computer

युरो कप २०२१: ५३ वर्षांनी जेतेपद मिळवत इटलीने इंग्लंडला धूळ चारली....काय घडलं शेवटच्या सामन्यात?

कोपा अमेरिकेच्या जेतेपदावर अर्जेंटिनाने मोहोर उमटवल्याची खबर ताजी असतानाच बहुचर्चित युरो कपचा विजेता जाहीर झाला आहे. समस्त फुटबॉल विश्वात आनंद आणि आश्चर्याच्या उकळ्या फुटताना दिसत आहेत. तब्बल २४ युरोपीय देशांमध्ये खेळल्या गेलेल्या या स्पर्धेत इटलीने आपलं वर्चस्व सिद्ध करत युरो कपवर शिक्कामोर्तब केलं. कोरोनाचं सावट असतानाही स्टेडियममध्ये कोपा अमेरिकासारखा शुकशुकाट नसल्याने प्रत्येक सामना अतिशय जोषपूर्ण वातावरणात खेळला गेला होता. ११ जून ते ११ जुलैच्या दरम्यान भरवल्या गेलेल्या या स्पर्धेची सुरुवात आणि सांगता इटलीच्याच विजयाने झाली!

युरो कपच्या अंतिम सामन्यात तब्बल पंचावन्न वर्षांनंतर अंतिम फेरी गाठलेल्या इंग्लंडपुढे आव्हान होते ते सलग ३२ सामन्यांमध्ये विजय मिळवलेल्या इटलीचे! अंतिम सामना घरच्याच मैदानावर होणार असल्याने जर्मनी, युक्रेन आणि डेन्मार्कवर दणदणीत विजय मिळवून इटलीसमोर उभे राहणाऱ्या इंग्लंडचा आत्मविश्वास अधिकच उंचावला होता, तर इकडे १९६८नंतर जेतेपदासाठी आसुसलेली इटली ऑस्ट्रिया, बेल्जियम आणि स्पेनला खडे चारत नऊ वर्षांनी प्रथमच अंतिम फेरीत पोहोचली होती. दोन्ही संघांसाठी हे जेतेपद महत्त्वाचं होतं कारण दोघांनाही यापूर्वीच्या विश्वचषक सामन्यांमध्ये दारूण पराभवाला सामोरं जावं लागलं होतं. होम ग्राउंडवर सामना होत असल्याने इंग्लंडला फायदा तर होताच, त्याचबरोबर युरो कपच्या अंतिम फेरीत पहिल्यांदाच पोहोचल्याने एक अनामिक दडपणही होतं.

पण सामना सुरु झाल्यावर हे दडपण झुगारून देत इंग्लंडचा संघ आक्रमक पवित्रा घेऊन इटलीच्या गोटात घुसला. सामना सुरु होऊन दोन मिनिटे होत नाहीत तोच इंग्लंडने आपलं खातं उघडून जेतेपदावर शिक्कामोर्तब करण्याचे आपले मनसुबे उघड केले. युरो कपच्या अंतिम सामन्यात अत्यंत कमी वेळात गोल करणारा इंग्लंडचा ल्यूक शॉ हा पहिलाच खेळाडू ठरला. केरन ट्रीपियारने दिलेल्या पासवर शॉने या स्पर्धेतला आपला पहिला आणि एकमेव गोल नोंदवत इंग्लंडला आघाडी मिळवून दिली आणि इंग्लंडच्या चाहत्यांनी एकच जल्लोष केला. आठव्या मिनिटाला इटलीला मिळालेली फ्री किक लोरेंझो इन्सिन्येने दवडली आणि पूर्वार्धातच इंग्लंडशी बरोबरी साधण्याची सुवर्णसंधी इटलीने गमावली. पूर्वार्ध संपताना इटलीने बराचवेळ बॉलवर ताबा मिळवला खरा, पण इंग्लंडची बचावफळी भेदून बरोबरी साधण्याचे त्यांचे सर्वच प्रयोग सपशेल आपटले.

