computer

किंग कोहलीच्या कसोटी कारकिर्दीतील टॉप ५ बेस्ट टेस्ट इनिंग, एकदा पाहाच

भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहली हा क्रिकेटच्या तीनही स्वरूपातील सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक आहे. त्याने भारतीय क्रिकेटमध्ये मोलाचे योगदान दिले आहे. वनडे, टी२० आणि कसोटी क्रिकेटमध्ये देखील त्याने अनेक मोठ मोठे विक्रम आपल्या नावावर केले आहेत. अशातच त्याच्या नावे आणखी एका मोठ्या विक्रमाची नोंद झाली आहे. तो भारतीय संघासाठी १०० कसोटी सामने खेळणारा १२ वा क्रिकेटपटू ठरला आहे. श्रीलंका संघाविरुद्ध सुरू असलेला पहिला कसोटी सामना हा त्याच्या कसोटी कारकिर्दीतील १०० वा सामना आहे. याच खास क्षणी त्याच्या कसोटी कारकिर्दीतील टॉप ५ सर्वोत्तम खेळीवर आपण एक नजर टाकणार आहोत

१) ११९ धावा - २०१२- १३, जोहान्सबर्ग :

हे विराट कोहलीच्या कसोटी कारकिर्दीतील सुरुवातीचे दिवस होते. तरीदेखील न डगमगता त्याने वेगवान गोलंदाजांचा निडर होऊन सामना केला. या सामन्यात भारतीय संघ पराभूत होण्याच्या वाटेवर होता. परंतु विराट कोहलीने वेगवान गोलंदाजांना चोप देत १८१ चेंडूंमध्ये ११६ धावांची खेळी केली. ज्यामुळे भारतीय संघाला हा सामना वाचवण्यात यश आले होते.

२) ११६ धावा - २०११-१२, ॲडीलेड :

भारतीय संघ त्यावेळी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर होता. या दौऱ्यावरील शेवटचा कसोटी सामना सुरू होता. नेहमीप्रमाणेच यावेळी देखील भारतीय फलंदाज वेगवान गोलंदाजांना मदत मिळणाऱ्या खेळपट्टीवर अडचणीत सापडले होते. याच मालिकेतील सुरवातीच्या दोन सामन्यात विराट कोहलीला साजेशी कामगिरी करता आली नव्हती. त्याला अवघ्या ४३ धावा करण्यात यश आले होते. त्यानंतर शेवटच्या कसोटी सामन्यात त्याला ६ व्या क्रमांकावर फलंदाजीला पाठवण्यात आले होते. याच संधीचा लाभ घेत त्याने तुफानी खेळी करत ११६ धावा केल्या. या खेळीच्या जोरावर भारतीय संघाला २७२ धावा करण्यात यश आले होते.

३) १६९ धावा - २०१४, मेलबर्न :

या मालिकेत देखील भारतीय संघाला साजेशी कामगिरी करण्यात अपयश आले होते. भारतीय संघाने सुरुवातीचे दोन्ही सामने गमावले होते. तिसरा सामना मेलबर्नच्या मैदानावर होता. या मैदानावर देखील वेगवान गोलंदाजांना मदत मिळत असते. त्यावेळी ऑस्ट्रेलिया संघात मिचेल जॉनसन, रयान हॅरिस, जोश हेजलवूड आणि शेन वॉटसन सारखे गोलंदाज होते. तरीदेखील भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहली मागे हटला नव्हता. त्याने या वेगवान गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला आणि १६९ धावांची खेळी केली. त्याने चौथ्या गडीसाठी अजिंक्य रहाणे सोबत मिळून १४७ धावांची भागीदारी केली होती. याच खेळीच्या जोरावर भारतीय संघाला हा कसोटी सामना ड्रॉ करण्यात यश आले होते.

४) २३५ धावा- २०१६, मुंबई :

इंग्लंड संघ २०१६ मध्ये भारत दौऱ्यावर होता. त्यावेळी भारतीय संघाचे कर्णधारपद विराट कोहली कडे होते. वानखेडेच्या मैदानावर पार पडलेल्या या सामन्यात, प्रथम फलंदाजी करताना इंग्लंड संघाने ४०० धावा केल्या होत्या. ही खेळपट्टी फलंदाजांना मदत करणारी होती. परंतु जेम्स अँडरसन, बेन स्टोक्स आणि ख्रिस वोक्स सारख्या गोलंदाजांसमोर धावा करणे सोपी गोष्ट नव्हती. तरीदेखील विराट कोहलीने या गोलंदाजांना चांगलाच चोप दिला आणि दुहेरी शतक झळकावले. त्याने या डावात २३५ धावांची खेळी केली होती. या खेळीच्या जोरावर भारतीय संघाला ६३१ धावांचा डोंगर उभारण्यात यश आले होते.

 

५) २५४ धावा - २०१९, पुणे :

कसोटी क्रिकेटमध्ये २५४ धावा ही विराट कोहलीची सर्वात मोठी खेळी आहे. २०१९ मध्ये दक्षिण आफ्रिका संघ भारत दौऱ्यावर आला होता. दक्षिण आफ्रिका संघाकडे व्हर्नन फिलँडर, कगिसो रबाडा आणि एनरिक नॉर्खिया सारखे गोलंदाज होते. परंतु या गोलंदाजांचा भारतीय कर्णधाराने चांगलाच समाचार घेतला होता. त्याने ३३ चौकार आणि २ षटकारांचा साहाय्याने २५४ धावांची खेळी केली होती.

सबस्क्राईब करा

* indicates required