computer

ही मांजर चक्क २१,०००,०००,००० रुपयांची मालकीण आहे??? नक्की प्रकरण काय आहे??

काही दिवसांपूर्वी जर्मन डायरेक्टर कार्ल लेजरफेल्ड यांचं निधन झालं. त्यांना कुणीही अपत्य नाही आणि त्यांची संपत्ती तर अपार-अमाप आहे. आता त्यांच्या या कऱोडोंच्या संपत्तीचा वारस कोण असेल मग? तुम्हाला वाटत असेल ते त्यांच्या एखाद्या नातेवाईकाला आपली संपत्ती देऊन गेले असतील. तर नाही मंडळी!! कार्ल लेजरफेल्ड यांच्या संपत्तीचा पुढचा वारसदार असणार आहे, त्यांची पाळलेली मांजर शूपेट! चकित झालात ना? पण हे अगदी खरे आहे मित्रांनो. तुम्हाला आता प्रश्न पडला असेल की अशी काय या मांजरीची खासियत आहे की एवढा मोठा माणूस त्याची संपत्ती तिच्यासाठी सोडून जातो? तर आम्ही तुम्हाला तेच सांगणार आहोत मंडळी!!

तसं पाहायचं तर गेल्या सात- आठ वर्षांपासून शूपेट प्रसिद्धीच्या झोतात आहे.   तिची देखभाल करण्यावर कोट्यवधी रुपये खर्च करण्यात येत होते. तिला सांभाळायला, तिचा मेकप करायला, उन्हं खायला न्यायला  अशा सगळ्या कामासाठी मोलकरणी आहेत. आपल्या घरी स्वयंपाकाला एक आणि कपडे-भांड्याला दुसरी अशा दोन बायका कामाला येत असल्या तरी लोक कौतुकानं सांगतात आणि या वाघाच्या मावशीची थेरं पाहा!!   तर, बऱ्याच लोकांना वाटत होतं की तिच्या मालकाच्या मृत्यूनंतर शूपेटच्या या श्रीमंती थाटात जगण्यावर बंधने येतील. पण तसं होणार नाही हो..  कारण आपल्या मृत्युआधी कार्ल सांगून गेले आहेत, 'शूपेट भाग्य घेऊन आली आहे, त्याचे कारण आहे तिचे केसाळ शरीर !' आणि म्हणून कार्ल तिच्यासाठी तब्बल ३०० मिलियन डॉलर्सची इस्टेट सोडून गेले आहेत. ३०० मिलियन डॉलर्स म्हणजे ७० रुपयांचा डॉलर जरी म्हटला तरी २१,०००,०००,००० रुपये हो!!! एकम-दहम-शतम.. करत बसलो तरी एवढ्या पुढची रक्कम आपण कधी मोजली नसेल. आणि  विचार करा मंडळी की ही एवढी भली मोठ्ठी रक्कम होणार आहे  एका मांजरीच्या नावे!!  

आपल्या पाळीव प्राण्याच्या नावे संपत्ती सोडून जाणं आपल्याकडे ऐकिवात नाही, पण  उघड-उघड  किंवा गुप्तपणे आपल्या पाळीव प्राण्यांच्या नावे इस्टेट सोडून जाण्याचा परदेशात पायंडा पडलाय. आपल्यासारख्या मुलाबाळांसाठी किती कमवू आणि किती नको असा विचार करणाऱ्या देशात पाळीव प्राण्यांसाठी संपत्ती  सोडून जाणं म्हणजे 'काय येडे लोकं आहेत हे,' असाच विचार येईल. पण तसे नाही आहे मंडळी . त्या श्रीमंतांचा आपल्या पाळीव प्राण्यांवर मुलांसारखाच जीव जडलेला असतो. तर कार्ल यांच्या मृत्यूपत्रानुसार शूपेट ही टोरासो या मांजरीला मागे टाकून जगातली सर्वात श्रीमंत मांजर बनेल. जग कुठे चाललंय बघा मंडळी,  मांजरींमध्ये श्रीमंत कोण याची स्पर्धा लागायला लागली.  त्या टोरासो या मांजरीची  मालकीण  मारिया असंता या इटालियन रिअल इस्टेट मधील बिजनेसवुमन होत्या. त्यांनी पण त्यांची सम्पत्ती त्यांच्या मांजरीच्या नावे केली होती. आता शूपेट पण त्या रांगेत जाऊन बसली आहे. एवढंच नाही मंडळी २०१५ मध्ये तीची संपत्ती ३ मिलियन युरोएवढी होती. 

