computer

मधमाशा नाचतात म्हणजे त्या एकमेकांशी बोलत असतात?? चला आज मधमाशांची भाषा समजून घेऊयात!!

आपल्या संस्कृत मध्ये निळावंती नावाचा एक ग्रंथ आहे. असं म्हणतात की हा ग्रंथ वाचून कोणीही पशुपक्षांची, प्राण्यांची भाषा समजू शकतो आणि त्यांच्याशी संवाद साधू शकतो. मंडळी, आजच्या काळात वाचायला कोणाला वेळ आहे आणि निळावंतीचं म्हणाल तर अशी अफवा आहे की निळावंती वाचून लोकांना वेड लागतं आणि ते ६ महिन्यातच मरतात. या अफवेने तर निळावंतीच्या वाटेला कोणी सहसा जात नाही.

पण आजच्या जमान्यात विज्ञान फार पुढे गेलेलं आहे. निळावंती जरी नाही वाचली तरी विज्ञानाच्या आधारे तुम्ही प्राण्यांशी संवाद साधू शकता. नुकतंच वैज्ञानिकांनी चक्क मधमाशांची भाषा समजण्यासाठी तंत्रज्ञान विकसित केलं आहे. यानिमित्ताने आपण पाहूया मधमाशा कशा संवाद साधतात आणि त्याचा माणसाला कसा उपयोग होणार आहे ?

मंडळी, मधमाशा जवळपास असल्या की घोंगावण्याचा आवाज येतो. आपल्याला सहज वाटू शकतं की मधमाशा या आवाजाद्वारे एकमेकांशी बोलतात, पण खरं तर ते त्यांच्या पंखांच्या आवाजापलीकडे काहीही नसतं. त्या चक्क नाचून एकमेकांशी बोलतात राव.

वेगवेगळ्या गोष्टी इतरांना सांगण्यासाठी मधमाशांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे नाचाचे प्रकार असतात. हे प्रकार समजून घेणं हे सर्वात मोठं आवाहन होतं. वर्जिनिया टेकच्या संशोधकांच्या टीमने हे समजून घेण्यासाठी तंत्रज्ञान विकसित केलं आहे. हे तंत्रज्ञान मधमाशांची भाषा भाषांतरित करतं. अशा प्रकारे आता आपण जगभरच्या मधमाशांची भाषा समजून घेऊ शकतो.

मंडळी, फार पूर्वीपासून माणूस मधमाशांना समजून घेण्यासाठी धडपडत आहे. काही प्रमाणात आपल्याला यशही आलं होतं पण हे ज्ञान फारच प्रमाणात होतं. मधमाशांच्या वेगवेगळ्या जाती आहेत आणि त्यानुसार त्यांच्या संवादाचे प्रकार पण वेगळे आहेत. संशोधकांना हे प्रकार योग्य रीतीने समजून घेण्यासाठी संशोधनात काही निवडक मधमाशांना तयार करावं लागलं. त्यांच्यासाठी एका ठराविक जागी अन्न ठेवण्यात आलं आणि तिथवर पोहोचण्यासाठी त्या कशा प्रकारे एकमेकांशी बोलतात हे तपासण्यात आलं.

या संशोधनातून आलेली माहिती आधी उपलब्ध असलेल्या माहितीशी तपासण्यात आली. यातून जे निघालं त्याद्वारे जागतिक दर्जाचं ‘भाषांतर’ तयार करण्यात आलं.

मंडळी, एक गमतीदार गोष्ट म्हणजे मधमाशांना वेगवेगळ्या भाषांचा त्रास होत नाही. जसं आपल्याला जर्मन, जपानी, आफ्रिकन भाषा समजत नाही तसं मधमाशांच्या बाबतीत नसतं. त्या मधमाशांच्या वेगवेगळ्या प्रजातीच्या भाषा समजू शकतात. त्या आपापसात या भाषा कशा भाषांतरित करतात हे अजूनही न उलगडलेलं कोडंच आहे.

मधमाशांची भाषा शिकून आपल्याला काय करायचंय ?

राव, हा प्रश्न तुम्हालाही पडला असेल. याचं उत्तर असं की मधमाशा या अत्यंत महत्वाच्या असतात.  आपले आईन्स्टाईन तात्या म्हणून गेलेत की मधमाशा जर नष्ट झाल्या तर माणसाचं अस्तित्व ४ दिवसात संपुष्टात येईल. यासाठी मधमाशांच संगोपन झालं पाहिजे. बऱ्याचदा नवीन बांधकामाचा मधमाशांवर परिणाम होतो. त्यांची भाषा शिकून घेतल्याने त्यांचा अन्नाचा स्रोत लक्षात घेऊन नवीन बांधकाम उभारता येईल. असं केल्याने मधमाशा धोक्यात येणार नाहीत.

कदाचित पुढे जाऊन या माहितीच्या आधारे आपण इतर प्राण्यांच्या भाषा समजून घेऊ शकतो. त्याअर्थी हा एक क्रांतिकारी शोध आहे.

 

 

आणखी वाचा :

चांगला मध कसा ओळखावा? या वाचा दोन सोप्या पद्धती..

बहुगुणी मध- जाणून घ्या आयुर्वेद काय म्हणतो..

सबस्क्राईब करा

* indicates required