computer

झुलन गोस्वामीवरचा सिनेमा पाहाल तेव्हा पाहाल, पण त्यापूर्वी तिच्या जागतिक अणि देशस्तरावरच्या या १३ कामगिऱ्या तर जाणून घ्या!!

 

चकडा एक्सप्रेसचा टीझर आताच प्रदर्शित झाला. अनुष्का शर्मा यामध्ये झुलन गोस्वामीच्या भूमिकेत दिसणार आहे अशी चर्चा आहे. भारतात क्रिकेटची अक्षरश: पूजा होते, पण महिला क्रिकेट संघाची ओळख फारशी कोणाला नाही.
झुलन गोस्वामीने भारतीय क्रिकेट संघाचा चेहरामोहरा बदलून टाकला. एक वेगवान गोलंदाज आणि भारतीय महिला संघाची माजी कर्णधार म्हणून झुलन गोस्वामी हे नाव क्रिकेटप्रेमींना परिचित असेल. पण त्याशिवाय अनेक विक्रमही तिच्या नावावर आहेत . आज आपण या दमदार खेळाडूची ओळख करून घेऊयात.

झुलन गोस्वामी मूळची पश्चिम बंगालची आहे. झुलन गोस्वामीचा जन्म २५ नोव्हेंबर १९८२ रोजी येथील नादिया जिल्ह्यात झाला. झुलनच्या आईचे नाव झरना आणि वडिलांचे नाव निशित गोस्वामी आहे. झुलनचे वडील इंडियन एअरलाइन्समध्ये काम करतात. झुलनचे सुरुवातीचे शिक्षण जिल्ह्यातील चकडा शहरात झाले. तिला लहानपणापासूनच खेळाची आवड होती, पण तिच्या आईला झुलनचे मुलांसोबत क्रिकेट खेळणे आवडत नव्हते. त्या काळात झुलन टेनिस बॉलने गोलंदाजी करत असे. मुलं तिच्या गोलंदाजीवर चौकार-षटकार मारायचे आणि झुलनच्या संथ गोलंदाजीची खिल्ली उडवायचे. तिथेच झूलनने ठरवले की ती एक वेगवान गोलंदाज होणार.

भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी चकडा ते कोलकाता हा ८० किमी लांबीचा प्रवास तिला जवळजवळ रोज करावा लागला. ती आठवड्यातून तीन दिवस पहाटे साडेचार वाजता उठून पहाटे ५ वाजता कोलकात्याला जाणारी सकाळची ट्रेन पकडायची आणि मग सरावासाठी सकाळी ७:३० वाजता पोहोचायची. २ तास सराव केल्यानंतर परत शाळेत परतावे लागे. त्यासाठी परत दोन तासांचा प्रवास. या खडतर प्रवासाने तिला अजून कणखर बनवले. तिचे मार्गदर्शक स्वपन साधू तिच्या गोलंदाजीमुळे प्रभवित झाले होते. ती नक्कीच एक मोठी गोलंदाज बनणार याची त्यांना खात्री होती, म्हणून ते तिच्या कुटुंबाशीही बोलले. त्यामुळे झुलनला कुटुंबाकडून होणारा विरोध कमी झाला.

झुलनला जानेवारी २००२ मध्ये वयाच्या १९ व्या वर्षी इंग्लंडविरुद्धच्या वनडे मालिकेत भारतीय महिला क्रिकेट संघातून पहिल्यांदा खेळण्याची संधी मिळाली. तिने उजव्या उजव्या हाताने मध्यम-वेगाने गोलंदाजी केली. मिताली राजसोबतच्या पहिल्या भेटीत तिने तिला शून्यावर बाद केले. तिचे गोलंदाजी कौशल्य सुधारण्यासाठी ती तिच्या नियमित सराव सत्रानंतर पाच ते सहा षटके जादा टाकत असे.

तिने प्रयत्नपूर्वक साध्य केलेल्या काही अव्हिव्हमेंट्स:

१. ताशी १२० किमी या वेगाने गोलंदाजी करणारी सर्व काळातील सर्वोत्कृष्ट महिला वेगवान गोलंदाजांपैकी एक म्हणून झुलन ओळखली जाते.
याशिवाय झुलन गोस्वामीच्या नावावर अनेक विक्रम आहेत.
२. झुलन गोस्वामी ही जगातील दुसरी वेगवान गोलंदाज आहे.
३. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये २००० पेक्षा जास्त षटके टाकणारी झुलन गोस्वामी ही जगातील एकमेव महिला गोलंदाज आहे.
४. इतकेच नाही तर झुलन गोस्वामी ही महिला वनडे क्रिकेटच्या इतिहासात सर्वाधिक विकेट घेणारी गोलंदाज आहे. तीने एकूण ३३३ आंतरराष्ट्रीय विकेट्स घेतल्या आहेत.
५. आशिया चषक स्पर्धेत एकदिवसीय सामन्यात १०० बळी घेणारी झुलन चौथी महिला ठरली.
६. २००८-२०११ पर्यंत तिने संघाचे नेतृत्वही केले.
७. २००७ मध्ये तिने महिला क्रिकेटर ऑफ द इयर जिंकला.
८. २०१० साली तिला अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
९. २०१२ साली तिला सर्वोच्च पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
१०. २०१६ मध्ये जानेवारीत ICC महिला ODI बॉलिंग रँकिंगमध्ये झुलन प्रथम स्थानावर होती.
११. २०१८ ला झुलनच्याच्या सन्मानार्थ भारतीय टपाल तिकीट जारी करण्यात आले.
१२. २०२० मध्ये ICC महिला ODI क्रिकेटर ऑफ द डिकेड पुरस्कारासाठी तिचे नामांकन करण्यात आले.
१३. २०२१ मध्ये इंग्लंडच्या महिला क्रिकेट संघाविरुद्धच्या एकमेव सामन्यासाठी भारताच्या कसोटी संघात तिची निवड करण्यात आली होती.

तिच्या कामगिरीने ती भारताचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठे केले आहे. तिला अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. झुलनची ही कामगिरी वाचल्यावर नक्कीच अनेकजणीना प्रेरणा मिळेल. पुरुषांची मक्तेदारी असलेल्या या खेळात एका महिला क्रिकेटरने नाव कमावणे खरच सोपे नाही. प्रवाहाविरुद्ध चालून नाव कमावणाऱ्या खेळाडूची ही कहाणी तुम्हाला आवडली का?

लेख आवडला तर जरूर कमेंट करून सांगा.

शीतल दरंदळे

सबस्क्राईब करा

* indicates required