गुगलनेही बोभाटा करावा अशी युट्युबर रचना रानडे -शेअर मार्केट हा विषय सोपा करून शिकवणारी, करोडो कमावणारी रचना रानडे !
चौकाचौकात नेते आणि कार्यकर्ते यांची प्रचंड मोठी व्हिनाइल पोस्टर्स बघायची सवय झालेल्या पुणेकरांना या जागतिक महिला दिनाच्यादिवशी गुगलने एक धक्काच दिला. पुण्यात अनेक ठिकाणी उभारलेल्या पोस्टर्सवर एका अनोळखी मुलीचा चेहेरा झळकत होता ! ती मुलगी एखाद्या येऊ घातलेल्या चित्रपटाची नायिका नव्हती- एखाद्या पोटनिवडणूकीची उमेदवार नव्हती .थेट गुगलनेही 'बोभाटा' करावा अशी ही मुलगी कोण ? ही आहे रचना रानडे -युट्युबवर शेअर मार्केट हा विषय सोपा करून शिकवणारी, करोडो कमावणारी रचना फडके-रानडे !
अनोळखी चेहेरा- फारसा परिचित नसलेला विषय असूनही शेअर बाजारात सुपर सेलेब्रिटी स्टेटस असलेली रचना रानडे आहे तरी कोण हेच आज आपण वाचू या आजच्या लेखात !
एकेकाळी शेअर बाजारात गुंतवणूक म्हणजे लाखाचे बारा हजार करणं अशी समजूत होती, निदान मराठी मध्यमवर्गीयांचा तरी असाच समज होता. अर्थात त्यांच्या या समजुतीमागे हर्षद मेहेताच्या जमान्यात हात पोळलेल्या पन्नाशीच्या पुढच्या नागरिकांचा प्रत्यक्ष अनुभव हे कारण आहेच. याला काही अपवाद असले, तरी ते अगदी हाताच्या बोटावर मोजण्याइतकेच.
गेल्या दोन वर्षात ही परिस्थिती काही अंशी बदलत आहे.अनेक लोक शेअर मार्केटकडे गुंतवणुकीची उत्तम संधी म्हणून बघत आहेत. मार्केट शिकवणारे अनेक युट्युबर्स त्यांचा आत्मविश्वास वाढवत आहेत. यातलंच एक आघाडीचं नाव म्हणजे रचना फडके-रानडे. व्यवसायाने सीए असलेल्या रचनाच्या युट्युब चॅनेलला ३५ लाख सबस्क्रायबर्स आहेत, आणि व्हिडिओंना असलेले व्ह्यूज म्हणाल तर करोडोंनी आहेत .
नुकताच तिचा महिला दिनानिमित्त गुगलने सन्मान केला. शेअर मार्केट हा सर्वसामान्यांच्या दृष्टीने काहीसा अनोळखी, गुंतागुंतीचा विषय सोपा करून शिकविण्यात तिचा हातखंडा आहे आणि त्यासाठी तिने युट्युब व्हिडिओचं माध्यम वापरलं आहे. केवळ अध्यापनाच्या माध्यमातून तिने करोडोंचं उत्पन्न मिळवलं आहे.
रचना मूळची पुण्याची. सीए झाल्यानंतर जवळपास दहा वर्षं तिने ऑडिटिंगचा अनुभव घेतला. हे करत असताना तिने पुण्यात एका प्रोफेशनल ॲकॅडमी आणि कॉलेजमध्ये शिकवण्याचं काम केलं. या अनुभवाचा फायदा तिला तिच्या सीए रचना फडके रानडे या युट्युब चॅनलवर शेअर मार्केट शिकवताना झाला. या चॅनलवर शेअर मार्केट संबंधीचे अनेक व्हिडिओज अपलोड केलेले आहेत. २०२० च्या सुरुवातीला या युट्युब चॅनलला चार लाखांपेक्षा जास्त सबस्क्राइबर्स मिळाले.
