computer

ॲटमबॉम्ब बनवणारे पण उरलेले आयुष्य त्याविरुद्ध प्रचार करणारे ओपेनहायमर!! काय आहे त्यांची गोष्ट?

काही सिनेमे पाह्यले नाही तर समाज आपलं म्हणेल की नाही हे सांगता येत नाही. ख्रिस्तोफर नोलानचे सिनेमे याच पठडीतले. कळोत अथवा ना कळोत, पाहायला तर लागतातच. आपल्या चित्रपटांमध्ये काळाशी आणि वेळेशी खेळणाऱ्या दिग्दर्शक ख्रिस्तोफर नोलनने २०१७ साली डंकर्क सिनेमा तयार केला. हा सिनेमा दुसऱ्या महायुद्धाला कलाटणी देणाऱ्या ‘डंकर्कची यशस्वी माघार’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या घटनेवर आधारित होता. यानंतर त्याने आपल्या खास शैलीतील ‘टेनेट’ (TENET) सिनेमा तयार केला. आता पुढे तो काय करतो असा प्रश्न विचारला जात असताना त्याने आपल्या नव्या सिनेमाच्या कथेची घोषणा केली आहे. नोलन पुन्हा एकदा दुसऱ्या महायुद्धातल्या एका गोष्टीवर सिनेमा तयार करतोय. हा सिनेमा अणुबॉम्ब तयार करणाऱ्या ‘जे. रॉबर्ट ओपेनहायमर‘ या शास्त्रज्ञावर असणार आहे.
आता अणुबॉम्ब म्हटलं की आईन्स्टाईनची ती प्रसिद्ध E=mc2 थियरी आठवते. मग हे ओपेनहायमर महाशय कोण असा प्रश्न तुम्हाला पडला असणार. आजच्या लेखातून आपण याच शास्त्रज्ञाची ओळख करून घेणार आहोत.

कोण होते ओपेनहायमर? त्यांनी काय काम केलं? अणुबॉम्ब तयार करून जागला हादरा देणारा हा शास्त्रज्ञ अणुबॉम्बला का घाबरून होता? चला तर जाणून घेऊया.
गोष्ट सुरु होते १९४५ सालापासून. दुसरे महायुद्ध सुरु होते. युरोपातल्या युद्धाचा निकाल आता स्पष्ट झाला होता. जर्मनीचा पराभव निश्चित होता, पण जपान अजून शरण यायला तयार नसल्याने मित्र राष्ट्रांच्या विजयावर शिक्कामोर्तब झाले नव्हते. युरोप आणि आशिया खंडात या घडामोडी घडत असताना अमेरिकेत अत्यंत गुप्त पद्धतीने मॅनहॅटन प्रकल्प (Manhattan Project) हाती घेण्यात आला होता. या मॅनहॅटन प्रकल्पाबद्दल आपण जाणून घेऊच, पण त्यापूर्वी आपल्या हिरोची ओळख करून घेऊया.
जे. रोबर्ट ओपेनहायमर म्हणजे ज्युलियस रॉबर्ट ओपेनहायमरचा जन्म २२ एप्रिल १९०४ साली न्यूयॉर्क येथे झाला होता. त्याचे वडील जर्मन स्थलांतरित होते, तर आई मूळची न्यूयॉर्कची होती. वडील कापडाच्या उद्योगात होते आणि आई चित्रकार होती. अशा या जोडप्याच्या पोटी जन्मलेली दोन मुलं पुढे जाऊन विज्ञानाच्या क्षेत्रात शिरली. जे. रोबर्ट ओपेनहायमर यांचा भाऊ फ्रँक यानेही पुढे जाऊन भौतिकशास्त्राची वाट धरली.

आता याठिकाणी मॅनहॅटन प्रकल्पाबद्दल जाणून घेणे योग्य ठरेल. काय होता मॅनहॅटन प्रकल्प?
१९३९ साली लेओ झिझार्ड आणि युगने विग्नर यांनी मिळून एक पत्र तयार केलं. या पत्रावर खुद्द अल्बर्ट आईनस्टाईन यांनी स्वाक्षरी केली. या पत्राला आईनस्टाईन-झिझार्ड लेटर म्हटलं जातं. या पत्राद्वारे आईनस्टाईन आणि इतर मंडळींनी अमेरिकेला ताकीद दिली की जर्मनीकडून अत्यंत ताकदीचा नवीन प्रकारचा बॉम्ब तयार करण्यात येत आहे. जर्मनीला यश मिळण्यापूर्वी अमेरिकेने योग्य त्या हालचाली कराव्यात. हे पत्र वाचून अमेरिका कामाला लागली. अमेरिकेने लवकरच बॉम्ब तयार करण्यासाठी अत्यंत गुप्त प्रकल्प आखला. हा प्रकल्प म्हणजेच मॅनहॅटन प्रकल्प.

