FIFAचा मोठा सन्मान 'कॅप्टन फंटास्टिक' सुनील छेत्रीच्या आयुष्यावर आधारित बायोपिक होणार प्रदर्शित..

ख्रिस्तीयानो रोनाल्डो आणि लियोनेल मेस्सी हे जगातील फुटबॉल चाहत्यांच्या गळ्यातील ताईत आहेत. फुटबॉल विश्व या दोघांमध्ये वाटले गेलेले नेहमी दिसते. पण या दोघांच्या तोडीचा फुटबॉलपटू भारतातही आहे हे अनेकांच्या खिजगणतीत नाही. भारतीय फुटबॉल संघाचा माजी कर्णधार सुनील छेत्री जगातील तिसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक गोल करणारा खेळाडू आहे. सुनील छेत्री खेळाडू म्हणून मेस्सी आणि रोनाल्डोपेक्षा जराही कमी नाही. पण आजवर त्याला हवे तसे प्रोत्साहन आणि संधी कधीच मिळाली नाही. आता मात्र खुद्द फिफाने या गोष्टीवर शिक्कामोर्तब केले आहे. 

फिफा (International Federation of Association Football) सुनील छेत्रीच्या आयुष्यावर आधारित एक सिरीज प्रदर्शित करणार आहे. याविषयी ट्विट करताना फिफाने म्हटले आहे "तुम्हाला रोनाल्डो आणि मेस्सीबद्दल माहिती आहे. आता जगातील सर्वाधिक गोल करणाऱ्या तिसऱ्या क्रमांकाच्या खेळाडूबद्दल जाणून घ्या." आपल्या देशातील खेळाडूची दखल फुटबॉलमधील सर्वात मोठी संस्था घेते ही आपल्यासाठी निश्चितच अभिमानाची बाब आहे.

 

कॅप्टन फंटास्टिक या नावाने ही सिरीज फिफा प्लसवर प्रसारित होणार आहे. या सिरीजमध्ये तीन एपिसोड असणार असून या माध्यमातून सुनील छेत्रीचे महत्त्व जगाला कळावे असा प्रयत्न केला जाणार आहे. या सिरीजमध्ये तो कसा फुटबॉलपटू झाला यापासून तर त्याचे विविध विक्रम आणि एकूण प्रवास मांडण्यात येणार आहे. 

लहानपणापासून त्याचे फुटबॉल प्रेम, २० वर्षांच्या वयात छेत्रीचे भारतीय फुटबॉल संघात पदार्पण, त्याचे त्याच्या भावी बायकोसोबतचे प्रेमसंबंध तसेच त्याच्या आयुष्यातील इतर अनेक महत्वपूर्ण घटनांचा पट या माध्यमातून मांडला जाणार आहे. सध्या सक्रिय असलेल्या खेळाडूंपैकी रोनाल्डो (११७) आणि मेस्सी (९०) यांच्यानंतर छेत्रीच्या नावावर ८४ गोल्स नोंदले गेले आहेत. 

छेत्रीच्या कामगिरीच्या जोरावरच भारताने आजवर फुटबॉलमध्ये जे काही यश मिळाले ते साध्य केले आहे. २००७,२००९, २०१२ नेहरू ट्रॉफी आणि २०११, २०१५,२०२१ साली साऊथ एशियन फुटबॉल फेडरेशन चॅम्पियनशिप जिंकण्यात छेत्रीचा मोलाचा वाटा होता. त्याचप्रमाणे तब्बल ७ वेळेस ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशनचा 'फुटबॉलर ऑफ द इयर' पुरस्कार जिंकण्याचा विक्रम देखील त्याच्या नावावर आहे.

३८ वर्षीय सुनील छेत्रीचा गतवर्षी 'मेजर ध्यानचंद खेलरत्न', हा देशातील क्रीडापटूला देण्यात येणारा सर्वात मोठा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. तसेच २०१९ साली त्याला पद्मश्री पुरस्कार देखील मिळाला आहे. जगात फुटबॉल हा तसा सर्वाधिक लोकप्रिय खेळ आहे. भारतात देखील या खेळाचे चाहते मोठया प्रमाणावर आहेत.

असे असूनही भारत फुटबॉलच्या बाबतीत पिछाडीवर आहे. भारतात जगातील तिसऱ्या क्रमाकांचा फुटबॉल खेळाडू असूनही भारताला फिफा वर्ल्डकपमध्ये साधी जागा पण मिळवता येते नाही, हे दुर्दवी आहे. गेली १५ वर्ष एकटा सुनील छेत्री भारतीय फुटबॉल संघाची खिंड लढवताना दिसत आहे. 

सुनील छेत्री सारखा महान खेळाडू भारताकडे असूनही त्याला नसलेली प्रसिद्धी ही गोष्ट आपण आपल्या 'टॅलेंट'ची किती कदर करतो, याचे उदाहरण आहे. फिफाने छेत्रीचे महत्व जगाला सांगितले तेव्हा जगाला आता माहीत होईल की रोनाल्डो आणि मेस्सी नंतर त्याच तोडीचा खेळाडू भारतात राहतो. 

सुनील छेत्रीच्या या सन्मानानंतर भारतात देखील पुढिल काळात जगतिक दर्जाचे फुटबॉलपटू निर्माण होतील अशी अपेक्षा व्यक्त करता येईल.

सबस्क्राईब करा

* indicates required