Virat's Birthday Special: किंग कोहली साजरा करतोय ३४ वा वाढदिवस! जाणून घ्या त्याने केलेल्या ३४ खास विक्रमांबद्दल...

भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) हा आंतरराष्ट्रीय क्री क्रिकेटमधील सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक आहे. त्याने २००८ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. तेव्हापासून त्याने मागे वळून पाहिले नाहीये. सध्या तो भारतीय संघाचा आधारस्तंभ म्हणून ओळखला जातो. त्याने १०२ कसोटी, २६२ वनडे आणि ११३ टी-२० सामन्यांमध्ये देशाचे प्रतिनिधित्व केले आहे.

विराट कोहलीच्या नावे कसोटी क्रिकेटमध्ये ८०७४ धावांची नोंद आहे. यादरम्यान त्याने २७ शतके आणि २८ अर्धशतके झळकावली आहेत. तर वनडे क्रिकेटमध्ये त्याने ४३ शतके आणि ६४ अर्धशतकांच्या साहाय्याने १२३४४ धावा केल्या आहेत. तसेच टी -२० क्रिकेटबद्दल बोलायचं झालं तर, त्याने आतापर्यंत १ शतक आणि ३६ अर्धशतकांच्या साहाय्याने ३९३२ धावा केल्या आहेत. ५ नोव्हेंबर १९८८ रोजी जन्मलेला विराट कोहली आज आपला ३४ वा वाढदिवस साजरा करतोय. या खास दिवशी जाणून घेऊया त्याने केलेल्या ३४ खास विक्रमांबद्दल अधिक माहिती.

१) विराट कोहलीच्या नावे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कुठल्याही एका संघाविरुद्ध खेळताना सर्वाधिक शतके झळकावण्याचा विक्रम आहे. विराट कोहलीने वेस्ट इंडीज विरुध्द फलंदाजी करताना एकूण ९ शतके झळकावली आहेत.

२) टी -२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळेस सामनावीर पुरस्कार जिंकण्याचा विक्रम देखील विराटच्या नावे आहे. विराट कोहलीने ७ वेळा हा पुरस्कार पटकावला आहे. 

३) विराट कोहलीची टी -२० क्रिकेटमध्ये फलंदाजी करताना सरासरी सर्वोत्तम आहे. त्याने ११३ सामन्यांमध्ये ५३.१३ च्या सरासरीने धावा केल्या आहेत. 

४) टी-२० मध्ये सर्वाधिक अर्धशतके कोहलीच्या बॅटमधून आली आहेत. त्याने ३६ अर्धशतके झळकावली आहेत.

५) टी -२० क्रिकेटमध्ये सर्वात जलद ३५०० धावा करण्याचा विक्रम माजी भारतीय कर्णधाराच्या नावावर आहे. कोहलीने ९६ डावांमध्ये ही कामगिरी केली आहे. 

६) भारतीय संघाने धावांच्या बाबतीत २०२१ मध्ये न्यूझीलंड विरुध्द कसोटी सामना खेळताना सर्वात मोठा विजय मिळवला होता. त्यावेळी विराट कोहली संघाचा कर्णधार होता. या ऐतिहासिक सामन्यात भारतीय संघाने न्यूझीलंड संघाला ३७२ धावांनी पराभूत केले होते.

७) सर्वात जलद ८ हजार, ९ हजार, १० हजार, ११ हजार, १२ हजार धावा करण्याचा विक्रमही दुसऱ्या कुणाच्या नावावर नसून किंग कोहलीच्या नावावर आहे.

८)टी -२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम देखील विराट कोहलीच्या नावे आहे. विराट कोहलीने ३९३२ धावा केल्या आहेत. 

९) टी -२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक १५ वेळेस प्लेअर ऑफ द सिरीज पुरस्कार पटकावण्याचा विक्रम देखील विराट कोहलीच्या नावे आहे. 

१०) टी -२० विश्वचषक स्पर्धेच्या इतिहासात सर्वाधिक धावा (१०६५) करण्याचा विक्रम देखील विराटच्या नावे आहे. 

११) कोहली हा जगातील एकमेव क्रिकेटपटू आहे ज्याला टी -२० विश्वचषकात दोनदा 'प्लेअर ऑफ द टूर्नामेंट' म्हणून गौरवण्यात आले आहे.

