computer

रिलायन्स क्लीन एनर्जीच्या क्षेत्रात तब्बल ७५००० कोटी गुंतवणार आहे....रिलायन्सच्या भविष्य बदलणाऱ्या ४ योजना काय आहेत?

एडवीन ड्रेक नावाच्या एका माणसानं १८५९ साली तेलाच्या पहिल्या विहिरीतून कच्चे तेल उपसले आणि पेट्रोलियमच्या युगात आपण पाऊल टाकले. आपण ज्याला 'हायड्रोकार्बन सोसायटी ' म्हणतो त्या समाजव्यवस्थेचा जन्म झाला.नंतरच्या काळात हे काळे सोने शोधायची एक जबरदस्त स्पर्धा सुरु झाली आणि  १९३८ साली मध्यपूर्वेतल्या अपरंपार साठ्याचा शोध लागला. तेव्हापासून आजपर्यंत एखाद्या अब्जाधीशाच्या अय्याश आणि बेताल पोरानी बापाची संपत्ती उधळावी त्याच थाटात आपण पेट्रोलियमचे साठे वापरतो आहोत. एकेकाली मोटरगाड्यांची संख्या काही हजारात होती.२०४० पर्यंत पृथ्वीवर २०० कोटी गाड्या असतील.आता आपल्या माहितीत  असलेला तेलाचा साठा जेमतेन ४७ वर्षे पुरेल इतकाच आहे. ग्रामीण भाषेत एक म्हण आहे 'आगोट आली तोंडावर आणि कवट आलं **' म्हणजे पावसाळ्याची चाहूल लागली आणि कावळीची अंडं देण्याची वेळ आली की कावळा घरटं बांधायला घेतो. आपलं पण तसंच झालं आहे. तेलाचा साठा संपतो आहे-प्रदूषण हाताबाहेर जातंय आणि आपण पर्यायी उर्जा शोधतो आहे.

आता पर्यायी उर्जा कुठेतरी जमा करून ठेवलीय आणि फक्त तारा जोडल्या की झालं काम सुरु असं काही नसतंय. पर्यायी उर्जेचे स्त्रोत अनेक असतील पण ती उर्जा अखंडीत मिळायला हवी.अखंडीत मिळत नसेल तर ती साठवून ठेवण्याचे मार्ग तयार हवेत.हे सगळं परवडणार्‍या किंमतीत बसायला हवं.आतापर्यंत आपण किंमत मोजत होतो.आता किंमत नाही तर 'मूल्य' मोजूनच नवा रस्ता शोधावा लागणार आहे. आतापर्यंत उर्जेच्या प्रत्येक नव्या रस्त्यावर आपण पर्यावरणाचा बळी देत आलो. साहजिकच ती मर्यादा ओलांडल्यावर पर्यावरण आपला बळी देणार आहे हे लक्षात आल्यावर खडबडून जाग आली आणि 'ग्रीन अँड क्लिन एनर्जी'चा शोध सुरु झाला.

आता आपल्याच देशाचे उदाहरण घेऊ या ! एकूण उर्जेपैकी ५५% उर्जा कोळसा जाळून आपल्याला मिळते. म्हणजे ही उर्जा 'ग्रीन अँड क्लिन एनर्जी' नाही. १.८% उर्जा न्युक्लीअर स्टेशन्मधून मिळते. ही उर्जा क्लिन आहे पण ग्रीन नक्कीच नाही. जवळजवळ २१% उर्जा सौर आणि पवन उर्जा आहे जी 'ग्रीन अँड क्लिन एनर्जी' या वर्गात मोडते. आता आपल्याला हा २१% भाग जास्तीतजास्त वाढवायचा असेल तर अत्याधुनिक तंत्राच्या सहाय्याने मोठी गुंतवणूक करावी लागेल. 

या पार्श्वभूमीवर रिलायन्सने ७५००० कोटी रुपयांची गुंतवणूक या नव्या क्षेत्रात करण्याचे जाहीर केल्यावर एकच चर्चा सुरु झाली आहे. ती अशी की :

रिलायन्सचा हा प्लॅन खरोखर चालेल का ? हे शाश्वत स्वच्छ उर्जेचे हे निव्वळ स्वप्न आहे का ? 

तर काहीजणांचे म्हणणे असे आहे आहे की रिलायन्स काहीही करून दाखवू शकते. पण एक गोष्ट नक्की की रिलायन्स जे करू पाहते आहे ते सगळे आतापर्यंत आपल्या देशात कोणीही केलेले नाही. पण हे काय घडते आहे हे समजून घेण्यासाठी आजचा 'बोभाटा'चा लेख पुढे वाचा.

