ती पोहत जर्मनीला पळून आली आणि आता पोहतेय रिओ ऑलिंपिक मध्ये!!
ऑलिंपिकमध्ये या वर्षी एक नवीनच संघ पाहायला मिळाला. ROT! रिफ्युजी ऑलिंपिक ऍथलिट टीम म्हणजेच निर्वासित खेळाडूंचा संघ. या अनोख्या संघाची एक अनोखी खेळाडू आहे "युसरा मर्दिनी"!!
युसरा ही मूळची सिरीया देशातल्या दमास्कसची. पण आता या घडीला तिला स्वत:चा देश आणि घर दोन्हीही नाहीय. सिरीयावर झालेल्या हल्ल्यात तिचं घर बेचिराख झालं. अपुर्या कपड्यांनिशी ती आणि तिची बहीण सिरीयामधून पळून लेबानन मागे तुर्कीला पोचल्या. हा प्रवास अतिशय खडतर होता. जागोजागी पोलिस होते आणि इतर देशांना त्यांच्या देशात निर्वासित नको होते. तिथून त्यांनी ग्रीसला जाण्यासाठी तस्करांना पैसे दिले. एकदा तो प्रयत्नही फसला. मग एका संध्याकाळी त्यांना ग्रीसला जाण्यासाठी एक छोटी बोट मिळाली. सहा लोकांच्या होडीत या दोघींसह वीस लोक बसले होते. समुद्रात गेल्यावर बोटीचं इंजिन बंद पडलं. बोटीतलं सामान फेकून देऊनही बोट हलकी होईना. अख्रेर युसरा , तिची बहीण आणि बोटीतल्या पोहता येणार्या दोन लोकांनी पाण्यात उडी घेतली. “आमच्या सोबतच्या लोकांना केवळ पोहता येत नाही म्हणून आम्ही मदत केली नसती , तर ते खूप लाजिरवाणं झालं असतं” असं युसरा म्हणते. मर्दिनी बहिणींनी आणि सोबतच्या दोन लोकांनी ती बोट तीन तासाहून अधिक वेळ कशीबशी खेचून जिद्दीने किनार्यावर आणली आणि सर्वांचे प्राण वाचवले. या दोघी बहिणींचं पोलिसांपासून लपणं, कधी अधिकार्यांनी मर्दिनी बहिणींचे पैसे काढून घेणं, हे सगळे प्रकार चालूच होते. हे सगळं सांभाळत या दोघी युरोपातून जर्मनीला आल्या आणि गेल्या सप्टेंबरपासून बर्लिन मध्ये राहात आहेत.
बर्लिनमध्येही तिला पोहण्याची ओढ स्वस्थ बसू देत नव्हती. एका इजिप्शियन दुभाष्याच्या मदतीने तिने तिथल्या एका पोहण्याच्या क्लबला भेट दिली आणि तिचं पोहणं पाहून तिला ऑलिंपिकच्या गटात स्थान मिळालं. खरंतर तिची तयारी २०२०च्या म्हणजेच पुढच्या ऑलिंपिकसाठी चालली होती , पण तिची तयारी पाहून तिच्या शिक्षकांनी तिला याच ऑलिंपिकच्या ग्रुपमध्ये सामील केलं. निर्वासितांच्या दहा जणांच्या या संघामध्ये १८ वर्षांची युसरा पण आहे. तिने पात्रता फेरी पार केली पण फायनलसाठी तिची निवड होऊ शकलेली नाही.
सध्या इतरवेळी तिचा सगळा वेळ शाळा, अभ्यास आणि सरावात जातो. तिला मिळणार्या लहानात लहान संधीचा फायदा घ्यायचं तिने ठरवलंय. गेल्या वर्ष-दीडवर्षात जे काही तिनं भोगलं, ते पाहता तिचा हा निर्णय किती टक्केटोणपे खाऊन घेतला गेला आहे हे लक्षात येतं. आपलं दु:ख गोंजारत न बसता , आपली पर्वा न करता अडीअडचणीतून स्वत:बरोबरच इतरांनाही बाहेर काढण्यार्या या युसरा मर्दिनीला बोभाटा.कॉमचा सलाम.




