हार्टफेलसाठी स्मार्ट शीटचा उपाय

Subscribe to Bobhata

हार्ट फेल्युअर म्हणजे हृदयानं काम बंद करणं.  सध्या जगात लाखों लोकांना या परिस्थितीला तोंड द्यावं लागत आहे. हृदय कमकुवत होणं, हृदयाकडून रक्ताभिसरणाचं काम नीट न होणं, हृदयाचे ठोके अनियमित होणं या आणि अशा अनेक लक्षणांपासून हार्ट फेल्युअरची अवस्था उत्पन्न होऊ शकते. पण असं असूनही  आजपर्यंत या रोगाच्या मुळापर्यंत जाऊन इलाज करेल असा कुठलाच उपचार  नव्हता. रोग्यामध्ये ही अवस्था फारच वाढीला लागली तर हार्ट ट्रान्स्प्लान्ट म्हणजेच दुसऱ्याचं हृदय बसवणं याशिवाय दुसरा उपाय उरत नाही.

भारतात हार्ट ट्रान्स्प्लान्ट सहजासहजी होतही नाही. मग अशावेळी डॉक्टर्स पेशन्टच्या हृदयात पंपिंग करणारं एक इलेक्ट्रॉनिक यंत्र बसवतात.  हे यंत्र हृदयाच्या पेशींना रक्ताभिसरणाच्या कामात मदत करतं.  मात्र यात कृत्रिम वॉल्व्ज् आणि पंपाचा रक्ताशी प्रत्यक्ष संपर्क येत असल्यानं पेशन्टला इन्फेक्शन होऊ शकतं  आणि त्याच्या रक्ताच्या गुठळ्या बनण्याची शक्यता असते.

मात्र सध्या यावर खात्रीशीर उपाय सापडलय असं म्हणता यावं अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. शास्त्रज्ञांनी स्मार्ट मटेरियलपासून हृदयाच्या बाह्य आवरणासारख्या द्रव्याची एक मऊ, रोबोटीक शीट बनवली आहे. ही शीट कृत्रीम स्नायूंसारखी काम करते. या शीटपासून बनलेल्या पिशवीसारख्या साधनाद्वारे हृदयाला चांगला आधार दिला जातो आणि ती हृदयाला निरनिराळ्या जागी दाब देऊन आणि शोषून घेऊन रक्ताभिसरणासाठी मदत करते. हृदयाला लावलेला पेसमेकर वायरद्वारे या शीटला सिग्नल देतो आणि सांगतो की शीटने कुठे दाब द्यायचाय, कुठे आकर्षून घ्यायचंय. यातून हृदयाच्या नैसर्गिक लयीत पंपिंगची नक्कल होण्यासारखी प्रक्रिया होते आणि रक्ताभिसरण सुधारते. (सोबतचा विडीओ बघा.)

प्राण्यांवर संशोधनाचा भाग म्हणून याचा प्रयोग हार्टपेशंट असलेल्या डुकरांवर करण्यात आला. यात हृदयगति केवळ ४७% असणा-या डुकरावर या शीटच्या साधनाचा वापर केला असता हृदयगतीमध्ये ९७% पर्यंत सुधारणा झाल्याचे दिसून आले. ही शीट मानवांसाठी उपयोगात येण्यासाठी अजून वेळ लागेल कारण आवश्यक सुरक्षानिकषांवर अधिक संशोधन सुरू आहे. असं असलं तरी भविष्यात हे हृदयावरण हृदय रोग्यांसाठी उपयुक्त ठरेल यात कसलीही शंका वाटत नाही.

सबस्क्राईब करा

* indicates required