भारताचे २०३० पर्यंतचे सौर उर्जेचे लक्ष्य ४५० गीगा वॅटचे आहे. त्यापैकी १०० गीगा वॅटची  क्षमता उभी करण्याची रिलायन्सची योजना आहे. या योजनेच्या पहिल्या टप्प्यात सौर शक्ती निर्माण करण्यासाठी लागणार्‍या सिलीकॉनचे उत्पादन करणे असेल. यासाठी कच्चा माल म्हणजे वाळू/वाळू सदृश खनीज जे शुध्द करून सिलीकॉन चिप्स बनवाव्या लागतील. त्यातून पॉली सिलीकॉनचे इनगॉट आणि वेफर्सची निर्मिती होईल.सौर उर्जा तयार करण्याची क्षमता वेफर्सच्या शुध्दतेवर अवलंबून असते. सिलिकॉनच्या निर्मितीसाठी लागणारा कच्चा माल आपल्याचकडे नाही तर पृथ्वीवर सर्वत्र सहज उपलब्ध आहे.

चला म्हणजे पहिला अडथळा दूर होऊ शकेल पण पुढचा अडथळा आणखी कठीण आहे. सौर उर्जा फक्त दिवसा मिळते पण एकूण उर्जेची गरज तर २४ तास असते म्हणजेच दिवसा तयार झालेली उर्जा साठवण्यासाठी स्टोअरेज सेल तयार करावे लागतील. अशा सेलची निर्मिती हे मोठे आव्हान असेल त्यासाठी लागणाते तंत्र आणि तंत्रज्ञान गोळा करण्याच्या कामाची सुरुवात झालेली आहे. तरीही रिलायन्स जे काही करणार आहे ते तसे जुनेच आहे.

उर्जा क्षेत्राला आता खरी गरज आहे 'डिसरप्टीव्ह' म्हणजे पारंपारिक विचारांना छेद देणारं काही करण्याची ! रिलायन्स ते करणार आहे एक अ-पारंपारिक इंधन म्हणजे हायड्रोजन वापरून ! पण हायड्रोजन येणार कुठून ? तर तो येणार आहे शुध्द पाण्यातून इलेक्ट्रोलिसिचे तंत्र वापरून ! इलेक्ट्रोलायझर्सची गीगा फॅक्टरी उभी हा रिलायन्सच्या तिसर्‍या टप्प्याचा महत्वाचा भाग असेल. 

यानंतरच्या टप्प्यात रिलायन्स जे करणार आहे ते आजपर्यंतच्या सगळ्या कल्पनांना छेदणारे आहे. चौथा टप्प्यात हवेतून ऑक्सिजन घेऊन त्याची हायड्रोजन सोबत रासायनिक प्रक्रिया घडवून विजनिर्मिती करणारे फ्यूएल सेल बनवले जातील. हे सेल कार-ट्रक किंवा इतर कोणत्याही वाहनात वापरता येतील. थोडक्यात पेट्रोलची गरज भासणार नाही. फ्यूएल सेलचा वापर करून चालणार्‍या इलेक्ट्रीकल व्हेइकलचा सगळ्यात मोठा फायदा असा असेल की त्यामुळे प्रदूषण होणार नाही कारण त्यातून बाहेर पडेल फक्त पाणी !!

आताच्या तारखेस हा स्वप्नविलास वाटण्याची शक्यता आहे पण येत्या काहीच म्हणजे चार पाच वर्षात हे घडणार आहे त्याचे हे चित्र आहे. 

आता या चारी योजनांचा आढावा घेऊ या. सौर उर्जा आतापर्यंत आपल्या ओळखीची झाली आहे. रिलायन्सच्या सौर निर्मितीमुळे प्रदूषण कमी होईल हे पण सत्य आहे  पण सिलीकॉन वेफर्सचे उत्पादन करताना प्रदूषण वाढणार आहे त्याचा काहीही अंदाज अजून नाही.हायड्रोजनचा इंधन म्हणून वापर करणे सध्या तरी एक अत्यंत बिकट प्रक्रिया आहे. हायड्रोजन फ्यूएल सेल पन्नास साठ वर्षांपूर्वीच अपोलो यानात वापरून बघण्यात आले होते. ते उपयुक्त आहेत पण त्यांची किंमत अमेरीकेलाच परवडत नव्हती. आता हे फ्यूएल सेल परवडणार्‍या किमतीत रिलायन्स कसे बनवणार आहे ते येणारा काळच सांगू शकेल.

आता यापुढच्या लेखात आपण सिलीकॉनचे सोलर पॅनेल आणि हायड्रोजन फ्यूएल सेल कसे बनवतात हे समजून घेऊ या.तोपर्यंत या  पर्यायी उर्जेच्या योजना यशस्वी होतील का ? याबद्दल आपले मत कमेंटबॉक्सच्या माध्यमातून आम्हाला नक्की सांगा.

सबस्क्राईब करा

* indicates required