computer

क्रिकेट पंधरी लॉर्ड्सवरती शतक न झळकवू शकलेले देशोदेशीचे महान फलंदाज!!

इंग्लंडमधील लॉर्ड्स मैदानाला क्रिकेटची पंढरी म्हटली जाते. लॉर्ड्स मैदान म्हणले की आठवतो तो १९८३चा विश्वचषक उंचावतानाचा कपिल देव! याच मैदानावर भारताने १९८३ मध्ये वेस्ट इंडिजचा पराभव करून पहिल्यांदा विश्वचषक जिंकला होता. नंतर आठवतो तो सौरव गांगुली! याच मैदानाच्या बाल्कनीत २००२ च्या नॅटवेस्ट सिरीजच्या अंतिम फेरीत विजयी धाव घेताच कर्णधार सौरव गांगुलीने आपला शर्ट काढून आनंद व्यक्त केला होता. या मैदानावरची शतक झळकावण्याचे प्रत्येक खेळाडूचे स्वप्न असते. पण जागतिक क्रिकेटमध्ये असे अनेक दिग्गज झाले आहेत, ज्यांनी वर्षानुवर्षे क्रिकेट खेळले, परंतु त्यांना लॉर्ड्सच्या मैदानावर शतक करण्याची संधी मिळाली नाही. चला आज या फलंदाजांची माहिती घेऊया.

जॅक कॅलिस:

साऊथ आफ्रिकेचा जॅक कॅलिस हा सर्वोत्तम फलंदाज आहे हे तुम्हाला माहीत आहेच. सचिन तेंडुलकर नंतर सर्वाधिक कसोटी शतकांचा विक्रम जॅक कॅलिसच्या नावावर आहे. त्याने आपल्या कारकिर्दीत अनेक विक्रम केले. पण लॉर्ड्सवर त्याची बॅट कधी शतक करू शकली नाही. येथे खेळल्या गेलेल्या पाच डावांमध्ये त्याची धावसंख्या ०, ७,१३,३,३१ म्हणजेच एकूण ५४ धावा होती.

रिकी पाँटिंग:

ऑस्ट्रेलियाचा सर्वात यशस्वी कर्णधार आणि आघाडीचा फलंदाज म्हणून रिकी पाँटिंगचे नाव घेतले जाते. त्याच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियाने २००३ आणि २००७ विश्वचषक जिंकले. सन २००० मध्ये त्यांच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियन संघाने जागतिक क्रिकेटवर वर्चस्व गाजवले. पाँटिंगने प्रत्येक देशाविरुद्ध शतके झळकावली आहेत. पण लॉर्ड्सवर खेळलेल्या ८ डावांत त्याला एकही शतक करता आलेले नाही. या मैदानावर त्याचा स्कोअर- १४, ४, ९, ४२, २, ३८, २६ आणि ० म्हणजे फक्त १३५ धावा असा होता.

सुनील गावस्कर:

जगातील सर्वात महान फलंदाजांपैकी एक नाव म्हणजे गावसकर! सचिन तेंडुलकरपूर्वी या दिग्गज खेळाडूच्या नावावर सर्वाधिक कसोटी शतकांचा विक्रम होता. गावसकर यांनीच भारतीय फलंदाजी गाजवली. इतकेच नाही तर ७० च्या दशकात वेस्ट इंडिजच्या घातक गोलंदाजीसमोर तो हेल्मेटशिवाय खेळायचा. मुंबईच्या या खेळाडूने ३४ कसोटी शतके झळकावली आहेत, त्यापैकी १३ वेस्ट इंडिजविरुद्ध आहेत, ज्यात ३ द्विशतकांचा समावेश आहे. पण लॉर्ड्सवरील १० डावांमध्ये त्याची धावसंख्या ४, ५३, ४९, ५, ४२, ५९, ४८, २४, ३४ आणि २२ अशी आहे. यात एकही शतक नाही.

ब्रायन लारा:


कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक वैयक्तिक ४०० धावा करण्याचा विक्रम लाराच्या नावावर आहे. सचिन तेंडुलकरच्या आधी सर्वाधिक कसोटी धावांचा विक्रम त्याच्या नावावर होता. लारा हा त्याच्या काळातील सर्वोत्तम खेळाडूंपैकी एक होता. त्याची आणि सचिन तेंडुलकरची अनेकदा तुलना झाली. पण लॉर्ड्सवर त्याची बॅट शतक झळकावण्यात अपयशी ठरली. येथे खेळल्या गेलेल्या ६ डावांमध्ये त्याची धावसंख्या ६, ५४,६,५,११,४४ अशी आहे.

सचिन तेंडुलकर:

या नावावर क्रिकेटचा कोणताही विक्रम नाही असे वाटतच नाही ना? कारण क्रिकेटचा देव म्हटल्या जाणाऱ्या सचिनने आपल्या कारकिर्दीत प्रत्येक टप्पा गाठला आहे. २०० कसोटी खेळून ५१ शतके झळकावणाऱ्या सचिनला लॉर्डसवर एकही शतक झळकावता आले नाही. या मैदानावर त्याने ९ डाव खेळले. पण शतक काय, इथे त्याला अर्धशतकही करता आले नाही. ९ डावांत त्याची धावसंख्या २०,२७,३१,१६,१२,३७,१६,३४ आणि १२ अशी आहे.

काही गोष्टी अपूर्ण राहतात पण या खेळाडूंशिवाय क्रिकेट जगत अपूर्णच आहे, नाही का?

शीतल दरंदळे

सबस्क्राईब करा

* indicates required