computer

दिव्यांगांच्या जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत भारताला सुवर्णपदक मिळवून देणारी महाराष्ट्राची लेक 'मानसी जोशी'...

मागील आठवडा भारतासाठी खरंच सुवर्णकाळ ठरला आहे की काय अशी शंका मनात येऊन गेल्याशिवाय राहणार नाही. कारण, पी.व्हि.सिंधूच्या पाठोपाठ मानसी जोशीनेही दिव्यांगांच्या जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत भारताला अजून एका सुवर्णपदकाची कमाई करून दिलेली आहे. आपण सर्वांनी मानसी जोशीला सोशल मीडियाच्या माध्यमातून भरभरून शुभेच्छा दिलेल्या आहेत. आज या लेखामध्ये आपण मानसी जोशीच्या संघर्षमयी वाटचालीबद्दल जाणून घेणार आहोत.

दिव्यांग बॅडमिंटन खेळाडू मानसी जोशीने महिलांच्या जागतिक दिव्यांग एकेरी स्पर्धेमध्ये सुवर्णपदकाला गवसणी घातली. पी व्ही सिंधू इतकेच मानसी जोशी ने कमावलेले सुवर्णपदक भारतासाठी महत्त्वाचे आहे. मानसी जोशीनेही त्याच मैदानावरती सुवर्णपदकाची कमाई केली ज्या मैदानावर पी व्ही सिंधूने अप्रतिम खेळ करत सुवर्णपदक कमावले. हा आठवडा भारतासाठी बॅडमिंटन स्पर्धेच्या दृष्टीने सुवर्णकाळच ठरला आहे.

मानसी जोशी हिचा जन्म राजकोट मधील एका सामान्य कुटुंबात झाला आहे. तिने तिचे प्राथमिक शिक्षण राजकोटमध्येच पुर्ण केलेले आहे. तिने "इलेक्ट्रॉनिक्स इंजीनियरिंग"ची पदवी प्राप्त केलेली आहे. मानसी जोशी सुरवातीपासूनच अभ्यासामध्ये  हुशार होती.  घरच्यांच्या पाठबळामुळेच ती आज भारताचे नाव उंचावत आहे. मानसी जोशीने पारुल परमारला पराभूत करत विश्वविजेतेपद मिळवलेले आहे.

पारूल परमार मागील तीन स्पर्धांपासून आपले विश्वविजेतेपद टिकवुन होती आणि मागील तीनही वर्षी पारूल परमार ने मानसी जोशीला  पराभूत करतच विश्व विजेतेपदाचा किताब आपल्या जवळ ठेवला होता. या गोष्टीची सल ठेवून मानसी जोशीने यावेळी अत्यंत कठोर परिश्रम घेत हे यश प्राप्त केलेले आहे. मानसीसाठी अपयश नवीन गोष्ट नाही, जेव्हा तिने बॅडमिंटन स्पर्धांसाठी तयारी सुरु केली तेव्हा 2011 मध्ये तिचा एक जबरदस्त अपघात घडला. या अपघातामध्ये तिचा डावा पाय कायमचा निकामी झाला. मानसी  जवळपास पन्नास दिवस इस्पितळांमध्ये उपचार घेत होती. पण तिने  जिद्द न हरता परत नव्याने उभारी घेत मैदानावर पाय जमवायला सुरुवात केली. अर्थातच, तिच्या घरच्यांनी तिला हवी ती प्रत्येक मदत केलेली आहे.

मानसी जोशीने पत्रकारांशी बोलताना सांगितले की आजही तिचे संपूर्ण लक्ष 2020 च्या टोकियो येथे होणाऱ्या दिव्यांग स्पर्धांवरती केंद्रित आहे. या यशाने हुरळून न जाता तिने मेहनत चालू ठेवलेली आहे. मानसी जोशी गोपीचंद यांचीच विद्यार्थिनी आहे. मध्यंतरी काही दिवसांपूर्वी काही क्रीडा रसिकांनी असे ट्विट केले होते की मानसी जोशी हिचे यश पी व्ही सिंधू एवढे गौरविले जात नाही. यावर पडदा टाकत मानसी जोशी हिने स्वत:च पी व्ही सिंधूचे कौतुक करणारे ट्विट केले होते. मानसी जोशीनेे अत्यंत खडतर  मेहनत करत हे सुवर्णपदक कमावले आहे.  बोभाटा च्या वाचकांच्या वतीने तिचे हार्दिक अभिनंदन. तिने असाच उत्तम उत्तम खेळ करत भारताला अजिंक्‍यपद मिळवून द्यावं हीच अपेक्षा.

 

लेखक : रोहित लांडगे