computer

ऑस्करचं मराठी कनेक्शन...ऑस्करच्या सर्वोत्कृष्ट परदेशी सिनेमात या मराठी दिग्दर्शकाचं योगदान !!

आज ऑस्कर पुरस्कार सोहळा पार पडला. यावर्षी ‘रोमा’ या स्पॅनिश सिनेमाची सर्वात जास्त चर्चा होती. फारच कमी वेळा असं झालंय की इंग्रजी भाषेत नसलेला सिनेमा हॉलीवूडच्या मुख्य प्रवाहातल्या पुरस्कारासाठी निवडण्यात आला आहे आणि त्यासोबतच सर्वोत्कृष्ट परदेशी सिनेमासाठी पण निवडण्यात आला आहे. बऱ्याच वर्षानंतर रोमाला हा मान मिळाला.

ऑस्करचा आजवरचा इतिहास सांगतो की या दोन्ही कॅटेगरीत जर सिनेमा निवडला गेला असेल तर दोघांपैकी एक पुरस्कार तर ठरलेलाच असतो. झालंही तसंच. सर्वोत्कृष्ट परदेशी चित्रपटाचा पुरस्कार रोमाला मिळाला आहे. सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन आणि छायाचित्रणाचा पुरस्कारही रोमाने पटकावला आहे.

रोमाबद्दल एवढं सगळं सांगण्याचं कारण म्हणजे रोमाचं आणि मराठीचं एक खास कनेक्शन आहे.  रोमा सिनेमाच्या निर्मितीत आपल्या महाराष्ट्राच्या ‘चैतन्य ताम्हाणे’ या नवोदित दिग्दर्शकाचा वाटा आहे. तुम्हाला चैतन्य ताम्हाणे कोण हे सहसा आठवणार नाही. कोर्ट सिनेमा आठवतोय ना? चैतन्य ताम्हाणे त्या कोर्टचा दिग्दर्शक.  चैतन्यने कोर्ट  सिनेमा तयार करून जगभरातले १८ पेक्षा जास्त पुरस्कार पटकावले होते. एवढंच काय, भारतातर्फे ऑस्करसाठी पाठवलेला सिनेमादेखील ‘कोर्ट’ होता.

आता पाहूया चैतन्य ताम्हाणे आणि रोमाचं कनेक्शन काय आहे ते. 

रोलेक्स या प्रसिद्ध कंपनीतर्फे एक आगळीवेगळी गुरु-शिष्य संकल्पना राबवली जाते. या संकल्पनेत एका नवोदित कलाकाराला एका प्रसिद्ध कलाकारासोबत वर्षभर काम करण्याची संधी मिळते. यासाठी वेगवेगळ्या कॅटेगरीज आहेत. सिनेमा, साहित्य, संगीत इत्यादी क्षेत्रातील नवोदित निवडले जातात.

या संकल्पनेचा मुख्य उद्देश हा नवीन दमाच्या कलाकारांना नावाजलेल्या व्यक्तींचं काम जवळून पाहता यावं आणि त्यातून शिकता यावं हा आहे. या नवोदितांना वर्षभरात एका नव्या कलाकृतीचा भाग होता येतं. यासाठी गुरु आणि शिष्यांना योग्य ती रक्कमही दिली जाते. 

तर, याच संकल्पनेअंतर्गत सिनेमा क्षेत्रासाठी महाराष्ट्राच्या चैतन्य ताम्हाणे याची निवड करण्यात आली होती. निवड झाल्यानंतर त्याला दिग्दर्शक ‘अल्फॉन्सो क्वारॉन’ यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली. वर्षभर चैतन्य ताम्हाणे याने अल्फॉन्सो क्वारॉन यांच्या नव्या ‘रोमा’ या सिनेमावर काम केलं. चैतन्य ताम्हाणे याच्या या नव्या अनुभवावर रोलेक्सने डोक्युमेंट्री पण तयार केली आहे. 

रोमा सिनेमाचा एक किस्सा असा आहे की या सिनेमाची पटकथा सिनेमावर काम करणाऱ्या कोणाकडेही नव्हती. एवढंच काय सिनेमातल्या कलाकारांकडेही नव्हती. स्क्रिप्ट होती ती फक्त चैतन्य ताम्हाणे आणि अल्फॉन्सो क्वारॉन यांच्याकडे. अशा या वेगळ्या पद्धतीने सिनेमा आकार घेत गेला. 

तुम्ही जर रोमा पहिला तर तुम्हाला कोर्ट सिनेमा नक्कीच आठवेल. स्वतः अल्फॉन्सो क्वारॉन यांनी रोमा सिनेमावर असलेला कोर्टचा परिणाम मान्य केला आहे.  

तर मंडळी, अशा प्रकारे मराठी माणसाने ऑस्करवर आपली भक्कम छाप सोडली आहे. यानिमित्ताने एक नवीन माहिती सांगतो. चैतन्य ताम्हाणे लवकरच नवीन सिनेमा घेऊन येत आहे. हा सिनेमा भारतीय शास्त्रीय संगीतावर आधारित असेल.

सबस्क्राईब करा

* indicates required