हा प्रकल्प किती गुप्त होतां याची एक कल्पना येण्यासाठी या प्रकल्पात होणाऱ्या कामाचे स्वरूप समजून घेऊया. मॅनहॅटन प्रकल्प काय आहे हे केवळ शंभर एक लोकांनाच ठाऊक होते. या शंभर लोकांना मदत करणाऱ्या इतर सहकार्यांना, कामगारांना आपण कशासाठी काम करतोय हेच माहित नव्हतं. या इतर लोकांची संख्या १०,००० पर्यंत होती. डोकं बाजूला ठेऊन काम करणे एवढाच पर्याय त्यांच्यापुढे होता. ज्यांना या प्रकल्पाबद्दल माहित होतं त्यांना स्पष्ट सूचना देण्यात आल्या होत्या क जर या गुप्त कामाबद्दल बाहेर वाच्यता झाली तर दहा वर्षे तुरुंगात काढावे लागतील. याखेरीज १०,००० डॉलर्सचा दंड आकारला जाईल.

पुन्हा एकदा थोड्या आपल्या मुख्या गोष्टीकडे वळूया. ९ ऑक्टोबर, १९४१ साली त्यावेळचे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष फ्रॅन्कलीन रूझवेल्ट यांनी अणुबॉम्ब तयार करण्याच्या प्रक्रियेला हिरवा कंदील दाखवला. अमेरिकेच्या राष्ट्रीय संरक्षण संशोधन समितीचे मुख्य जेम्स बी. कोनंट हे त्यावेळी हार्वर्ड येथे प्राध्यापक होते. त्यांनीच अणुबॉम्ब तयार करण्याच्या या मोहिमेत ओपेनहायमर यांना सामील करून घेतले. या मोहिमेत सामील झाल्यानंतर ओपेनहायमर यांनी जीव तोडून मेहनत केली. त्यांच्यावर सर्वात मोठी जबाबदारी होती ती अणुस्फोटात सुरु होणाऱ्या प्रक्रियेचा अभ्यास करणे. याखेरीज त्यांनी स्वतःच्या विद्यार्थ्यांना तसेच युरोपियन शास्त्रज्ञांना हाताशी घेऊन अणुबॉम्बसाठीची थियरी तयार करण्यासाठी खास वर्ग आयोजित केले. या टीमला बॉम्ब तयार करण्यासाठी लागणाऱ्या संपूर्ण प्रक्रियेचाच अभ्यास करायचा होता.

१९४२ साली अमेरिकन सैन्याने अणुबॉम्ब तयार करण्याच्या मोहिमेत सहभाग घेतला आणि त्याला नाव दिले मॅनहॅटन प्रकल्प. लेस्ली ग्रोव्ह्ज या प्रकल्पाचे मुख्य होते. ग्रोव्ह्ज यांना ओपेनहायमर यांच काम आवडलं होतं, त्यामुळे पुढे जाऊन ग्रोव्ह्ज यांनी ओपेनहायमर यांना शस्त्र प्रयोगशाळेचे मुख्य म्हणून घोषित केले. या घोषणेने अनेकांना धक्का बसला कारण ओपेनहायमर हे डाव्या विचारांचे होते, शिवाय त्यांना मोठे प्रकल्प हाताळण्याचा अनुभवही नव्हता. पण ग्रोव्ह्ज यांना त्यांच्यावर एवढा विश्वास होता की इतरांच्या विरोधाला न ऐकता ओपेनहायमर यांनाच प्रमुखपद देण्यात आलं.
अशा प्रकारे अणुबॉम्ब तयार करण्यात आला. आता लेखाच्या सुरुवातीला दिलेल्या तारखेवर जाऊ. १९४५. नेमकं सांगायचं झालं तर १६ जुलै १९४५. याच दिवशी अणुबॉम्बची यशस्वी चाचणी करण्यात आली होती. ओपेनहायमर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ज्या प्रकल्पासाठी दिवसरात्र मेहनत केली होती ते आता प्रत्यक्षात उतरलं होतं. अणुबॉम्बचा स्फोट झाल्यांनतर ४०,०००० फुट उंच ढग तयार झाला. या स्फोटाला पाहून ओपेनहायमर यांच्या मनात आनंद नव्हता. या ठिकाणी त्यांचं जगप्रसिद्ध वाक्य आपल्या प्रत्येकाने वाचायला हवं. ते म्हणतात, “मला हिंदू धर्मग्रंथ भगवद्गीतेतील ओळ आठवली. आता मी जगाचा विनाश करणारा साक्षात मृत्यू बनलो आहे. आणि मला वाटतं की तिथे प्रत्येकाला हेच वाटत असावं.”

