ड्रोन उडवणं विसरा, आता उडवा बॅट-रोबॉट..

Subscribe to Bobhata

सस्तन प्राण्यांपैकी केवळ वटवाघळांना उडता येतं. त्यांचं उडणंही अगदी वेगळं असतं. त्यांच्या पुढच्या आणि मागच्या पायांच्यामध्ये एक त्वचेचा तलम पडदा असतो. तो  उडताना पंखांचं काम करतो. उडण्यासाठी वाघूळ आपल्या पायांची आणि शरीराची विशिष्ट हालचाल करतो. यातूनच त्याला हवेत तरंगता येतं, सूर मारता येतो आणि त्याच वेळेला जमिनीवर किंवा झाडाच्या फांदीवर न अडखळता उतरताही येतं.

रोबोटीक तंत्रज्ञांनी वाघळांच्या या उडण्यच्या तंत्राचा व्यवस्थित अभ्यास केला आणि  वटवाघळांसारख्या हालचाली करून उडू शकणारा रोबॉट विकसित केला आहे. त्यांनी या खोट्या वटवाघळात हाडांच्या जागी कार्बन फायबरची फ्रेम टाकलीय. वाघळांच्या शरीराला बरेच सांधे असतात. त्यामुळं त्याला हालचाली  सहजपणे करता येतात. त्यामुळं अशीच वटवाघळांसारखी सुमारे नऊ सांध्यांची रचना या रोबोटमध्ये करण्यात आलेली आहे. इतकंच नाही,  या सांध्यांच्या हालचालींशी मेळ खाणार्‍या हालचाली करण्याची क्षमता त्यांनी मागच्या पायांच्या कार्बन फायबर फ्रेममध्ये जोडलेली आहे.

या रोबोटच्या मागच्या आणि पुढच्या पायांच्या दरम्यान नि पुढे शेपटीपर्यंत सिलिकॉन बेस्ड मेम्ब्रेनच्या वापरून पंखासारखा पडदा बनवलेला आहे. हा वाघळांच्या त्वचेप्रमाणेच पातळ पण तेवढाच चिवट आहे.  शास्त्रज्ञ नुसतं या वटवाघळाचं बाह्यरूप निर्माण करून थांबले नाहीत तर, त्याच्या आत एक सॉफ्टवेअरसुद्धा इन्स्टॉल केलंय. हे सॉफ्टवेअर म्हणे बॅटरीवर चालतं आणि ते बनवताना शास्त्रज्ञांनी वाघळांच्या उडताना होणार्‍या हालचालींचा खूप अभ्यास केला.  हे  सॉफ्टवेअरच सांध्यांच्या आणि पर्यायाने पडद्याच्याही हालचाली नियंत्रित करते. नुसती कल्पनासुद्धा केवढी गुंतागुंतीची वाटतेय ना? पण तुम्हांला माहित आहे, या कल्पनेपेक्षाही आणखीच गुंतागुंतीचा अल्गॉरिदम या सर्व कॉम्पोनंट्सचं नियंत्रण करतो.

एवढं असूनही  या वाघूळ यंत्राचं वजन आहे फक्त ९३ ग्रॅम!! आणि याचं  उड्डाणसुद्धा पाहाण्यासारखंच आहे.. 

मात्र अजूनही यात अनेक सुधारणा आवश्यक आहेत. वाढीव क्षमतेच्या बॅटऱ्या, अधिक स्ट्रॉंग इलेक्ट्रॉनिक कम्पोनन्ट्स आणि जास्तीचा भक्कमपणा या बरोबरच खर्‍या वाघळाच्या सोनार ध्वनीलहरी वापराच्या प्रणाली येण्यास अजून बराच अवकाश आहे.  पण या दृष्टीनंही तंत्रज्ञांचं काम सुरू आहे. विविध अडथळ्यांना चुकवत असा बॅट रोबॉट उडायला आणखी काही काळ नक्कीच द्यावा लागेल.  तरीही तंत्रज्ञांनी रोबॉटीक क्षेत्रात एक मोठी झेप घेतली आहे, हे नक्की!

सबस्क्राईब करा

* indicates required