१२)कोहलीने वनडेमध्ये सर्वात जलद १०,००० धावा केल्या आहेत. २६२ सामन्यांमध्ये त्याने आतापर्यंत १२ हजार ३४४ धावा केल्या आहेत.

 १३) माजी भारतीय कर्णधाराने एका कॅलेंडर वर्षात ११ डावांमध्ये १००० धावा केल्या आहेत. ही कामगिरी त्याने २०१८ मध्ये केली होती.

१४) वनडे क्रमवारीत सर्वाधिक ८९० रेटिंग गुण मिळवणारा कोहली हा एकमेव भारतीय आहे.

 १५) आयसीसी कसोटी क्रमवारीत विराट कोहलीने सर्वाधिक ९२२ रेटिंग गुण मिळवले होते. 

१६) कोहलीने ९ वेळा कर्णधार म्हणून १५० हून अधिक धावा केल्या आहेत.

 १७) २ संघांविरुद्ध फलंदाजी करताना सलग ३ शतके ठोकणारा तो एकमेव खेळाडू आहे.

१८) क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये ५० विजय मिळवणारा कोहली हा पहिला कर्णधार आहे.

१९) २ बॉक्सिंग डे कसोटी जिंकणारा कोहली हा भारताचा पहिला कर्णधार आहे.

२०) किंग कोहलीचे वनडे रेटिंग ९११ आहे, जे कुठल्याही भारतीय क्रिकेटपटू पेक्षा सर्वोत्तम रेटिंग आहे.

२१) आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम त्याच्या नावावर आहे. कोहलीने ४ शतकांसह ९७३ धावा केल्या आहेत.

२२) विराट कोहलीने २०१८ मध्ये कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा केल्या आहेत. त्याने १३ सामन्यांमध्ये १३२२ धावा आणि कसोटी क्रिकेटमधील १४ सामन्यांमध्ये १२०२ धावा केल्या आहेत.

 २३) टी -२० विश्वचषकात एकाच संघाविरुद्ध सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम कोहलीच्या नावावर आहे. त्याने पाकिस्तानविरुद्ध ३०८ धावा केल्या होत्या.

२४) वनडे क्रिकेटमध्ये सर्वात जलद ३० आणि ३५ शतके झळकावण्याचा विक्रम विराट कोहलीच्या नावे आहे. 

२५)त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद १५ हजार १७ हजार धावा केल्या आहेत. 

२६) सर्वात कमी डावात २२ हजार आंतरराष्ट्रीय धावा करण्याचा विक्रम विराट कोहलीच्या नावावर आहे. त्याने ४९३ डावांमध्ये ही कामगिरी केली आहे. 

२७) टी -२० मध्ये १० हजार धावा करणारा कोहली पहिला भारतीय ठरला आहे. त्याने आतापर्यंत ३५८ टी-२० सामन्यांमध्ये ११ हजार २५० धावा केल्या आहेत.

२८) कर्णधार म्हणून विराट कोहलीने सर्वाधिक ६ द्विशतके देखील झळकावली आहेत. 

२९) कर्णधार म्हणून कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात जलद ४ हजार धावा करण्याच्या बाबतीत विराट कोहली अव्वल स्थानी आहे. त्याने ६५ डावांमध्ये हा पराक्रम केला आहे. 

३०) वनडे क्रिकेटमध्ये भारतीय संघासाठी सर्वात जलद शतक झळकावण्याचा विक्रम किंग कोहलीच्या नावे आहे. त्याने २०१३ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध ५२ चेंडूंमध्ये शतक झळकावले होते.

३१) आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम कोहलीच्या नावावर आहे. त्याने आतापर्यंत ६४११ धावा केल्या आहेत.

३२) टी -२० विश्वचषकात कोहलीची फलंदाजीची सरासरी सर्वाधिक आहे. त्याची सरासरी ८० च्या वर आहे.

३३) कोहली हा सर्वाधिक कसोटी जिंकणारा भारतीय कर्णधार आहे. त्याच्या नेतृत्वाखाली भारताने ४० कसोटी सामने जिंकले आहेत.

३४) इतकेच नव्हे तर कोहली इंस्टाग्रामवर सर्वाधिक फॉलो केला जाणारा आशियाई आहे. त्याचे २२१ दशलक्ष फॉलोअर्स आहेत.

सबस्क्राईब करा

* indicates required