computer

दूध,तेल,पेट्रोल यासारखे द्रव पदार्थ वाहून नेणारे टँकर हे नेहमीच सिलिंड्रिकल आकाराचे का असतात.?

रस्त्यावरून धावणाऱ्या गाड्यांकडे पाहण्यात एक वेगळाच आनंद लपलेला आहे. वेगवेगळ्या आकाराच्या, रंगाच्या, प्रकारच्या या गाड्यांकडे पाहत बसल्यावर वेळ कसा जातो ते कळणार तर नाहीच पण धावत्या चाकांकडं पाहताना डोक्यातील चाकं थांबल्याचा अनुभव काही क्षण तरी घेता येतो. तर रस्त्यावरून धावणाऱ्या या गाड्याकडं पाहताना तुम्ही कधी विचार केला आहे का, की दूध, तेल, पेट्रोल यासारखे द्रव पदार्थ वाहून नेणारे ट्रक किंवा टँकर हे नेहमीच सिलिंड्रिकल आकाराचे असतात. आता या गाड्यांचा आकार असा ठेवण्यामागे काही शास्त्र आहे की, आपलं बरं दिसतं म्हणून या विशिष्ट पद्धतीच्या गाड्या वापरल्या जातात? तुम्हाला याबद्दल काही माहिती आहे का? 

द्रव पदार्थ वाहून नेण्यासाठी सिलींड्रिकल आकाराच्याच गाड्या का वापरल्या जातात? यामागचं कारण आज आपण या लेखातून जाणून घेणार आहोत. 

सिलींड्रिकल आकाराऐवजी जर आयताकृती आकाराचे टँकर वापरले तर एकावेळी आणखी जास्त पदार्थ वाहून नेता येईल असं तुम्हालाही वाटतं का?पण तरीही कुठेच कधी अशा आकाराचे टँकर दिसत मात्र नाहीत.

पाणी, पेट्रोल किंवा गॅसची वाहतूक करणाऱ्या या ट्रक्सना टँक ट्रक किंवा टँकर्स म्हटले जाते. हे टँकर्स लहान असो की मोठे यांचा आकार मात्र एकसारखाच असतो. सिलिंड्रिकल म्हणजेच लांब वर्तुळाकार आकाराच्या या टँकच्या पृष्ठभाग समतल राहतो. त्यात कुठेही विक स्पॉट राहत नाही. त्यामुळे सगळ्या बाजूंनी लिक्विड प्रेशर सारख्या प्रमाणात राहते.

 
द्रव पदार्थाची वाहतूक करताना ते स्थिर राहण्याची आवश्यकता असते. कारण, द्रव पदार्थ प्रवासात हेंदकळून सांडण्याची जास्त शक्यता असते. चौकोनी आकाराच्या कंटेनरमध्ये असे पदार्थ जास्त हेंदकळण्याची शक्यता असते. लंबगोलाकार आकाराच्या टँकरमध्ये हे द्रव जास्त न हेंदकळता स्थिर राहते, कारण याचे गुरुत्वाकर्षण केंद्र आणि जमिनीचा गुरुत्वाकर्षण केंद्र हे जवळपास सारख्या स्तरावर राहते. चौकोनी आकाराच्या टँकरमध्ये हे शक्य नसते.


टँकर जेव्हा थांबवला जातो तेव्हा हा द्रव सांडण्याची शक्यता असते. कारण, गतिशील पदार्थाची गती थांबवली तरी त्याची हालचाल लगेच बंद होत नाही. तसेच वळण घेताना देखील टँकरचा वेग कमी जास्त होतो अशावेळी आतील द्रव पदार्थ हलतो. पेट्रोल किंवा गॅस जर असा सतत हलून चालत नाही. चौकोनी किंवा आयताकार आकाराच्या टँकरमध्ये द्रव पदार्थ खूपच हलण्याची शक्यता असते. याचे कारण आपण आधीच पहिले आहे. म्हणून हे टँकर लंबगोलाकार आकाराचे असतात. 

 

शिवाय, जेव्हा आतील द्रव पदार्थ रिकामा करण्याची वेळ येते तेव्हाही चौकोनी आकारापेक्षा लंबगोलाकार आकार जास्त सोयीचा ठरतो. कोणत्याच एका बाजूला द्रव पदार्थ साचून राहत नाही. 

टँकर स्वच्छ करतानाही चौकोनी आकारापेक्षा गोलाकार आकार जास्त फायदेशीर ठरतो. कारण, चौकोनाच्या कोपरे स्वच्छ करणे अवघड जाते. मात्र, गोलाकार आकारात कुठेच कोपरे येत नाहीत ज्यामुळे हे टँकर सहज स्वच्छ होतात. 

अशा सगळ्या परिणामांचा विचार करूनच द्रव पदार्थाच्या वाहतुकीसाठी वापरले जाणारे टँकर हे सिलिंड्रिकल आकाराचे बनवले जातात. 

मेघश्री श्रेष्ठी

सबस्क्राईब करा

* indicates required