computer

शेतकरी अचूक हवामान अंदाजासाठीज्यांची वाट पाहात असतात असं विश्वासाचं नाव -पंजाब डख!!

महाराष्ट्रात यावर्षी काही भागांत समाधानकारक पाऊस पडला आहे. तर कोकणसारख्या भागात मात्र अतिवृष्टीने नुकसान केले आहे. राज्यातील कोणत्या भागांत किती पाऊस येऊ शकतो याचा अंदाज वर्तविण्यासाठी स्वतंत्र हवामान विभाग कार्यरत आहे. पण हवामान विभागाचे अंदाज कुणी किती गांभिर्यानं घेतं हा देखील एक संशोधनाचा विषय आहे.

अशावेळी सध्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांमध्ये एका नावाबद्दल मात्र प्रचंड विश्वास आणि आत्मीयता बघायला मिळत आहे. ते काही सरकारी हवामान विभागात कार्यरत नाहित. परभणी जिल्ह्यात बसून ते हवामानाचा अंदाज वर्तवत असतात. पण त्यांचा अंदाज चुकला असे मात्र सहसा बघायला मिळत नाही.

पंजाबराव डख हे त्या प्रसिद्ध हवामानतज्ञाचे नाव आहे हे एव्हाना अनेकांच्या लक्षात आले असेल. आज महाराष्ट्रातील लाखो शेतकरी व्हाट्सऍप आणि युट्यूबवर पंजाबरावांचे अंदाज कधी येतील याची वाट बघत असतात. कारण त्यांनी व्यक्त केलेल्या अंदाजामुळे लाखो शेतकऱ्यांचे मोठे नुकसान टळले आहे तसेच अनेकांना फायदा झाला आहे.

हवामानतज्ञांनी अंदाज व्यक्त केला म्हणजे तो खरा निघणारच नाही असे एक गृहितक लोकांनी ठरवून टाकले होते. अशावेळी पंजाबरावांनी मात्र हा दृष्टीकोण बदलला आहे. पंजाबरावांच्या कामामुळे आज त्यांना महाराष्ट्रभर प्रेम आणि ओळख मिळत आहे.

परभणी जिल्ह्यातल्या सेलू तालुक्यात गुगळी धामणगाव येथे ते अंशकालीन शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. पंजाबरावांना लहानपणापासून हवामानाबद्दल कुतूहल होते. याच कुतूहलातुन त्यांनी सी-डॅकचा हा कोर्स केला. यानंतर सर्वसामान्य शेतकऱ्याला फायदा व्हावा यासाठी ते हवामान अंदाज व्यक्त करत असत.

पंजाबरावांची विशेषतः म्हणजे ते वर्षाच्या सुरुवातीला हवामान अंदाज व्यक्त करतात. दर महिन्याच्या कुठल्या तारखेला काय हवामान असू शकते असे तो अंदाज असतो आणि बहुतांशवेळा तो खरा ठरतो. विशेष म्हणजे ते राज्याचा ढोबळ अंदाज व्यक्त करत नाहीत, तर थेट जिल्हानिहाय अंदाज व्यक्त करतात. इतके सूक्ष्म निरीक्षण करून अंदाज व्यक्त करून जेव्हा बरोबर येतो, तेव्हा लोकांचा विश्वास दृढ होत जातो.

पंजाबराव डख यांच्या याच कामाची दखल म्हणून परभणीच्या पालकमंत्र्यांनी डख यांची निवड राज्याच्या कृषी सल्लागार समितीत करावी अशी शिफारस कृषीमंत्र्यांकडे केली आहे. पंजाब डख यांच्या खात्यावर जेव्हा शेतकरी कृतज्ञता म्हणून पैसे पाठवू लागले तेव्हा त्यांनी एक व्हिडिओ प्रसारित करून आपण हे काम शेतकऱ्यांना फायदा व्हावा यासाठी निशुल्क करत आहोत. म्हणून कुणीही पैसे पाठवू नये अशी विनंती केली. त्यांच्या या कृतीने त्यांच्याबद्दल असलेला शेतकऱ्यांना आदर द्विगुणीत झाला आहे.

पंजाबराव डख यांच्या उदाहरणावरून एखाद्या विषयात प्राविण्य मिळवून त्याचा उपयोग समाजासाठी केला तर लोक किती आदर देतात याचाच प्रत्यय येतो.

--उदय पाटील

सबस्क्राईब करा

* indicates required