computer

पिरॅमिड्स बांधायला ६० लाख टन दगड आणले तरी कसे ? विज्ञानाने उलगडलय रहस्य !!

गिझाचे भलेमोठे पिरॅमिड्स आजही विज्ञानाला, पुरातत्त्वशास्त्राला हुलकावणी देत आहेत. मुख्य प्रश्न असा आहे की एका पिरॅमिड मध्ये तब्बल ६० लाख टन दगड आहेत. हे दगड आजूबाजूच्या कोणत्याच प्रदेशात आढळत नाहीत. मग हे दगड इथवर आणले कसे ? त्यावेळचं तंत्रज्ञान एवढं प्रगत होतं का ? होतं तर ते तंत्र नाहीसं का झालं. असे बरेच प्रश्न निर्माण होतात.

या प्रश्नांची उकल होत नाही म्हणून मग असं म्हटलं जाऊ लागलं की हे कोण्या परग्रहावरील लोकांचं काम आहे. ह्यावर हिस्टरी चॅनेलवर पूर्ण सिरीज दाखवण्यात आली होती. पण आता या सगळ्या कहाण्या घाला केराच्या टोपलीत, कारण अखेर या गोष्टीची उकल झाली आहे.

आधी थोडा इतिहास जाणून घेऊ.

इजिप्तच्या गीझा येथील ३ पिरॅमिड्सना ‘ग्रेट पिरॅमिड्स ऑफ गीझा’ म्हणतात. जवळजवळ इसविसनपूर्व २५६० साली हे पिरॅमिड्स बांधले गेले. या ३ पैकी जो सर्वात मोठा पिरॅमिड आहे त्याला बांधण्यासाठी तब्बल २० वर्ष लागली. या पिरॅमिड मध्ये त्यावेळचा इजिप्शियन फॅरो (राजा) खुफू याला दफन करण्यात आलं होतं.

आता वळूया आपल्या विषयाकडे.

Channel 4 या ब्रिटीश चॅनेलने तयार केलेल्या 'Egypt Great Pyramid: The New Evidence' या डॉक्युमेंटरी मध्ये या गोष्टीचा उलगडा करण्यात आलाय. पिरॅमिड्सचे दगड आणण्यासाठी खास तयार करण्यात आलेल्या नौकांचा वापर करण्यात आला होता. या नौका चालवण्यासाठी तेवढेच कसलेल्या नाविकांची फौज काम करत होती.

या रहस्याचा पत्ता कसा लागला ?

खरं तर हे रहस्य १९५४ सालीच उघड झालं होतं. पुरातत्त्वशास्त्रज्ञांना पिरॅमिड्सच्या खालच्या बाजूला मोठ्याप्रमाणात लाकडं आढळली होती. नंतर ही लाकडं काळजीपूर्वक तिथून काढण्यात आली. दगडी पिरॅमिड्सच्या खाली लाकूड का आहे याचा त्यावेळी उलगडा झाला नव्हता, पण आजच्या प्रगत तंत्रज्ञानामुळे याबद्दल ठोस माहिती मिळाली आहे. ज्या जहाजावर दगडं लादण्यात आली होती ते जहाज नंतर तोडण्यात आलं. मिळालेली लाकडं याच जहाजाची आहेत.

हे दगड आणले कुठून ?

गीझाच्या जवळपास हे दगड आढळत नाहीत. त्यासाठी त्यावेळच्या इंजिनियर्सन तोरा नावाच्या खाणीपर्यंत पर्यंत जावं लागलं. तोरा ही खाण इजिप्तची राजधानी कैरो येथे होती. कैरो आणि गीझा मध्ये नाईल नदी आहे. या नदीतूनच कैरो ते गीझा दगड आणण्यात आले.

 

तर मंडळी, ही नवीन थियरी तुम्हाला पटते का, की अजूनही तुमचा हिस्टरी चॅनेलवर विश्वास आहे ??