बेस प्राईजवर बोली लागलेल्या या खेळाडूंनी भल्याभल्यांना पाजलं पाणी, पाहा टॉप ५ खेळाडूंची यादी

आयपीएल २०२२(Ipl 2022) स्पर्धेसाठी झालेल्या लिलावात काही खेळाडूंवर कोट्यवधींची बोली लागली होती. तर काही खेळाडू असे देखील होते ज्यांना केवळ मूळ किमतीत खरेदी करण्यात आले होते. या हंगामात कोट्यवधी रुपये खर्च करून संघात स्थान दिलेले खेळाडू चांगली कामगिरी करण्यात पूर्णपणे अपयशी ठरले आहेत. तर मूळ किमतीत खरेदी करण्यात आलेले काही खेळाडू असे देखील आहेत ज्यांनी आपल्या कामगिरीने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. कोण आहेत ते खेळाडू ? चला पाहूया.

) भानुका राजपक्षे (Bhanuka Rajpakshe :

आयसीसी टी-२० विश्वचषक २०२१ स्पर्धेत श्रीलंकेचा फलंदाज भानुका राजपक्षेने तुफान फटकेबाजी करत सर्वांचेच लक्ष वेधून घेतले होते. आयपीएल २०२२ स्पर्धेच्या लिलावासाठी त्याची मूळ किंमत ५० लाख रुपये होती. असा अंदाज व्यक्त केला गेला होता की, या खेळाडूला आपल्या संघात स्थान देण्यासाठी सर्व संघांमध्ये स्पर्धा पाहायला मिळेल. परंतु असे काहीच झाले नाही. शेवटी पंजाब किंग्ज संघाने ५० लाखांच्या मूळ किमतीत त्याला आपल्या संघात स्थान दिले.

) मुकेश चौधरी (Mukesh Chaudhari):

मुकेश चौधरीला चेन्नई सुपर किंग्ज संघाने केवळ २० लाख रुपयांच्या मूळ किमतीत आपल्या संघात स्थान दिले होते. इतर कुठल्याही फ्रँचायजिने त्याला आपल्या संघात स्थान देण्यात रस दाखवला नव्हता. या हंगामातील सुरुवातीच्या काही सामन्यात त्याला संधी मिळाली नव्हती. परंतु दीपक चाहर दुखापतीमुळे संघाबाहेर झाल्यानंतर त्याला संधी मिळाली आणि त्याने संधीचं सोनं केलं. सध्या तो या संघातील प्रमुख वेगवान गोलंदाज आहे.

) मोहसीन खान (Mohsin Khan):

पहिल्यांदाच आयपीएल स्पर्धा खेळत असलेल्या लखनऊ सुपरजायंट्स संघाने आतापर्यंत या स्पर्धेत अप्रतिम कामगिरी केली आहे. केएल राहुलच्या नेतृत्वाखाली खेळणारा हा संघ प्लेऑफमध्ये जाण्याच्या मार्गावर आहे. आयपीएल २०२२ स्पर्धेतील लिलावाच्या वेळी या संघाने युवा खेळाडूंना आपल्या संघात स्थान देण्यावर अधिक भर दिला होता. त्यापैकीच एक खेळाडू म्हणजे मोहसीन खान. २० लाखांच्या मूळ किमतीत मोहसीन खानला लखनऊ संघात स्थान देण्यात आले होते. आतापर्यंत त्याला ५ सामने खेळण्याची संधी मिळाली आहे. या ५ सामन्यात त्याने ९ गडी बाद केले आहेत. येणाऱ्या सामन्यात त्याच्या कामगिरीवर सर्वांचे लक्ष असणार आहे.

) उमेश यादव (Umesh yadav) : 

भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज उमेश यादव याला आयपीएल स्पर्धेच्या गेल्या काही हंगामात साजेशी कामगिरी करण्यात अपयश आले होते. त्यामुळे असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता की, तो यावेळी अनसोल्ड होऊ शकतो. त्याची मूळ किंमत २ कोटी रुपये इतकी होती. लिलाव प्रक्रियेतील पहिल्या फेरीत तो अनसोल्ड झाला होता. त्यानंतर दुसऱ्या फेरीत कोलकाता नाईट रायडर्स संघाने त्याला २ कोटींच्या मूळ किमतीत आपल्या संघात स्थान दिले होते. त्याची निवड झाल्यानंतर अनेकांना आश्चर्य झाले होते. परंतु नंतर त्याने आपल्या कामगिरीने सर्वांना आश्चर्यचकित केले. त्याने या हंगामातील १० सामन्यात १५ गडी बाद केले आहेत.

) टीम साऊदी (Tim Southee):

कोलकाता नाईट रायडर्स संघाने टीम साऊदीला १.५ कोटींच्या मूळ किमतीत आपल्या संघात स्थान दिले होते. त्याला सुरुवातीच्या काही सामन्यात संधी देण्यात आली होती. ज्यात त्याने खेळलेल्या ७ सामन्यात १२ गडी बाद केले होते. त्यानंतर पॅट कमिन्सचे पुनरागमन झाल्यानंतर त्याला प्लेइंग ११ मध्ये खेळण्याची संधी मिळाली नाही.

सबस्क्राईब करा

* indicates required