computer

सौदी अरेबियामध्ये वसतंय एक नॉन-प्रॉफिट शहर!! याची संकल्पना, योजना आणि बरंच काही जाणून घ्या...

सौदी अरेबिया या देशाचे राजे मोहम्मद सलमान यांनी गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये एक घोषणा केली होती. एका नॉन-प्रॉफिट शहराची आपण घोषणा करणार असल्याचे त्यांनी सांगितले होते. त्यावेळी हे शहर नेमके काय असेल याबद्दल साशंकता होती. आता मात्र त्यांनी जेव्हा यासंबधी सर्व प्लॅन सांगितला तेव्हा ही उत्सुकता कमी झाली आहे.

या शहराचे नाव हे प्रिन्स मोहम्मद बीन सलमान नॉन-प्रॉफिट सिटी असणार आहे. नॉन प्रॉफिट सिटी म्हणजे याच्यातून त्याना फायदा अपेक्षित नाही, तर यातून काहीतरी भरीव घडावे असा विचार यामागे सौदी राजाचा आहे. इर्काच्या बाजूला वादी हनिफा जवळ हे शहर असणार आहे.

या शहराचा उद्देश हा तरुणांमध्ये नेतृत्वगुणांचा विकास व्हावा हा आहे. हे शहर पूर्णपणे मानवकेंद्रित असणार आहे. अतिशय प्रगत डिजिटल महानगर घडविण्याकडे त्यांचा कल असेल, जिथे पादचाऱ्यांसाठी सुद्धा अनेक सोयी असतील. शहराच्या एकूण भागापैकी ४४ टक्के इतकी जागा ही हिरव्या खुल्या जागांसाठी राखीव असेल. एकंदरीत जगात वेगळेपण उठून दिसावे अशाप्रकारे शहराची रचना असणार आहे.

सौदीच्या राजाच्या म्हणण्यानुसार, हे शहर सर्व प्रकारचे आकर्षित वातावरण त्या लोकांना पुरवेल जे याचा लाभ घेऊ इच्छितात. ज्यांच्यात काहीतरी वेगळे स्किल आहे आणि त्यातून ते भरीव कामगिरी करू शकतात अशा लोकांसाठी थेट नवे शहर तयार करण्याचा त्यांनी दूरगामी असा प्रयोग केला आहे. याआधी एखादी संस्था सुरू करणे इथवर असे प्रयोग झाले आहेत. संपूर्ण आधुनिक शहर उभारण्याचा हा प्रयोग म्हणूनच विशेष आहे.

या नव्या शहराचे मुख्य कार्यकारी अधिकारी, डेव्हिड हेन्री म्हणाले की, शहराचे ध्येय सौदी तरुणांच्या प्रतिभेला प्रीमियर इकोसिस्टम मिळवून देणे आणि नाविन्यपूर्ण, शैक्षणिक आणि सर्जनशील उपक्रमांसाठी जागतिक केंद्र स्थापन करून या सर्वांना प्रोत्साहन देणे हे आहे. जगभरात सुरू असलेले एकाच पठडीतले शिक्षण, उपक्रम उद्योग यांपेक्षा नव्या जगाचा वेध घेणारे आणि भविष्यातील आव्हाने पेलतील अशी नावीन्यपूर्ण काम करणाऱ्या तरुणांसाठी हे शहर मोठे प्लॅटफॉर्म म्हणून समोर येणार आहे.

या शहराचे चेयरमन घसान अलशिबल यांनी या शहराबद्दल माहिती दिली. या शहराची जग दखल घेईल असे घडवण्याचा सौदी राजाचा मानस आहे. प्रगत शहराच्या माध्यमातून तरुणांचे टॅलेंट वापरून सौदी आणि जगाच्या भविष्याला एक नवी दिशा देण्याचा प्रयत्न असणार आहे. या शहराची सीमा ही पश्चिम रियाधचा ३-४ चौरस किमीचा परिसर कव्हर करणार आहे. जवळपास ३०६००० चौरस किमी इतका हा एकूण परिसर असणार आहे.

