f
computer

त्याने वर्षभर KFC मध्ये मोफत खाल्लं ? वाचा KFC ला चुना लावणाऱ्या ठगाची कहाणी !!

मंडळी, “स्पेशल २६” आठवतोय का ? चोरांची एक टीम आपण CBI अधिकारी आहोत असं भासवून धाड टाकतात आणि सगळा पैसा लंपास करतात. आम्ही आज KFC ला लुटणाऱ्या एका माणसाची गोष्ट सांगणार आहोत. या ठगाने KFCला “स्पेशल २६” स्टाईलने लुटलं आहे.

साऊथ आफ्रिकेतला २७ वर्षांचा तरुण साऊथ आफ्रिकेतील प्रत्येक KFC ब्रँच मध्ये जायचा. तो असं भासवायचा की आपण KFC च्या मुख्यालयातून तपासणीसाठी आलोय. त्याचा काळा कोट, आत्मविश्वास आणि रुबाब बघून KFC च्या कर्मचाऱ्यांना त्याच्यावर सहज विश्वास बसायचा. नाही म्हणायला त्याच्याकडे खोटा आयडी पण होताच.

तो तिथली तपासणी करण्यासाठी किचन मध्ये जायचा आणि प्रत्येक गोष्ट नीट तपासायचा. तपासून नोट्स पण काढायचा. एकूण अभिनय अव्वल होता. त्यानंतर तो ज्या कामासाठी आलाय ते काम करायचा. “टेस्टिंग”साठी तिथलं अन्न मागवायचा. KFC मध्ये काय काय बनवलं जातं हे तुम्हाला माहित आहेच. तो त्यातलं निवडक टेस्टिंगच्या नावावर खायचा. यावेळी सगळ्या कर्मचाऱ्यांची तंतरलेली असायची. एका कर्मचाऱ्याने तसं सांगितलं पण आहे, “आम्ही त्याच्यासमोर चांगलं वागण्याचा प्रयत्न करायचो. काहीही चूक होणार नाही याची काळजी घ्यायचो.”

तर, नुकतच त्याच्या नाटकावर पडदा पडला आहे. साऊथ आफ्रिकेत त्याच्या मुसक्या आवळण्यात आल्या. आम्ही एवढं त्याच्याबद्दल सांगतोय पण त्याचं नाव काय ? त्याचं नाव समजू शकलेलं नाही. तो साऊथ आफ्रिकेच्या waZulu-Natal या विद्यापीठात शिकतो एवढी माहिती मिळाली आहे.

या कामात तो एकटा नव्हता. लिमोझिन ही पॉश कार चालवणारा त्याचा एक मित्र होता. तो मित्र त्याला प्रत्येक KFC ब्रँच पर्यंत आणून सोडायचा. आता लिमोझिन मधून उतरणारा गडी खोटा कसा असेल ? या समजुतीनेच KFC कर्मचारी फसले.

तर, हा ठग सोशल मिडीयावर भलताच हिरो ठरला आहे. त्याने वर्षभर KFC चुना लावला यासाठी त्याचं कौतुक होतंय. काही लोकांनी तर म्हटलंय की “त्याने एवढी फूड “टेस्टिंग” केलं आहे की त्याला आता KFC ने नोकरी द्यायला हवी.”

मंडळी, तुम्ही काय म्हणाल या ठगाबद्दल ??

 

आणखी वाचा :

'फूड चेन' : 'केएफसी' आणि केएफसीला जन्म देणाऱ्या आजोबांची गोष्ट !!

सबस्क्राईब करा

* indicates required