computer

रंजन नेगी: भारतीय महिला हॉकी संघाला यश मिळवून देणारे खरेखुरे 'कबीर खान'....

भारताने यंदाच्या ऑलिम्पिकमध्ये दमदार प्रदर्शन करत आजवर सर्वाधिक पदके मिळवली आहेत. त्यातही भारताचा राष्ट्रीय खेळ हॉकीमध्ये केलेले प्रदर्शन तर सगळ्यांच्या डोळ्याचे पारणे फेडणारे होते. पुरुष आणि महिला अशा दोन्ही संघांनी सुंदर प्रदर्शन केले. यावेळी अनेकांना चक दे इंडियाची आठवण झाली. काहींनी या यशाचे थोडेफार श्रेय या सिनेमालाही देऊ केले. जर सिनेमाचे श्रेय आहे तर हा सिनेमा ज्या व्यक्तीवरून तयार झाला आहे त्याचे श्रेय पण मोठेच असेल ना? चला तर भारतीय महिला हॉकी संघाला जिंकणे शिकवणाऱ्या रंजन नेगी यांच्याबद्दल जाणून घेऊया.

रंजन नेगी यांचा प्रवास खऱ्या अर्थाने सिनेमाला शोभावा असाच आहे. रंजन नेगी हे भारतीय हॉकी संघाचे एक महत्त्वाचे खेळाडू होते. त्याकाळी भारतीय हॉकी संघ जगात महत्त्वाचा संघ होता. नुकतेच १९८० ऑलिम्पिकमध्ये भारताने सुवर्णपदक प्राप्त केले होते. अशातच १९८२ साली एशियन गेम्स आयोजीत करण्यात आले होते.

आज ज्याप्रमाणे भारत पाकिस्तान क्रिकेट सामना म्हणजे प्रतिष्ठेचा खेळ असतो तसेच त्यावेळी हॉकीचा भारत-पाकिस्तान सामना म्हणजे एखादे युद्ध असे समजले जात असे. त्यातच आशिया खेळांसारखी स्पर्धा असल्याने दोन्ही संघ जोरात होते. रंजन नेगी भारतीय संघाचे गोलकीपर होते. सामना सुरू झाला आणि भारताला ७-० असा नामुष्कीजनक पराभव पत्करावा लागला.

या पराभवाचे पूर्ण खापर फुटले ते नेगी यांच्यावर. त्यांना देशभर प्रचंड टीका सहन करावी लागली. यामुळे ते पूर्णपणे अज्ञातवासात निघून गेले. अनेक वर्ष ते सगळ्यांपासून दूर होते. तुम्ही अनेक सिनेमांमध्ये बघितले असेल एखादा खेळाडू बदनामीमुळे खेळापासून दूर होतो आणि त्याच्या शिष्यांना विजय मिळवून देत धमाकेदार एन्ट्री करतो

चक दे इंडिया हा पूर्णपणे तसाच सिनेमा होता. रंजन नेगी यांनी २००० सालादरम्यान प्रशिक्षक म्हणून कमबॅक केले. भारतीय महिला संघाचे गोलकिपर प्रशिक्षक म्हणून त्यांनी काम सुरू केले. त्यांच्या प्रशिक्षणाने अक्षरशः धमाल उडवून दिली. भारतीय हॉकीची क्रेझ सातत्याने होत असलेल्या पराभवाने पूर्ण झाकोळली गेली होती.

२००२ साली कॉमनवेल्थ गेम्समध्ये भारतीय महिला हॉकी संघाने सुवर्णपदक प्राप्त केले. २००४ साली एशियन गेम्समध्ये पण पुन्हा सुवर्णपदक प्राप्त केले. नेगी यांच्या प्रशिक्षणाने जादू केली होती. भारतीय महिला हॉकी संघाच्या लागोपाठ दोन मोठ्या स्पर्धांमध्ये मिळवलेल्या सुवर्णपदकामुळे भारताचा जगात दबदबा निर्माण झाला.

ज्या एशियन गेम्समध्ये खराब खेळ केला म्हणून नेगी यांना त्रास झाला त्याच एशियन गेम्समध्ये त्यांनी प्रशिक्षक म्हणून सुवर्णपदक प्राप्त करून दिले. आज भारतात संघाची वाटचाल बघता त्यात नेगी यांचे योगदान मोठे आहे हे मान्य करावेच लागेल.

सबस्क्राईब करा

* indicates required