त्यांच्या मनात आलेला हा विचार किती योग्य होता हे पुढे एक महिन्याच्या आतच सगळ्या जगाला समजलं. अनुक्रमे ६ आणि ९ ऑगस्ट रोजी हिरोशिमा आणि नागासाकीवर अणुबॉम्ब टाकण्यात आला. दुसऱ्या हल्ल्यानंतर जपानने शरणागती पत्करली आणि दुसरे महायुद्ध संपले. या दोन घटना जेव्हा मॅनहॅटन प्रकल्पात सामील असलेल्या शास्त्रज्ञांच्या कानावर पडल्या तेव्हा त्यांनाही हादरा बसला. ओपेनहायमर वर्षाच्या अखेरीस तत्कालीन राष्ट्राध्यक्ष हॅरी ट्रुमन यांच्याकडे आंतरराष्ट्रीय पातळीवर अण्वस्त्र निर्मितीवर नियंत्रण आणाण्याची मागणी घेऊन पोचले. पण ट्रुमन यांना भलत्याच गोष्टीची चिंता भासत होती. तोवर शीतयुद्धाला सुरुवात होऊ लागली असल्याने रशियाने अण्वस्त्रे तयार केली तर काय, हा मोठा प्रश्न ट्रुमन यांच्यासमोर होता. त्यामुळे ओपेनहायमर यांच्या मागणीला ताबडतोब धुडकावून लावण्यात आले. ट्रुमन ओपेनहायमर यांच्यावर जवळजवळ खेकसले होते.

असे म्हणतात की ओपेनहायमर यांना जपानमध्ये जे घडलं त्यापेक्षा भविष्यात येऊ घातलेल्या विनाशाची जास्त काळजी होती. ओपेनहायमर यांच्या आयुष्यातील पुढील वर्षे अण्वस्त्रांवर रोख आणण्यासाठी झगडणे यातच खर्ची पडली. महायुद्धानंतर ओपेनहायमर U.S. Atomic Energy संस्थेत काम करत होते. ट्रुमन यांनी १९४९ साली या संस्थेला हायड्रोजन बॉम्ब तयार करण्याचे आदेश दिले. ओपेनहायमर यांनी याला विरोध केला. पण त्यांच्या विरोधाला न जुमानता अमेरिकेने हायड्रोजन बॉम्ब तयार केला. याच काळात त्यांच्यावर साम्यवादी असण्याचे आरोप करण्यात आले. हायड्रोजन बॉम्बला केलेला विरोध आणि साम्यवादी असण्याच्या संशयावरून त्यांना कामावरून काढून टाकण्यात आले. काही अभ्यासकांच्या मते त्यांना नोकरीवरून काढण्यामागे त्यांचा हायड्रोजन बॉम्बला असलेला विरोध जास्त कारणीभूत होता.

दुसऱ्या महायुद्धानंतर अमेरिका रशिया यांच्यात सुरु झालेल्या स्पर्धेत कोणाकडे किती शक्ती आहे याचं प्रदर्शनच सुरु झालं. या धामधुमीत ओपेनहायमर यांचा शांततेचा संदेश राज्यकर्त्यांच्या पाचनी पडला नाही आणि कोणाला ऐकूही गेला नाही. कामावरून काढून टाकल्यानंतरही ते प्राध्यापक म्हणून काम करत राहिले. त्यांनी लेखनही केले. या घटनेपासून सुरु झालेला साम्यवादी असण्याचा शिक्का त्यांना आयुष्यभर पुरला. १८ फेब्रुवारी १९६७ साली त्यांनी या जगाचा निरोप घेतला. ते या जगातून गेल्यानंतरही त्यांच्यावर रशियन गुप्तहेर असल्याचा संशय घेतला जात होता. अमेरिकेच्या या महत्त्वाच्या संशोधकाला ज्याप्रकारे वागणूक मिळाली त्याची भरपाई म्हणून ९ वर्षांनी राष्ट्रध्यक्ष जॉन एफ केनेडी यांनी त्यांचा मरणोत्तर एनरिको फर्मी पुरस्कार देऊन गौरव केला.

आज ओपेनहायमर यांना अणु बॉम्बच्या जनकांपैकी एक मानले जाते. याच ओपेनहायमर यांनी आपले अर्धे आयुष्य अणुबॉम्बचा विरोध करण्यात घालवले हा मोठाच विरोधाभास आहे. ख्रिस्तोफर नोलन या संपूर्ण घटनेला आपल्या शैलीत प्रेक्षकापुढे कसा मांडणार हे आता बघण्यासारखे असेल. लेख आवडला असेल तर शेअर करायला विसरू नका.

ॲटमबाँबच्या जनकाबद्दल वाचलंत, आता हेही वाचा..

सबस्क्राईब करा

* indicates required