computer

माधुरी दिक्षितच्या फोटोशूटचे हे किस्से तुम्हाला नक्कीच माहित नसतील. पैज आहे आपली!!

मंडळी, प्रत्येक पिढीची एक ‘दिल की धडकन’ असते. त्या पिढीतल्या पुरुषांना लग्न कोणाशी करणार असं विचारलं तर १० पैकी ८ जणांच्या तोंडी तिचंच नाव असतं. आज अशाच एका ‘दिल की धडकन’चा वाढदिवस आहे. तिचं नाव “माधुरी दीक्षित”. तिचा जन्म १९६७ सालचा. आज ती ५३ वर्षांची आहे.

मंडळी, आजच्या पिढीला माधुरी दीक्षितची जादू नाही कळणार, पण ९० च्या दशकात तारुण्यात असलेली मंडळी तिच्याबद्दल भरभरून बोलतील. माधुरीला मिळालेलं “धक धक गर्ल” हे नाव तिला अगदी साजेसं आहे.

आज माधुरीच्या वाढदिवसानिमित्ताने बोभाटा तुम्हाला तिच्याबद्दल असे काही किस्से सांगणार आहे जे तुम्ही यापूर्वी कधीच वाचले नसतील.

आधी आपण त्या माणसाबद्दल जाणून घेऊया ज्याच्या आठवणीतून हे किस्से आले आहेत.

त्या व्यक्तीचं नाव आहे गौतम राजाध्यक्ष. सहसा सामान्य प्रेक्षकांना हे नाव अज्ञात आहे, पण फिल्मी दुनियेतलं हे एक मोठं नाव होतं. ते फॅशन फोटोग्राफर होते. त्यांचं २०११ साली निधन झालं. त्यांच्या हयातीत जेवढे म्हणून आघाडीचे कलाकार होते त्या सगळ्यांची फोटोग्राफी त्यांनी केली होती. त्याकाळी असा समज होता की यशाची पहिली पायरी म्हणजे गौतम राजाध्यक्ष यांनी तयार केलेला पोर्टफोलिओ.

गौतम राजाध्यक्ष यांच्या कॅमेऱ्यात कैद झालेल्या आघाडीच्या कलाकारांपैकी एक होती माधुरी दीक्षित.

राजाध्यक्षांच्या शब्दात सांगायचं झालं तर “माधुरीच्या चेहऱ्यातलं सौम्य आणि क्लासिक सौंदर्य बघून व्हॅटिकनला असलेल्या मायकल अॅन्जेलोच्या पिएताची आठवण होते”

त्यांनी माधुरी दीक्षितबद्दल सांगताना “मी तिला छळलंय” असं म्हटलं होतं. ते असं का म्हणाले हे जाणून घेण्यासाठी हा किस्सा वाचा.

एकदा माधुरी शुटींगच्या दोन शिफ्ट्स संपवून फोटोग्राफीसाठी गौतम राजाध्यक्ष यांच्याकडे आली होती. त्यावेळी तिने काळा आणि पांढरा ड्रेस घातला होता आणि त्यावर फिकट रंगाचा सिल्कचा कोट होता. फोटो घेताना राजाध्यक्षांचा अशी कल्पना सुचली की माधुरीने एक गिरकी घेऊन खाली बसावं म्हणजे कोट उडेल आणि एक चांगला फोटो मिळू शकतो. ही कल्पना त्यांनी माधुरीला बोलून दाखवली आणि तिने पण होकार.

यानंतर जेव्हा खरोखर फोटोशुटला सुरुवात झाली तेव्हा तो कोट उडता उडेना. तरी गौतम राजाध्यक्ष यांनी माधुरीला परत परत गिरकी घ्यायला लावली. अशा प्रकारे माधुरीने तब्बल १२० गिरक्या घेतल्या. तरी त्यांचं समाधान झालं नाही.

त्यावेळी तिथे मेकअपच्या दुनियेतील दिग्गज मिकी कन्ट्रॅक्टर उपस्थित होते. त्यांनी राजाध्यक्षांना फैलावर घेतलं. मिकी म्हणाले, “गौतम तुला वेड लागलंय की काय ? नाचतानाही तिला दहा टेक्स लागत नाहीत आणि तू तिला १२० वेळा वर खाली बसायला लावलंयस ? किती क्रूरपणा आहे हा...” त्यानंतर फोटोशूट संपवण्यात आलं.

दुसऱ्या दिवशी राजाध्यक्षांनी माधुरीची माफी मागण्यासाठी तिला फोन केला तेव्हा माधुरीची प्रतिक्रिया उलट होती. ती हसून म्हणाली “मला तर खूप मजा आली.”

हा झाला एक किस्सा पण माधुरीला छळण्याचे असे अजून काही किस्से सांगता येतील. एकदा तर गौतम राजाध्यक्ष यांनी तिला फोटोशूटसाठी बर्फाच्या लादीवर बसवलं होतं. एकदा तिला मडक्यांनी वेढून तिचं फोटोशूट केलं होतं. असाच प्रयोग कलिंगडासोबत पण केला होता. सूर्याची पहिली किरणं तिच्या चेहऱ्यावर पडतानाचा फोटो घेण्यासाठी तिला पहाटेच वाळूतून धावायला लावलं होतं.

लुक्सबद्दल एका फोटोग्राफरच्या नजरेतून माधुरी वेगळी दिसते. ती कुंभाराकडे असलेल्या मातीसारखी आहे असं गौतम राजाध्यक्ष यांनी म्हटलं होतं. या संदर्भातला हा किस्सा पाहा.

एकदा मिकी कन्ट्रॅक्टर यांनी एक सोनेरी केसांचा विग आणला होता. विग दिसायला प्रसिद्ध अभिनेत्री मॅरलिन मन्रो हिच्या केसांसारखा होता. हा विग घालून माधुरीचं फोटोशूट करायचं ठरलं. फोटो उठावदार दिसावा यासाठी राजाध्यक्षांनी तिला लेदरचे जॅकेट दिले. चेहऱ्यावरचे भाव कसे असावेत हे समजावून सांगताना ते केवळ “थिंक मन्रो” एवढंच म्हणाले. माधुरीला जे समजायचं होतं ते समजलं. त्यांनतर जे फोटो मिळाले त्यात माधुरीच्या चेहऱ्यावरचे भाव हुबेहूब मॅरलिन मन्रोसारखे होते.

हे फोटो पाहून लंडनच्या एका प्रिंटरने गंभीरपणे चक्क असं विचारलं की “मन्रोवर होणाऱ्या सिनेमात या मुलीला काम करायला आवडेल का ?” ही तिच्या कामाची पोचपावती होती.

 

तर मंडळी, कसे वाटले हे किस्से ? हे किस्से तुम्ही या पूर्वी वाचले, ऐकले होते का ?

सबस्क्राईब करा

* indicates required