computer

गर्लफ्रेंड : सई, दोन शनाया आणि अमेय, काय काय आहे या गर्लफ्रेंडमध्ये??

गर्लफ्रेंड! हा शब्द ऐकल्यावर प्रत्येकाचेच कान टवकारतात. काहींचे कुतूहलाने, काहींचे आशेने, काहींचे उपहासाने तर काहींचे मत्सराने. कितीही नाही म्हटले तरी या विषयात प्रत्येकालाच रस असतो, काही कबूल करतात तर बाकी नाही करत. याच मानसिकतेला धरून एक नवीन मराठी चित्रपट प्रदर्शित होतोय ज्याचे नावच मुळी ‘गर्लफ्रेंड’ आहे. त्यात मराठी चित्रपटांची ‘बोल्ड आणि ब्युटीफुल’ अभिनेत्री सई ताम्हणकर प्रमुख भूमिकेत आहे आणि ज्याची ती गर्लफ्रेंड बनते त्याची भूमिका साकारलीय ‘फास्टर फेणे’ फेम अमेय वाघ याने. या सिनेमात अमेय वाघ आणि सई ताम्हणकर यांच्यासह सागर देशमुख, रसिका सुनील, ईशा केसकर, कविता लाड, यतीन कार्येकर, तेजस बर्वे, सुयोग गोऱ्हे, उदय नेने यांच्याही भूमिका आहेत. 

पण स्टोरी काय आहे ???

आतापर्यंत या सिनेमाचे ट्रेलर आणि खासरे.कॉमने केलेला या सिनेमाचा प्रमोशनल व्हिडिओ तुम्ही पाह्यला असेलच. तर या ट्रेलरमध्ये अमेय वाघ म्हणजेच नचिकेत प्रधान सिंगल असल्याने अत्यंत भावूक झालेला दिसतोय. आपल्याला गर्लफ्रेंड का मिळत नाही? या जागतिक प्रश्नाचा विचार करण्याचा सल्ला नचिकेतला त्याचे मित्र-मैत्रिणी देतात, तर नचिकेतचा बॉस नचिकेतला गर्लफ्रेंड नसल्यामुळे त्याची चेष्टा करत उलट सुलट प्रश्नांची सरबत्ती करत असल्याचे दिसते. नचिकेतची आई त्याला थेट विचारते, तुला मुलं आवडतात का? अशा घटनांमुळे नचिकेतच्या मनात गर्लफ्रेंड नसल्याबद्दलची खंत अधिक वाढीस लागते. दरम्यान, नचिकेत बरोबर पावसाच्या सरींमध्ये भिजताना मोहक दिसणारी अलिशा म्हणजेच अभिनेत्री सई ताम्हणकर दिसते. त्यामुळे आजवर सिंगल असणाऱ्या नचिकेतला अचानक गर्लफ्रेंड कशी मिळाली? याचं गौडबंगाल सिनेमा पाहिल्यावरच कळेल. 

हायला... दोन दोन शनाया??

त्याला गर्लफ्रेंड कशी मिळाली या प्रश्नासोबतच आणखी एक गोष्ट या सिनेमात आहे. त्या म्हणजे ‘माझ्या नवऱ्याची बायको’मधल्या दोन्ही शनाया इथे पडद्यावर एकत्र आहेत. आपलं पब्लिक कसे आहे ना, वाईट मालिकांच्या नावाने खडे फोडतात पण तरीही त्या सिरियल बघत राहतात आणि मग चॅनेलवाले टीआरपीची गणितं सांगून त्याच त्या पाणी घातलेल्या मालिका पुढे नेत राहतात. यातलीच एक मालिका आहे- माझ्या नवऱ्याची बायको. त्यातले शनाया’ हे पात्र खूपच लोकप्रिय आहे. “आपल्यालाही अशी मादक, सुंदर व निरागस ‘गर्लफ्रेंड’ असावी” असा विचार प्रत्येक विवाहित पुरुषाच्या मनाला शिवून गेला असण्याची दाट शक्यता आहे. “आपल्या नवऱ्याच्या आयुष्यात एखादी ‘शनाया’ तर नाही ना?” अशी चाचपणी बऱ्याच सतर्क बायकांनी केली असावी. 

सुरुवातीला शनाया रंगविणाऱ्या रसिका सुनीलचा पडद्यावरील मॉडर्न अवतार  व जोडीला बावळटपणाचा अभिनय यामुळे तिच्या लोकप्रियतेत भर पडली. पण ती मध्येच मालिका सोडून अमेरिकेला फिल्म मेकिंग चे शिक्षण घ्यायला गेली. त्यानंतर शनाया बनली  जय मल्हार’ या पौराणिक मालिकेतली ‘बानू’ ही भूमिका करणारी इशा केसकर. तिला ही भूमिका पेलेल का असे लोकांना वाटत होते पण ईशाने अल्पावधीतच ‘शनाया’ आपली करून टाकली व प्रेक्षकांनाही ती आपलीशी वाटू लागली. ईशाने या भूमिकेत इतके रंग भरले की, कदाचित, प्रेक्षकांना आधीच्या शनायाचा विसर पडला. तर, या दोन्ही ‘शनाया’ म्हणजेच रसिका सुनील आणि ईशा केसकर या गर्लफ्रेंडमध्ये एकत्र  दिसणार आहेत. आता नायक अमेय वाघला सई, रसिका आणि इशा यांच्यातली नक्की कुठली मिळते हे चित्रपट पाहूनच समजेल.

नच्या गॉट अ गर्लफ्रेंड

आता गर्लफ्रेंडबद्दल इतर माहिती म्हणजे ह्यूज प्रॉडक्शन्स आणि प्रतिसाद प्रॉडक्शन्स हे निर्माते आहेत आणि हृषीकेश-सौरभ-जसराज यांचे संगीत आहे. सिनेमातली गाणीही चांगली आहेत आणि  सध्या ‘नच्या गॉट अ गर्लफ्रेंड’ हे गाणे सोशल मिडीयावर गाजत आहे.  क्षितीज पटवर्धन यांनी या सिएन्माची गाणी लिहिली आहेत आणि ती श्याल्मली खोलगडे, श्रुती आठवले, जसराज जोशी यांनी गायली आहेत. 

ही ‘गर्लफ्रेंड’ ची भेट २६ जुलै म्हणजे आजपासून थिएटरमध्ये होईल. मग, सिनेमा पाहा आणि आम्हांलाही सांगा की सिनेमा कसा आहे? त्यात काय चांगलं आहे? आवडलेली गाणीही सांगा आणि का बघावा हे ही आम्हांला कमेंटबॉक्समध्ये कळवा. 

 

लेखक : कीर्तिकुमार कदम.