computer

९ ऑगस्ट भारताचा सहभागः आज पदकाची अपेक्षा नाही

कालचे महत्त्वाचे निकालः

काल नेमबाजीमध्ये गगन नारंगने क्वालिफिकेशनची फेरी पार केली नाही. मात्र अभिनव बिंद्राने ७व्या रँकसह फायनल मध्ये प्रवेश मिळवला. अंतिम स्पर्धेत अत्यंत अटीतटीच्या सामन्यात (इतका अटीतटीचा की शेवटी तिसर्‍या स्थानासाठी एकेक गोळीचा स्वतंत्र शूट-ऑफ घ्यावा लागला) अभिनव बिंद्राचे पदक थोडक्यात हुकले व त्याला चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले.

तर पुरुष ट्रॅप स्पर्धेत मानवजीत संधुला आठव्या स्थानावर समाधान मानावे लागले. 

महिला तिरंदाजीमध्ये अपेक्षेप्रमाणे लक्ष्मीराणी मांझी हिला पहिल्या फेरीतच हार पत्करावी लागली.

पुरुष हॉकीमध्ये जर्मनी आणि भारताचा सामना बरोबरीत सुटतोय असे वाटत असतानाच शेवटचे तीन सेकंद राहिला असताना केलेल्या गोल मुळे जर्मनीने भारताला २-१ असे हरवले.

महिला हॉकीमध्ये मात्र ब्रिटनने भारताला ३-० असे सहज हरवले.

जलतरण स्पर्धेत शिवानी आणि साजन या दोघांना अनुक्रमे ४१ व २८व्या स्थानावर समाधान मानावे लागले.

आज काय?:

ब्राझिलवेळेनुसार सकाळी, म्हणजे भारतात संध्याकाळपासून चौथ्या दिवशीच्या खेळांना सुरूवात होईल. 

नौकानयन(रोइंग)

पुरुषांच्या सिंगल स्कल स्पर्धेत दतू भोकनळ उपांत्यपूर्व फेरीत खेळेल. दत्तूची स्पर्धा ५:३० च्या सुमारास चालू होईल. 

नेमबाजी

संध्याकाळी ५:३०: संध्याकाळी २५मी पिस्टल स्पर्धेला सुरूवात होईल. आज याची क्वालिफिकेशन फेरी म्हणजे पात्रता फेरीपासून अंतिम फेरीपर्यंत सर्व फेर्‍या होतील. यात भारतातर्फे हीना सिधू सहभागी असेल. 

तिरंदाजी

पुरुषांच्या वैयक्तिक स्पर्धांना सुरूवात होईल. यात भारताच्या 'अतानु दास'चा ५वा रँक आहे. आता दोन दोन स्पर्धकांचे समोरासमोर असे नॉक-आउट पद्धतीने सामने होतील.  भा.प्र.वे.नुसार रात्री ८:०५ वाजता अतानुचा सामना नेपाळच्या जीतबहादूरशी होईल. हा सामना जिंकल्यास पुढील फेरीही आजच रात्री होईल. जे खेळाडू हे दोन्ही सामने जिंकतील त्यांचे पुढील सामने शुक्रवारी असतील. 

हॉकी

संध्याकाळी ७:३० वाजता पुरुष हॉकीमध्ये भारतीय संघ अर्जेंटिनाला भिडेल. भारत सध्या ब गटात चौथ्या स्थानावर आहे.

बॉक्सिंग

७५ किलो वजनी गटाच्या स्पर्धांना आज सुरूवात होईल. याची आज पहिली फेरी असेल. भारतातर्फे विकास यादव यात सहभागी असेल.

पदकाची अपेक्षा

आज ज्या स्पर्धांमध्ये पदके प्रदान होणार आहेत त्यापैकी केवळ शूटिंगमध्ये भारताचा सहभाग आहे. यात हीना सिधू ही वर्ल्ड कपमधील सुर्वर्णपदक विजेती असली तरी ती मुख्यतः १०मीटर एअर पिस्टल प्रकारातील मातब्बर खेळाडू आहे. ती २५ मी. पिस्टल या स्पर्धेत सहभागी झाली असली तरी तो तिचा मुख्य खेळ नव्हे. त्यामुळे अतिशय जिद्दीने तिने पदक खेचून आणले तरच, अन्यथा आजही भारताला कोणते पदक मिळेल असे वाटत नाही.आज एकट्या हीना सिधूच्या नेमबाजी स्पर्धेच्या पदकांचा निकाल लागणार आहे. आज भारताला पदक मिळेल अशी फारशी आशा नाही.

सबस्क्राईब करा

* indicates required