...आणि २०१७ ची महाराष्ट्र केसरीची गदा विराजमान झाली अभिजितच्या खांद्यांवर!!

‘.....आणि २०१७ ची महाराष्ट्र केसरीची गदा विराजमान झाली अभिजितच्या खांद्यांवर’ हे वाक्य ऐकण्यासाठी त्याचे चाहते आतुरलेले होते. चाहत्यांची ही इच्छा त्याने अखेर पूर्ण केलीच. मागील वर्षीची कसर त्याने भरून काढलीच. खरंतर शेवटच्या ३० सेकंदात त्याने किरण भगतवर कब्जा घेतला आणि आपला हुकुमी एक्का बाहेर काढला... भारंदाज... आणि मानाची चांदीची गदा स्वत:कडे खेचून आणली.

खरंच कुस्ती म्हणजे वेळेचा खेळ. या ६ मिनिटांसाठी पैलवान वर्षानुवर्ष मेहनत करतात आणि कुस्तीशौकीन सुद्धा डोळ्यात तेल ओतून त्यांच्या खेळीकडे पाहत असतात. आजच्या कुस्तीतही लाखोंचा जनसमुदाय आपल्या डोळ्याने आपापल्या लाडक्या पठ्ठ्याला ओवाळत होता. अभिजित आणि किरण मैदानावर आल्यावर सगळ्यांनी एकच जल्लोष करत त्यांचं स्वागत केलं. त्यांनीही एकमेकांना प्रेमाचं, मैत्रीचं आलिंगन दिलं.

माजी कृषीमंत्री शरद पवार आणि अन्य मान्यवरांचे आशिर्वाद घेत कुस्तीला प्रारंभ केला. सुरूवातीच्या काही सेकंदातच धोकादायक हात आकडीने किरणच्या हाताला दुखापत झाली. किरणच्या चाहत्याच्या हृदयाचा ठोकाच चुकला. आता तो खेळ थांबवेल अशी त्यांना भीती वाटली. पण,  तेवढ्यातच किरण परत आखाड्यात आला. पुन्हा जल्लोष दोघंही उजव्या पवित्र्यावर खेळत होते. दोघांनी सुरूवातीचे काही सेकंद एकमेकांच्या ताकदीचा अंदाज घेतला. पंजे की पकड सुरू झाली. त्यानंतर ख-या कुस्तीला सुरूवात झाली.

स्रोत

सुरूवातीला अभिजितने एका गुणाची कमाई केली. त्यानंतर किरणचा पटाला लागण्याचा प्रयत्न हुकला आणि अभिजितने किरणवर कब्जा घेत अजून दोन गुणांची कमाई केली. अभिजितच्या हातात लढत जातीये हे जाणवल्याने किरणने अभिजितची झोळी सोडवत त्याच्यावर कब्जा घेत एका गुणाची कमाई केली. अभिजितने हात खेचल्याने तो फाऊल मानत पंचांनी किरणला दोन गुण दिले. त्यामुळे पहिल्या फेरीत दोघंही समान गुणांवर होते.

दुस-या फेरीत किरणने आक्रमक होत बाहेरून आकडी घेणं म्हणजेच कुंडी डाव हे त्याचं ब्रह्मास्त्र वापरत ४ गुणांची कमाई केली. आता किरण ७ गुणांवर होता. तितक्यात अभिजितने किरणवर कब्जा घेत एक गुण मिळवला. पण तरीही किरण पुढेच होता. किरण आता विजयाच्या जवळ पोहोचलाय असं वाटत असतानाच किरणचा ढाक लावण्याचा प्रयत्न हुकला आणि अभिजितने किरणला खाली पाडत दोन गुणांची कमाई केली. त्यानंतर आपली हुकुमत असलेला भारंदाज डाव मारत अभिजितने आणखी दोन गुणांची कमाई केली. आता किरणला मागे टाकत अभिजित ८ गुणांवर पोहोचला होता. कुस्ती अभिजीतकडे जाऊ नये म्हणून किरणने आक्रमक पवित्रा घेत पुन्हा कुंडी लावायचा प्रयत्न केला. पण यावेळेस तो फसला....आणि अभिजितने कुस्तीबरोबरच चांदीच्या गदेवरही आपलं नाव कोरलं... चाहत्यांनी एकच जल्लोष करत मैदानावर ताबा घेतला.. अभिजितला चाहत्यांनी पूर्णपणे वेढलं. चांदीच्या गदेबरोबरच लाखोंची मनंही त्याने जिंकली...

स्रोत

 

लेखन क्रेडिट : महाराष्ट्र रेसलिंग चॅम्पियन्स लीगच्या