computer

समीर बॅनर्जीने विम्बल्डन ज्युनियर जिंकून इतिहास रचलाय....त्याच्या विषयी संपूर्ण माहिती जाणून घ्या!!

नोवाक जोकोविच, रॉजर फेडरर, राफेल नदाल ही टेनिसमधील दिग्गज नावे आहेत. जगातल्या अगदी काही मोजक्या लोकांना या खेळाडूंबद्दल माहिती नसेल. टेनिसमधील अनेक ग्रँडस्लॅम जिंकत हे खेळाडू सातत्याने टेनिसमधील आपले कौशल्य सिद्ध करत आहेत. पण या खेळाडूंनंतर कोण असा प्रश्न आता विचारला जाऊ लागला आहे. त्याला उत्तरही तयार होत आहे आणि विशेष म्हणजे त्याचे कनेक्शन हे भारताशी आहे. 

समीर बॅनर्जी नावाच्या एका भारतीय वंशाच्या अमेरिकन खेळाडूने विम्बल्डन ज्युनियर ग्रॅण्डस्लम टायटल जिंकले आहे. व्हिक्टर लिलोव याला फायनलमध्ये हरवल्यावर हा किताब त्याच्या नावे जमा झाला. हे त्याचे पहिलेच मोठे यश असल्याने जगभर त्याची दखल घेतली जात आहे. समीर अवघ्या १७ वर्षांचा आहे. यावर्षी झालेल्या फ्रेंच ओपन स्पर्धेत पहिल्याच राउंडमध्ये हरल्यावर त्याचे हे यश दैदीप्यमान म्हणावे असे आहे.

समीरचे वडील आसामचे आहेत, तर आई आंध्रप्रदेशातील. नोकरीच्या शोधात ते ८०च्या दशकात अमेरिकेत गेले आणि तेथेच स्थायिक झाले. आज समीर जरी अमेरिकेकडून खेळत असला तरी भारतीयांना त्याचा अभिमान आहे. ही गोष्ट स्वतः समीरसुद्धा मान्य करतो. आपल्याला मैदानावर चहूबाजूंनी भारतीयांकडून प्रोत्साहन मिळत होते हे त्याने सांगितले. समीरचे शशी थरुर, प्रियंका चतुर्वेदी, हरदीप सिंग पुरी अशा नेत्यांकडून कौतुक करण्यात आले. तसेच इतरही मोठ्या सेलेब्रिटींपासून सामान्य नागरिकांपर्यंत सर्वच त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव करत आहेत. 

समीरच्या आधी फक्त ४ भारतीयांना ज्युनियर ग्रँड स्लॅमचा किताब जिंकता आला आहे. यात युकी भांबरी, ऑस्ट्रेलियन ओपन (२००९), लियांडर पेस विम्बल्डन (१९९०), रमेश कृष्णन फ्रेंच ओपन आणि विम्बल्डन (१९७९), रामनाथन कृष्णन (१९५४) यांचा समावेश आहे.

समीरचे वय पाहता अजून त्याच्याकडे भरपूर वेळ आहे. सध्या त्याचा भर शिक्षण पूर्ण करण्यावर आहे. असे असले तरी सध्याची खेळी बघता भविष्यात टेनिसचा मोठा खेळाडू म्हणून नाव लौकिक मिळवण्याची चुणूक त्याने दाखवून दिली आहे.

सबस्क्राईब करा

* indicates required