computer

हा दूधवाला फॉर्म्युला-१ कारने दूध घालायला जातो? प्रकरण भारतातलंच आहे, एकदा पाहून घ्या!!

परिस्थिती गंभीर तिथे भाऊ खंबीर हे वाक्य अनेकदा ऐकले असेल. भारतीयांना हे वाक्य बरोबर लागू होते. कारण आपण कोणत्याही परिस्थितीत असा जुगाड लावतो ज्याचा कुणी अंदाजही लावू शकत नाही. म्हणूनच भारतीय आणि जुगाड हे समीकरण जगात फेमस आहे. सध्या असेच एक जुगाड इंटरनेटला वेड लावत आहे.

दूधवाला माणूस मोटरसायकल वापरता वापरता कार वापरू लागला अशी उदाहरणं तुम्ही बघितली असतील. पण हा व्हायरल होणारा दूधवाला चक्क फॉर्म्युला वन गाडीवर गेला आहे. तर झाले असे की एका दुधवाल्याने दूध वाहून नेण्यासाठी बरेच दुधाचे कॅन ठेवता येतील अशी गाडी बनविण्याचा प्रयत्न केला. या प्रयत्नात त्याने थेट फॉर्म्युला वन गाडीसारखीच हुबेहूब गाडी बनवून टाकली.

रस्त्याने जाणाऱ्या एकाने या मिनी फॉर्म्युला वन कारचा व्हिडिओ काढला आणि तो ट्विटरवर पोस्ट केला. साहजिक व्हिडिओ व्हायरल व्हायला वेळ लागला नाही. नेहमीप्रमाणे आनंद महिंद्रांनीही या भाऊंचे कौतुक करून टाकले. आपली याच्यासोबत भेट घडवून आणा असे देखील त्यांनी म्हटले. आनंद महिंद्रा यांच्या रुपाने अशा भन्नाट आयडिया करणाऱ्या लोकांना मोठा पाठीराखाच भेटलाय.

विशेष म्हणजे या फॉर्म्युला वन सदृश गाडीने दूध वाहणाऱ्या या भावाचा पेहरावही फॉर्म्युला वन रेसरसारखाच होता. काळे जॅकेट आणि हेल्मेट घालून पठ्ठ्या थेट दूध द्यायला चालला होता. हा दूधवाला भाऊ कुठला आहे कोण आहे याची माहिती होऊ शकलेली नाही. मात्र त्याने मार्केट खाल्ले हे निश्चित! आता कदाचित त्याला यातून चांगली संधी पण मिळू शकते.

नेटकऱ्यांनी यावर पण आपल्या विविध प्रतिक्रिया दिल्या, काहींनी जेव्हा फॉर्म्युला वन ड्रायव्हर बनण्याचे स्वप्न पाहताना माणूस दूधवाला होतो, तेव्हा असे होते असे म्हटले आहे. एकाने याला सर्वात वेगवान दूधवाला म्हटले तर एकाने त्याच्या हेल्मेटचे कौतुक केले आहे. अशा पद्धतीने आपल्या आगळ्यावेगळ्या जुगाडाच्या माध्यमातून हा भाऊ प्रसिद्ध झाला आहे.

उदय पाटील

सबस्क्राईब करा

* indicates required