या शहराच्या ब्ल्यू प्रिंटनुसार या ठिकाणी एका आदर्श शहरात असायला हवे असे सर्व काही असेल. ६००० अपार्टमेंट, ५०० मोठी घरे, टाऊनहाऊसेस याबरोबर मनोरंजनासाठी सर्व आधुनिक साधने असतील. शहराच्या मुख्य हेतूनुसार येथे कॉलेज, कॉन्फरन्स सेंटर, शाळा, सायन्स म्युझियम, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, रोबोटिक्स यातील इनोव्हेटर्ससाठी क्रिएटिव्ह सेंटर या सर्व सोयी असतील. सोबतीला कलेला वाव देण्यासाठी आर्ट गॅलरी, परफोर्मिंग आर्ट, थेटर, प्ले एरिया, कुकिंग अकॅडमी, तसेच व्हेंचर कॅपिटल फर्म्ससाठी होस्टिंग असे सर्वच आघाड्यांवर हे शहर सुसज्ज असणार आहे.
 

या प्रत्येक ठिकाणी आधुनिक तंत्रज्ञानाचा संगम असलेल्या सोयी असतील. कारण वरील प्रत्येक गोष्ट सर्वच शहरांमध्ये थोड्याबहुत प्रमाणात असते. पण या शहराची विशेषतः ही म्हणजे बदलते तंत्रज्ञान यात वापरले जाणार असेल. कारण कला, क्रीडा, उद्योग प्रत्येक क्षेत्रात AIचा समावेश असलेले तंत्रज्ञान विकसित होत आहे. याठिकाणी याच तंत्रज्ञानाचा वापर करून या सर्व बाबींना नव्या पद्धतीने मांडता येणार आहे.
इतका मोठा परिसर हा फक्त एक नवे शहर उभा करण्यासाठी या देशाने दिलेला नाही. ज्याप्रकारे आपल्याकडे आयटी सिटी आहेत, त्याप्रकारे हे शहर प्रत्येक क्षेत्रात वेगवेगळे प्रयोग करून यात काम करत असणाऱ्या प्रतिभावान लोकांना या ठिकाणी एकत्र आणून त्यांच्या क्षमतेचा उपयोग करून घेणार आहेत.
 

आता थोडंसं प्रिन्स मोहम्मद बिन सलमानबद्दल. 2011 मध्ये प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांनी देशाच्या चांगल्या भविष्यासाठी तरुणांमध्ये शिक्षण आणि नेतृत्व विकसित करण्यासाठी आणि त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी मिस्क फाउंडेशनची स्थापना केली. ही एक ना-नफा सेवाभावी संस्था आहे जी तरुणांना शिक्षण आणि उद्योजकतेद्वारे सक्षम करण्यात मदत करते. इंक्युबेशन सेंटर निर्माण करून ते समुदायाला व्यवसाय, साहित्यिक आणि सांस्कृतिक क्षेत्रे, सामाजिक आणि तांत्रिक विज्ञान शिकण्यास, विकसित करण्यास आणि प्रगती करण्यास सक्षम करते.
 

३८ वर्षीय सलमान हा आपल्या सुधारणावादी भूमिकांसाठी ओळखला जातो. सौदीची अर्थव्यवस्था भक्कम करण्यासाठी त्याने मोठे बदल घडवून आणले आहेत. तसेच महिलांना असलेली ड्रायव्हिंग बंदी देखील त्याने उठवली आहे. २००९ साली तो रियाधचे गव्हर्नर असलेल्या आपल्या वडिलांचा सल्लागार झाला होता. २०१३ साली त्याला प्रिन्स कोर्टचा हेड करण्यात आले. मंत्रिस्तरीय असे हे पद होते. त्यानेच २०१५ साली येमेन मध्ये आर्मी कारवाई सुरू केली होती. तसेच वॉशिंग्टन पोस्टच्या जमाल खगोशच्या हत्येमागे देखील तोच होता असे म्हटले जाते.

काही असो, सौदीमध्ये आणि एकूणातच जगात काहीतरी नवं घडतंय. कदाचित पुढे येणाऱ्या बदलत्या काळाची ही एक नांदी असेल.

उदय पाटील

सबस्क्राईब करा

* indicates required