computer

गांगुली क्रिकेटच्या इतिहासात पहिला 'टाईम आऊट' खेळाडू होताहोता वाचला, त्याचा किस्सा माहित आहे?

भारतात सतत उठता-बसता आणि जिकडेतिकडे नुसतं क्रिकेट चालू असतं. त्यामुळं होतं काय, क्रिकेटमधमे जवळजवळ सगळे नियम भारतीयांना माहीत असतात. पण तरी नियमाला अपवाद हा असतोच. टाईम आऊट हा त्यातलाच एक नियम! गंमत म्हणजे त्याचा उपयोग आजवर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकदाही झालेला नाही. मात्र प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये सहा वेळा हा नियम वापरण्यात आला आहे.

टाईम आऊट म्हणजे जेव्हा क्रिझवर असलेला एखादा खेळाडू आऊट होतो आणि त्यानंतर बॅटिंग करायला येणारा खेळाडू तीन मिनिटांच्या आत मैदानावर आला नाही आणि समोरच्या संघातील खेळाडूंनी त्याविरुद्ध अपील केले तर त्या खेळाडूला आऊट घोषित केले जाते.

सहसा तीन मिनिटे हा वेळ एक खेळाडू आऊट होऊन दुसरा मैदानावर येण्यासाठी पुरेसा असतो. या कारणामुळेच पुढचा येणारा खेळाडू पॅड वैगेरे बांधून अगदी तयार बसलेला असतो. तर असा हा सगळा खेळ आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकदाही असा कुणी आऊट झाला नसला तरी एकदा मात्र एक भारतीय खेळाडू यातून पुरता वाचला आहे.

तो खेळाडू दुसरा तिसरा कोणी नाही, तर आज बीसीसीआयचा अध्यक्ष असलेला भारतीय संघाचा 'दादा' सौरव गांगुली होता. दक्षिण आफ्रिका आणि भारत यांच्यात कसोटी सिरीज सुरू होती. आधी १-१ अशी बरोबरी होऊन तिसरा सामना सुरू होता. यात पहिल्या इनिंगमध्ये भारताने ४१४ रन केले, त्याला प्रत्युत्तर म्हणून दक्षिण आफ्रिकेने ३७३ रन केले.

४ थ्या दिवशी जेव्हा भारत मैदानावर उतरला तेव्हा अवघ्या ६ रन्सवर सेहवाग आणि वसीम जाफर आऊट झाले. ही विकेट पडली १०.४८ ला. पण ज्याचा नंबर होता तो सचिन फिल्डवर नसल्याने उतरू शकत नव्हता. मैदानावर उतरण्याची वेळ व्हीव्हीएस लक्ष्मणवर आली. पण हा भाऊ मस्त अंघोळ करत होता. आता गांगुलीला मैदानावर जाण्यास सांगण्यात आले. पण गांगुलीला काहीच आयडिया नव्हती की आपल्याला उतरायचे आहे.

गांगुली ट्रॅकसूट घालून मस्तपैकी फिरत होता. तो लगोलग तयारी करून मैदानावर उतरला. १०.४९ ला दुसरी विकेट पडली आणि नंतर ६ मिनिटं होऊन गेल्यावर गांगुली मैदानावर उतरला. म्हणजे नियमापेक्षा दुप्पट वेळ घेतला गेला होता. दक्षिण आफ्रिकन खेळाडूंनी अंपायरकडे अपील केले.

पण परिस्थिती अशी होती की सचिन मैदानावर नसल्याने तो येऊ शकत नाही हा निरोप पोहोचायला वेळ लागला. अंपायरने हा मुद्दा दक्षिण आफ्रिकन कॅप्टन ग्रॅहम स्मिथ याला सांगितला की हा अपवादात्मक मुद्दा म्हणून दुर्लक्षित करावा. स्मिथने हे ऐकले आणि त्याने हा मुद्दा मान्य केला.

गांगुलीने मैदानावर उतरून ४६ रन्सची खेळी केली. तरीही दक्षिण आफ्रिकेने हा सामना जिंकत मालिकाही जिंकली होती. गांगुली मात्र ऐतिहासीक विक्रमापासून थोडक्यात वाचला होता.

सबस्क्राईब करा

* indicates required