताणलेली असते. कारण एखादी विकेट किंवा एखादी धावही संघाचे वर्ल्डकपचे स्वप्न भंग करू शकतो. अशावेळी लक्ष असते ते तुफान बॅटिंग करणाऱ्या खेळाडूंवर.

कोहली, ख्रिस गेल, एबी डिव्हिलीयर्स असे काही खेळाडू आहेत जे T-20चे किंग समजले जातात. एकहाती सामना बदलण्याची ताकद त्यांच्यात आहे. असे असले तरी वर्ल्डकपमध्ये सर्वात जास्त धावा करण्याचा विक्रम यांच्यापैकी एकाही स्टार खेळाडूच्या नावावर नाही.

T-20 वर्ल्डकपमध्ये सर्वात जास्त धावा करण्याचा विक्रम आहे श्रीलंकेच्या महेला जयवर्धने याच्या नावावर. जयवर्धने हा वर्ल्डकपमध्ये हजारपेक्षा जास्त धावा करणारा एकमेव बॅट्समन आहे. ३१ सामन्यांमध्ये त्याने १०१६ धावा केल्या आहेत.

ख्रिस गेल हा खरंतर तोडफोड स्पेशालिस्ट आहे. आला म्हणजे सिक्सशिवाय त्याची गोष्ट नसते. हा पठ्ठ्या या यादीत दुसऱ्या स्थानी आहे. T-20 वर्ल्डकपमध्ये त्याने २८ सामन्यांमध्ये ९२० धावा केल्या आहेत.

या यादीत तिसऱ्या स्थानी श्रीलंकेचाच सलामीवीर तिलकरत्ने दिलशान आहे. याचा भन्नाट शॉट हा दिलस्कुप नावाने प्रसिद्ध आहे. सलामीला येऊन बॉलर्सची धुलाई करणाऱ्या दिलशानने ३५ सामन्यांमध्ये ८९७ धावा केल्या आहेत.

भारताचा आघाडीचा खेळाडू विराट कोहली या यादीत मागे कसा राहील? कोहली चौथ्या क्रमांकावर असला तरी त्याने वर्ल्डकपमध्ये फक्त १६ सामने खेळले आहेत हे ही लक्षात घेतले पाहिजे. स्ट्राईक रेटच्या बाबतीत तो जयवर्धनेच्या बरोबर आहे. त्याच्या नावे ७७७ धावा आहेत.

कोहलीच्या सोबतच त्याची आफ्रिकन कॉपी असलेला डिव्हीलीयर्स आहे. त्याने या यादीत ५ वा क्रमांक मिळवला आहे. दक्षिण आफ्रिकेसाठी खेळलेल्या ३० सामन्यांमध्ये त्याने ७१७ धावा केल्या आहेत.

रोहित शर्मा या यादीत ६ व्या स्थानी आहे. T-20 मधला तो भारताचा आश्वासक चेहरा आहे. २८ सामन्यांमध्ये त्याच्या नावे ४० च्या सरासरीने ६७३ धावा आहेत.

७ वा क्रमांक लागतो श्रीलंकन क्रिकेटचा महान खेळाडू कुमार संगकाराचा. संगकारा भारतीयांचा नेहमी लाडका राहिला आहे यामागे त्याची चांगली वर्तणूक होती. त्याने वर्ल्डकपमध्ये ३१ सामने खेळले ज्यात ६६१ धावा त्याच्या नावावर आहेत.

न्यूझीलँडचा कॅप्टन ब्रॅन्डन मॅक्यूलम हा टी धडाकेबाज खेळाडू म्हणून ओळखला जातो. आयपीएलमध्ये पण त्याने जबरदस्त खेळ दाखवला होता. ८ व्या क्रमांकावर असलेल्या मॅक्यूलमने २५ सामन्यांमध्ये ६३७ धावा केल्या आहेत.

बांगलादेशचा शकीब अल हसन हा ९ व्या क्रमांकावर आहे. शकीब ऑल राऊंडर खेळाडू आहे. त्याने २७ सामने खेळून ६२९ धावा जमा केल्या आहेत.

१० वा क्रमांक लागतो तो आपल्या युवराज सिंगचा कधीकाळी ६ बॉल्सवर ६ सिक्स मारून त्याने इतिहास घडवला होता. वर्ल्डकपमध्ये त्याने ३१ सामन्यांमध्ये ५९३ धावा केल्या आहेत.

उदय पाटील

सबस्क्राईब करा

* indicates required