मुळात या व्हिडिओजच्या निर्मितीची सुरुवात तिच्या काही विद्यार्थ्यांच्या आग्रहाखातर झाली होती. सुरुवातीला तिने बेसिक्स ऑफ स्टॉक मार्केट या विषयावर काही व्हिडिओज युट्युबवर अपलोड केले. उत्तम कंटेंटच्या बळावर तिच्या पहिल्याच व्हिडिओला अफाट प्रतिसाद मिळाला. या व्हिडिओला केवळ तीन महिन्यांतच सुमारे 25000 व्ह्यूज मिळाले. एक कोटीपेक्षा जास्त लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे. मिळालेला उदंड प्रतिसाद बघूनच रचनाने पूर्णवेळ या क्षेत्रातच काम करायचं निश्चित केलं. या व्हिडिओद्वारे अगदी आठ वर्षाच्या मुलापासून ते निवृत्त झालेल्या लोकांपर्यंत सगळ्यांना समजतील अशा प्रकारे स्टॉक मार्केट या विषयातली माहिती ती पोहोचवते. ही माहिती देताना ती रोजच्या आयुष्यातल्या उदाहरणांचा उपयोग करते. त्यामुळे सामान्यांना अप्राप्य वाटणारा शेअर मार्केट सारखा विषय सोपा बनून जातो. तिच्या या चॅनलमुळे मार्केटमध्ये नव्याने प्रवेश करणाऱ्यांना अगदी बेसिक गोष्टीही व्यवस्थित समजतात. तिने आजवर दहा लाख लोकांना ऑनलाईन पद्धतीने शिकवलं आहे. या चॅनलवर तिने अर्थजगत, मोठ्या ब्रँड्सची बिझनेस मॉडेल्स, मार्केट स्ट्रॅटेजी हेही विषय हाताळले आहेत.
यशस्वी युट्युबर होणं सोपं नाही. या नवीन माध्यमाचा परिचय, त्यातले बारकावे, ते हाताळताना घ्यायची दक्षता या सगळ्या गोष्टी त्यात येतात. पण रचनाने तेही आत्मसात केलं आहे. या कामात तिचे मित्र, विद्यार्थी यांची खूप मदत झाली आहे. या तरुण मित्र मंडळींकडूनच रचना कॅमेरा ॲडजस्टमेंट, प्रकाश योजना या गोष्टी शिकली आहे. याशिवाय रचना सादर करते ते कंटेंट उत्तम दर्जा असलेलं असतं. निवडलेल्या विषयाची माहिती लोकांना अगदी मुद्देसूद आणि साध्या सोप्या भाषेत हवी असते. रचनाचे व्हिडिओ पाहताना तिने हीच नस पकडून आपली शैली कशी विकसित केली आहे हे जाणवतं. उदाहरणार्थ बाजारात एखाद्या कंपनीचा शेअर विक्रीसाठी आला तर तो केव्हा घ्यायचा, त्याची निवड करताना कोणते निकष ठेवायचे अशा सर्व गोष्टी या व्हिडिओमध्ये अगदी मुद्देसूद आणि सविस्तर समजावून सांगितल्या जातात. शिवाय रचना अनेक तरुणांना या व्हिडिओतूनच सेव्हिंगचं महत्त्व पटवून देते.
या क्षेत्रात नाव, पैसा कमी वेळात मिळतं असं जरी असलं तरी क्वचित प्रसंगी ट्रोल होणं, वेबसाईट हॅक होणं या गोष्टींचा त्रासही होऊ शकतो. ही झाली या क्षेत्राची दुसरी बाजू. हे धोके टाळण्यासाठी मुळात तंत्रज्ञान समजावून घेणं अतिशय महत्त्वाचं असल्याचं तिचं मत आहे.
रचनाची स्वतःची वेबसाईट आहे. त्यावर ती तिची पूर्वी रेकॉर्ड केलेली लेक्चर्स अपलोड करत असते. यात बाजारपेठेतली गुंतवणूक, केस स्टडीज, टेक्निकल ॲनालिसिस यांचा समावेश असतो. तिने काही पेड कोर्सेस देखील सुरू केले आहेत.
रचना अजून एक महत्त्वाचं काम करतीये. ते म्हणजे फॉरेन्सिक ऑडीटिंग या विषयावर लोकांना प्रशिक्षण देणं. त्यासाठी तिला भारतभर फिरावं लागतं. फॉरेन्सिक ऑडीटिंग हे क्षेत्र आर्थिक घोटाळे, अफरातफरी या गोष्टी टाळण्यासाठी, असे गुन्हे घडल्यास त्यांचा तपास करण्यासाठी विशेष महत्त्वाचं आहे.
मराठी मध्यमवर्गीय नाकासमोर चालणारा मनुष्य आज शेअर मार्केट मध्ये उतरण्याची हिंमत दाखवतो आहे याचं श्रेय रचनासारख्यांना नक्कीच द्यायला हवं.