उत्तरार्धात पुन्हा एकदा चेंडूवर ताबा मिळवत इंग्लंडने इटलीला झुंजवलं. पन्नासाव्या मिनिटाला मिळालेली फ्री किक इन्सिन्येने पुन्हा एकदा गमावली आणि इटलीच्या चाहत्यांवर निराशेची छाया पसरली. पण गेल्या शंभर वर्षांतील सर्वोत्कृष्ट खेळाडूंपैकी एक असलेल्या रॉबर्ट मॅन्सिनींच्या मार्गदर्शनाखाली तयार झालेला इटलीचा संघ हार मानायला तयारच नव्हता. चोपन्नाव्या मिनिटाला मॅन्सिनींनी ब्रायन क्रिस्टांट आणि डॉमिनिको बराडीला बदली खेळाडू म्हणून आत पाठवलं आणि इटलीच्या आक्रमणाला धार चढली. साठाव्या मिनिटाच्या आधी इंग्लंडने चेंडूवर ताबा मिळवण्याचा प्रयत्न केला पण उण्यापुऱ्या पाचच मिनिटांत इटलीने तो आनंद हिरावून नेला. ६६व्या मिनिटाला क्रिस्टांटने मार्को वेरातीला दिलेल्या पासवर वेरातीचा हेडर हुकला, पण क्षणाचाही वेळ न दवडता पुढे आलेल्या लिओनार्डो बोनुचीने चपळाईने गोल करत इटलीला बरोबरीची संधी मिळवून दिली.

त्यानंतर दोन्ही संघांनी उत्कृष्ट बचावाचं प्रदर्शन करत बरोबरी कायम ठेवली. अतिरिक्त वेळ मिळाल्यावर दोन्ही संघांमध्ये महत्त्वाचे बदल होऊनही बरोबरी तोडण्यात दोघांनाही अपयश आले आणि पेनल्टी शूटआऊटचा निर्णय घेण्यात आला. १९७६नंतर पहिल्यांदाच युरोचं जेतेपद पेनल्टी शूटआऊटवर ठरवलं जाणार होतं. इटलीसाठी बराडी आणि इंग्लंडसाठी केनने पहिली पेनल्टी साधत चाहत्यांना श्वास रोखून धरायला लावलं. इटलीचा आंद्रे बिलोटी अपयशी ठरल्यावर हॅरी मग्वायरने गोल करत इंग्लंडला २-१ अशी आघाडी मिळवून दिली. तिसऱ्या शूटआऊटला आघाडी भक्कम करण्याची संधी रॅशफोर्डने गमावली, तर बोनुचीने पुन्हा एकदा मिळालेल्या संधीचं सोनं करून इटलीला २-२ अशी बरोबरी साधून दिली. फेडेरीको बर्नाडेशीने गोल करत इटलीला आघाडी मिळवून दिली, तर सँचो त्या आघाडीचं बरोबरीत रुपांतर करण्यात अयशस्वी ठरला. इटलीला विजयाची खात्री मिळवून देणारा जॉर्जिओचा गोल पिकफोर्डने अडवल्यावर इंग्लंडच्या चाहत्यांना दिलासा मिळाला खरा, पण पेनल्टी शूटआऊटचा स्पेशालिस्ट असलेल्या इटलीचा गोलरक्षक डोन्नारुम्माच्या अभेद्य बचावापुढे साकाने नांगी टाकली आणि ३-२च्या फरकाने इटलीने जेतेपदावर आपलं नाव कोरलं!

३४-वर्षीय सामनावीर लिओनार्डो बानुची हा युरो स्पर्धेत गोल नोंदवणारा सर्वाधिक वयस्कर खेळाडू ठरला आणि स्पर्धेचा सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून गौरवण्यात आलेला जॉनलुईजी डोन्नारुम्मा हा इटालियन खेळाडू युरो स्पर्धेत असा किताब मिळवणारा पहिलाच गोलरक्षक ठरला. सध्याच्या सर्वोत्कृष्ट खेळाडूंपैकी एक असलेल्या पोर्तुगालच्या ख्रिस्तियानो रोनाल्डोला या स्पर्धेचा ‘टॉप स्कोअरर’ म्हणून घोषित करण्यात आलं. ‘कप कमिंग टू होम’ हे इंग्लंडचं स्फूर्तिगीत ‘कप कमिंग टू रोम’च्या निनादात झाकोळलं गेलं आणि आपल्या संघाला पाठींबा देण्यासाठी गर्दीने आलेल्या इंग्लंडच्या चाहत्यांची मात्र घोर निराशा झाली. या निराशेमुळे इंग्लंडच्या काही खेळाडूंना वंशवादी टिप्पण्यांना सामोरं जावं लागलं आणि स्पर्धेला गालबोट लागलं. रोनाल्डोचा मार्केटिंगला विरोध, प्राईड मंथला आणि LGBTQ+ समूहाला दिलेला पाठींबा, ग्रीनपीसचं वादग्रस्त आंदोलन अश्या अनेक घटनांनी गाजलेली ही स्पर्धा इटलीच्या जेतेपदाने समाप्त झाली.

 

लेखक: प्रथमेश हळंदे

सबस्क्राईब करा

* indicates required