computer

धोनीच्या ग्लोव्हजची काय भानगड आहे ? या संपूर्ण प्रकरणाची माहिती जाणून घ्या एका क्लिकवर !!

६ जून रोजी भारताचा २०१९ च्या वर्ल्डकप मधला पहिला सामना होता. हा सामना आपण दणक्यात जिंकला. दुसऱ्या दिवशी या सामन्यातली एक गोष्ट सगळ्यांच्या लक्षात आली. महेंद्र सिंग धोनीच्या हातात जे विकेटकीपरचे हातमोजे होते ते नेहमीचे, साधारण मोजे नव्हते. त्यावर पॅराशूट रेजिमेंटचं चिन्ह होतं.

मंडळी, वर्ल्डकपसारख्या मोठ्या खेळमहोत्सवात आपल्या देशाच्या सैन्याचं चिन्ह झळकलं होतं. आपल्या भारतीयांना या गोष्टीचा अभिमानाच वाटणार, पण ICC ला मात्र ही गोष्ट खुपली आहे.

काय आहे प्रकरण?

ICC ने धोनीला हे हातमोजे वापरू नको म्हणून सांगितलंय. आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या नियमांप्रमाणे धर्म, राजकारण, सैन्याविषयक, जाहिरात दर्शवणारी कोणतीही गोष्ट क्रिकेटरच्या कपड्यांवर किंवा साधनांवर नसायला हवी. धोनीचे हातमोजे या नियमांना तोडणारे आहेत असं सांगून ICC ने विरोध केला आहे.

BCCI काय म्हणणं आहे ?

वरील नियमातली एक महत्वाची गोष्ट म्हणजे क्रिकेटरच्या जर्सीवर, हातमोज्यांवर, टोपीवर अशी कोणतीही गोष्ट लावण्यापूर्वी स्थानिक क्रिकेट बोर्डाची, संघाची आणि ICC ची परवानगी घ्यावी लागते. या प्रकरणात BCCI धोनीच्या बाजूने आहे. BCCI ने म्हटलंय की धोनीने कोणताही नियम तोडलेला नाही. हे चिन्ह जर पॅराशूट रेजिमेंटचं चिन्ह वाटत असेल तर तेही चुकीचं आहे.

ते कसं? त्याचं असंय मंडळी, की पॅराशूट रेजिमेंटच्या चिन्हावर जो “बलिदान” शब्द असतो, तो या चिन्हावर नाही. या कारणाने तो केवळ एक चिन्ह म्हणून उरतो ज्याचा काहीही अर्थ होत नाही.

आपण या दोन्ही बाजू बघितल्या पण अंतिम निर्णय हा ICC च घेते. काल संध्याकाळी बातमी आली की ICC ने शेवटच्या निर्णयात धोनीला परवानगी नाकारली आहे. हा अंतिम निर्णय अर्थातच भारतीयांना पटलेला नाही.

 

पॅराशूट रेजिमेंटबद्दल थोडक्यात

पॅराशूट रेजिमेंट हे सर्वात जुने सैन्यदल आहे. त्यांचं काम हे पॅराशूटने शत्रूच्या प्रदेशात घुसून त्यांची कोंडी करण्याचं असतं. दुसरे महायुद्ध, भारत पाकिस्तान युद्ध, कोरियन युद्ध (वैद्यकीय मदतीसाठी), १९७१चं युद्ध, कारगिल युद्ध (ऑपरेशन विजय) अशा महत्वाच्या युद्धांमध्ये पॅराशूट रेजिमेंटने महत्वाची भूमिका बजावली होती.

सध्या सगळेच धोनीच्या हातमोज्यांवरच्या चिन्हाला पॅराशूट रेजिमेंटचं चिन्ह म्हणत आहेत, पण इथे एक छोटी चूक होत आहे. हे चिन्ह पॅराशूट रेजिमेंटचं नसून त्याचाच एक भाग असलेल्या स्पेशल फोर्सचं चिन्ह आहे. या चिन्हावर खंजीर आणि पंख या दोन प्रमुख गोष्टी दिसतात. सोबत बलिदान हे अक्षर दिसतं.

पॅराशूट रेजिमेंटचं मुख्य चिन्ह मात्र वेगळं आहे. त्यांचं काम हे सगळ्या सैन्याला आकाशमार्गाने मदत करण्याचं असल्याने त्यांच्या मुख्य चिन्हावर पॅराशूट दिसून येतो. सोबत एक खंजीर आणि आणि झेपावण्यासाठी पसरलेले पंखही दिसत आहेत. या चिन्हावर इंग्रजीत Parachute Regiment नाव कोरलेलं असतं.

मंडळी, धोनीच्या हातांवर पॅराशूट रेजिमेंटचं चिन्ह दिसण्यामागचं कारण कदाचित तुम्हाला माहित असेल. ज्यांना माहित नसेल त्यांच्यासाठी सांगतो. धोनी भाऊंना २०११ साली १०६ व्या इन्फंट्री बटालियन टेरीटोरीयल आर्मी तर्फे मानद म्हणून लेफ्टनंट कर्नल पदवी देण्यात आली आहे.

तर मंडळी, धोनीला ICC ने केलेला विरोध तुम्हाला बरोबर वाटतो का ? तुमचं मत नक्की द्या. चर्चा झाली पाहिजे राव.