या मांजरीची आणि कार्ल यांची भेट होण्याचा किस्सासुद्धा रंजक आहे. शूपेट ही मुळात कार्ल यांच्या मित्राची मांजर होती.  ते मित्र एकदा कामानिमित्त बाहेर गेले असताना शूपेटला कार्लकडे सोडून गेले. जेव्हा तो दोन आठवड्यानंतर तिला घेण्यासाठी आला तेव्हा कार्ल यांनी त्यांना सांगितले कि शूपेट तुला परत मिळणार नाही.  त्या मित्राने नंतर दुसरी मांजर पाळली. ती मांजर नंतर लठ्ठ झाली आणि शूपेट जगातली सर्वात प्रसिद्ध मांजर बनली. आणि आतातर शूपेट जगात सर्वात श्रीमंत मांजर असणार आहे. शूपेट फक्त तिच्या मालकाच्या श्रीमंतीमुळे श्रीमंत झालीय असं समजू नका.ती स्वतः कोट्यावधी रुपये कमवते. काय म्हणता, मांजर कोट्यवधी कमवते? हो कारण ही मांजर साधीसुधी नाही मंडळी. तीने  गेल्यावर्षी दोन नोकऱ्या केल्या. त्यातूने तिने    ३ मिलियन युरो म्हणजेच रुपयांत बोलायचं तर  २४ कोटी रुपये  एवढी कमाई केली. एक नोकरी  होती जर्मन कार कंपनीसाठी आणि दुसरी जपानी ब्युटी प्रोडक्टसाठी. कार्ल तिला खाद्यपदार्थांच्या जाहिराती करू द्यायचे नाहीत.  त्यांना शूपेट त्या कामासाठी सूट होणार नाही असे वाटायचे. तर या बाईंचं मॉडेलिंग करीअर भारी चाललंय आणि त्यांचं स्वत:चं बँक अकाऊंटसुद्धा आहे. 

शूपेट तिच्या इंस्टाग्रामवर सुद्धा नेहमी ऍक्टिव्ह असते. एकदा तिने लिहिले होते 'मला माझ्या संपत्तीबद्दल विचारू नका.  ते मी जेव्हा फोर्ब्स मला विचारेल तेव्हाच सांगेन'. काय attitude आहे राव! तिच्या सातव्या वाढदिवशी तर तिने कायली जेन्नरलाच आव्हान दिले होते. तर मंडळी एक मांजर फोर्ब्सच्या कव्हरवर असेल याच्या पेक्षा रंजक गोष्ट तुम्ही आजवर पाहिली नसेल नाही का?

पण... पण इतकं होऊनसुद्धा शूपेट जगातला सर्वात जास्त श्रीमंत पाळीव प्राणी नाहीय!! गन्थर (चौथा) या नावाचा जर्मनीतला जर्मन शेफर्ड जातीचा कुत्रा ३७५ मिलियन डॉलर्स इतक्या इस्टेटीचा वारस आहे. शूपेट आणि या चौथ्या गन्थरमध्ये तब्बल ५३२ कोटी रुपये  इतक्या रकमेचा फरक आहे. 

सध्याच्या कार्लच्या देशाच्या कायद्याप्रमाणे एखादा पाळीव प्राणी तुमच्या इस्टेटीचा वारस असू शकत नाही. पण कार्लने नक्की यातूनहे काही पळवाट काढली असणार आहे याबद्दल शंका नाही.  तर आता कार्ल गेल्यानंतर शूपेट आणि तिच्या संपत्तीची तीन लोकं देखरेख करतील. एक वरच्या लेवलचा ट्रस्टी,  दुसरा शूपेटची देखभाल करणारा आणि तिसरा या दोघांना सल्ले देणारा. 

तुम्हाला शूपेटची हि गोष्ट आवडली असेल तर तुमच्या मित्रांना जरूर शेयर करा. आणि शूपेटसारखी तुमची मांजर पण सुंदर असेल तर तिचे फोटो कॉमेंट बॉक्समध्ये जरूर टाका.

सबस्क्राईब करा

* indicates required