computer

त्या रात्री नक्की काय घडले ? उपग्रह की उल्कापात ? सगळेच अजूनही संभ्रमात !

शनिवार रात्री महाराष्ट्रातील खान्देश, मराठवाडा, विदर्भ या भागातील लोकांना रात्री ८ वाजेच्या सुमारास आकाशातून काहीतरी जाताना दिसले. मात्र हे विमान नाही ना रॉकेट आहे हे समजून जाईल इतके ते स्पष्ट होते. काहींना हा तुटता तारा असेल असे वाटून त्यांनी आपली इच्छा पण त्या ताऱ्याला बघून बोलून दाखवली.

आकाशात असे काही दिसले की उल्का पडतेय का काय? ही पहिली शंका लोकांना असते. यावेळी पण तीच शंका आणि तीच चर्चा सुरू झाली. एखाद दुसऱ्याला दिसले असते तर गोष्ट वेगळी आता अर्धा महाराष्ट्र आणि गुजरात आणि मध्यप्रदेश पण आकाशात ही विचित्र हालचाल दिसल्यावर जो गोंधळ व्हायचा तो झालाच.

अजूनही या गोष्टीबद्दल पुरेशी स्पष्टता नसली तरी, औरंगाबाद येथील अब्दुल कलाम खगोल केंद्राचे संचालक श्रीनिवास औंधकर यांनी लोकांचा बराच संभ्रम दूर केला आहे. त्यांनी हे उल्का वगैरे काही नसून आकाशातून पडणाऱ्या वस्तू किंवा त्या वस्तूंचे अवशेष असल्याचे म्हटले आहे. रॉकेट बूस्टरचे तुकडे असे त्याला म्हटले जाते.

ज्याअर्थी हा प्रकार झाला तेव्हा त्या दिवशी आकाशात एकच रॉकेट उड्डाण झाले ते म्हणजे न्यूझीलँड या देशाने त्यांच्या माहिया द्वीपकल्पावरून लॅबस्काय नावाचा उपग्रह ६ वाजेच्या सुमारास आकाशात सोडण्यात आला. रात्री झालेला प्रकार याच रॉकेटचे तुकडे असावेत असाही अंदाज लावला जात आहे.

ज्या भागात हा प्रकार दिसला तेथे साधारणपणे ३०-३५ किमीच्या उंचीवर बूस्टर वातावरणासोबत घर्षण झाल्याने ते एकामागून एक असे जळत जाताना दिसत होते. यावरून एक गोष्ट निश्चित ती म्हणजे ही उल्का किंवा इतर नैसर्गिक गोष्ट नसून ती मानवनिर्मित रॉकेट बूस्टरचे तुकडे आहेत.

दुसरीकडे त्याच सुमारास चंद्रपूर येथे सिंदेवाही तालुक्यात मोठाल्या आकाराच्या लोखंडी रिंग पडल्याचे समजले आहे. चंद्रपूर आणि बाजूला गडचिरोली अशा दोन्ही ठिकाणी असे रिंग पडल्या आहेत. आकाशातून काहीतरी जाताना दिसणे आणि चंद्रपूर येथे रिंग सापडणे यांची लिंक लावली जात आहे.

चंद्रपूर येथे वर्तुळाकार रिंग आणि गोळे गावाच्या अगदी मधोमध पडले आहेत. ते थोडे जरी इकडेतिकडे पडले असते तरी मोठा अनर्थ घडला असता. ७-१० इंच रुंदी असलेली ही रिंग तपासणीसाठी पाठविण्यात आली आहे. ४० किलो वजनाची ही रिंग अनेक धातूंचा वापर करून तयार करण्यात आली आहे.

कारण चंद्रपूरला जी रिंग सापडली ते पृथ्वीच्या कक्षेत आलेले उपग्रह आहे असे मत खगोलतज्ञानी वर्तवले आहे. समोर आलेले व्हिडिओ आणि फोटो पाहून आकाशातील सॅटेलाईट जमिनीकडे खेचले जाऊन त्याचे तुकडे झाले असावेत आणि ते जळत जळत पृथ्वीवर पडले असावेत असे मत खगोलतज्ञांचे होत आहे.

यात नवा ट्विस्ट आला जेव्हा अमेरिकन शास्त्रज्ञ जोनाथन मॅकडोनाल्ड यांनी हे रॉकेट चीनचे असल्याचा दावा करून चर्चा एकदम वेगळ्या दिशेला नेली आहे, यासाठी त्यांनी दिलेले पुरावे बघितले तर त्यांचे म्हणणे पटायला लागते.

त्यांनी म्हटले आहे की, हे रॉकेट चीनचे चेंग झेंग 3बी असावे. गेल्यावर्षी फेब्रुवारीत आकाशात सोडले गेले होते. हे रॉकेट आता पृथ्वीच्या वातावरणात परत आले आहे. परत जमिनीकडे येत असताना त्याचे तुकडे जळत होते. त्यांनी असाही दावा केला आहे की, हे यान याच मार्गाने पडणार होते.

आकाशात जळणारे रेषा याच कारणाने दिसत होत्या. आठवड्याभरापूर्वी हे रॉकेट ट्रेस करण्यात आले होते. स्पेसट्रॅक नावाचा प्रोजेक्ट हा याच कामावर असतो. त्यांनीच हे ट्रॅक केले होते. याआधी पण चीनचे रॉकेट हिंद महासागरात पडले होते. तेव्हा जगभर त्याची चर्चा झाली होती.

टाकून दिलेले रॉकेटचे टप्पे वातावरणाच्या संपर्कात आल्यावर सहजपणे तुटतात आणि सुरक्षितपणे जळतात मोठे आणि जड रॉकेट कधी कधी सरळ पडण्याऐवजी, टाकून दिल्यावर पृथ्वीभोवती फिरू शकतात. तथापि, या कक्षा स्थिर नसतात आणि ते सतत क्षय होत असतात, वातावरणातून ओढल्यामुळे आणि रॉकेटचे तुकडे शेवटी पृथ्वीवर परत येतात.

हे 3बी रॉकेट चीनचे दुसऱ्या क्रमांकाचे पॉवरफुल रॉकेट आहे. चीन आपल्या अंतराळ कार्यक्रमाबद्दल नेहमी लपवून काम करणारा असल्याने त्यांच्यावर नेहमी संशयाची सुई आणि टीका सुरू असते. यापद्धतीने पृथ्वीच्या कक्षेत परत येणाऱ्या रॉकेटना प्रतिबंध करणारा कायदा नसल्याने यावर कायदेशीर काही करता येत नाही.

यासंबंधी अधिक माहिती शास्त्रज्ञ विश्लेषण करून पुढे आणतील तेव्हा या विषयावर अधिक स्पष्ट असे काहीतरी समोर येऊ शकेल. सध्यातरी आकाशात दिसणारे रॉकेटचे तुकडे चंद्रपूर येथे जाऊन पडले असेच म्हणावे लागेल.

उदय पाटील

सबस्क्राईब करा

* indicates required