computer

असे आहे 'ठग ऑफ हिंदुस्तान' चे संपूर्ण कास्टिंग.....पाहा कोण कोणत्या रोल मध्ये आहे !!

मिडोज टेलरच्या ‘ठगाची जबानी’ या पुस्तकावर आधारित चित्रपट येणार व त्यात आमीर खान आणि अमिताभ बच्चन यांच्या मुख्य भूमिका असणार हे ऐकूनच उत्सुकता शिगेला पोहोचली होती राव. पण आता थोडी निराशा झाली आहे.

Confessions of a Thug हे पुस्तक मराठीत ‘ठगाची जबानी’ नावाने अनुवादित आहे. या पुस्तकात ब्रिटीश साम्राज्याच्या नाकी नऊ आणणाऱ्या ठगांचा संपूर्ण इतिहासच वर्णन केलेला आहे. ठगांची गोष्ट घडते तो काल मराठा साम्राज्याच्या अंताचा आणि ब्रिटीश साम्राज्याच्या उदयाचा होता. दिल्लीवर मुघल नाममात्र उरले होते. निजामाचं राज्य सलामत होतं. मध्यप्रदेशात सिंधिया मोठे झाले होते. १८५७ चं स्वातंत्र्य समर अजून व्हायचं होतं. अशा या मधल्या काळात घडणारं हे कथानक आहे. अमीर अली हा या कथेचा नायक. तो स्वतःहून आपली कहाणी मिडोज टेलर यांना कथन करतो. त्याने कथन केलेल्या कहाणीत आणखी माहितीची भर घालून मिडोज टेलर यांनी हे पुस्तक लिहिलं. 

पुस्तकात वर्णन केलेल्या ठगांच्या आतील गोटातील माहिती जसे की, ठगण्याची पद्धत, त्यांच्या कारवाया, मृतदेहांना नामशेष करण्याची पद्धत, त्यांच्यातील श्रद्धा/अंधश्रद्धा, ठग आणि इतर लुटारू, चोर, दरोडेखोर यांच्यातला फरक, तत्कालीन भारताची परिस्थिती हे सारच भारावून टाकणारं आहे. 

ठग ऑफ हिंदुस्तान हा सिनेमा याच कथेवर आधारित. पण एकंदरीत या कथेत अनेक फेरफार केल्याचं जाणवतं. हे कश्यावरून तर सध्या या सिनेमातल्या सगळ्या मुख्य भूमिकांचे लुक प्रदर्शित करण्यात आलेत. अमिताभ बच्चन यांच्या लुक पासून याची सुरुवात झाली.

आमीर खान अमीर अलीच्या भूमिकेत तर अमिताभ बच्चन त्याच्या वडिलांच्या भूमिकेत असेल अशी बातमी गेल्या वर्षीच आली होती. पण गम्मत अशी की पुस्तकात अमीर अलीच्या वडिलांचं नाव इस्माईल आहे. आणि लुक व्हिडीओ मध्ये अमिताभ बच्चन यांच्या पात्राचं नाव ‘खुदाबक्ष’ सांगण्यात आलंय. एवढच काय खुद्द अमीर खानच्या पात्रांचं नाव ‘फिरंगी’ आहे. फातिमा सना शेखचं ‘झफिरा’ हे पात्रच मुळात पुस्तकात नाही.

अशीच नावांची फेरफार इतर पात्रांच्या बाबतीत झाली आहे. हे तर काहीच नाही राव, अमिताभ बच्चन यांना जहाजावरच्या कॅप्टनच्या लुक मध्ये (डिट्टो पायरेट्स ऑफ दि कॅरेबियन) दाखवण्यात आलंय. पण पुस्तकात मात्र जहाजाचा उल्लेख क्वचितच आढळतो. एकंदरीत निर्मात्यांनी यशराजच्या कारखान्यातून तयार झालेला तद्दन मसालापट तयार करण्याची तयारीच केली आहे. 

एक तर सांगायचं राहूनच गेलं. या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत विजय कृष्ण आचार्य. हे तेच आहेत बरं का ज्यांनी ‘धूम ३’ बनवली होती. असो....

राव आम्ही कथेबद्दल आणखी सांगणार नाही. ट्रेलर आल्यावर आणखी बातमी मिळेलच. आता पाहूयात या चित्रपटातील संपूर्ण स्टारकास्ट कशी दिसते ते !!

अमिताभ बच्चन - खुदाबक्ष

आमीर खान - फिरंगी

कॅटरीना कैफ - सुरय्या

फातिमा सना शेख - झफिरा

लॉयड ओवेन - जॉन क्लाईव्ह

सबस्क्राईब करा

* indicates required