computer

ऑस्कर २०२१: कोरियन अभिनेत्रीला मिळालेला पहिलावहिला पुरस्कार ते इतर विजेते !!

हॉलिवूडचा सर्वात मानाचा समजला जाणारा अकादमी पुरस्कार अर्थात ऑस्कर अवॉर्ड विजेत्यांची घोषणा काल करण्यात आली. दरवर्षी खूप मोठ्या प्रमाणात वाजत गाजत हा सोहळा संपन्न होतो, परंतु करोनाच्या सावटामुळे यंदाच्या म्हणजे ९३व्या ऑस्कर सोहळ्यात ना होस्ट होता, ना प्रेक्षक. लॉस एंजेलिसच्या डॉल्बी थिएटरमध्ये हा सोहळा रंगला. १ जानेवारी २०२० ते २८ फेब्रुवारी २०२१ दरम्यान रिलीज झालेल्या उत्कृष्ट चित्रपटांमध्ये ही स्पर्धा रंगते. विशेष म्हणजे या वर्षी कोरियाच्या युह-जंग युनने ऑस्कर पुरस्कार जिंकला आहे. ऑस्कर पुरस्कार जिंकणारी ती पहिली कोरियन महिला ठरली आहे. अजून कोणाला पुरस्कार मिळाले आहेत याची माहिती आपण घेऊयात.

(युह-जंग युन)

कोरियाच्या युह-जंग युनने ‘मीनारी’ या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा ऑस्कर जिंकला आहे. ७३ व्या वर्षी तिने हा जिंकून इतिहासच घडवला आहे. सुरुवातीलाच सांगितल्याप्रमाणे हा पुरस्कार जिंकणारी ती पहिली कोरियन महिला ठरली आहे. तिने ‘मीनारी’ चित्रपटात आजीची भूमिका साकारली होती. या चित्रपटाला ऑस्करमध्ये तब्बल ६ प्रकारात नामांकन मिळालं आहे. चित्रपटात इंग्रजीसोबत कोरियन भाषा मोठ्याप्रमाणात वापरण्यात आली आहे.

कोरियामध्ये साधारण कोथिंबीरी सारखी दिसणारी वनस्पती आढळते. या वनस्पतीचं नाव आहे मिनारी. चित्रपटाला हेच नाव देण्यात आलं आहे. आता मिनारीच का तर ते समजून घेण्यासाठी तुम्हाला चित्रपट पूर्ण पाहावा लागेल. आपण या चित्रपटाची कथा थोडक्यात समजून घेऊया. 

मिनारीची कथा ही १९८० च्या दशकात कोरियाहून अमेरिकेला स्थलांतरित झालेल्या कुटुंबाची आहे. जेकब आणि मोनिका या जोडप्याला अँनी नावाची मुलगी आणि सहा वर्षाचा डेव्हिड नावाचा मुलगा, अशी दोन मुले आहेत. ही मुले अमेरिकन संस्कृतीत वाढलेली आहेत. जेकब आणि मोनिका चिकन सेक्सियर आहेत. मोनिकाला अमेरिकेसारख्या मोठ्या देशात राहायचे असते. पण जेकबला मात्र गावी शेती करायची असते. त्यासाठी तो कुटुंबाला घेऊन कॅलिफोर्नियातुन आर्कान्सा या गावात येतो.

स्वतःच्या स्वप्नामागे धावणारा जेकब आणि पारंपरिक पत्नीप्रमाणे नवऱ्यासाठी कौटुंबिक तडजोडी करणारी मोनिका या दोघांमधील संघर्ष या चित्रपटात आहे. युह-जंग युनने यात आजीची समंजस भूमिका साकारली आहे. हा चित्रपट भारतात १६ एप्रिलला रिलीज झाला आहे. युह-जंग युनला जेव्हा नॉमीनेशन झाले तेव्हाच खूप आनंद झाला होता. प्रत्यक्ष जिंकल्यावर तर त्यांना आधी विश्वास बसला नाही आणि त्या भावुक झाल्या. गेली अनेक दशके त्या कोरियन टीव्ही आणि चित्रपटात काम करत आहेत. आंतरराष्ट्रीय चित्रपटात हे नामांकन मिळणे त्यांच्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे. कोरियात त्यांना पुरस्कार मिळाल्यावर त्यांचे खूप कौतुक होत आहे.

स्रोत

या सोहळ्यात भारताच्या वाट्याला काही भावुक क्षण आले. बॉलिवूड अभिनेता दिवंगत इरफान खान, सुशांतसिंग राजपूत, ऋषी कपूर आणि प्रख्यात वेशभूषाकार दिवंगत भानू अथय्या यांना या सोहळ्यात श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

आता आणखी कोणाकोणाला पुरस्कार मिळालेत याची यादी पाहूयात..

सर्वोत्कृष्ट चित्रपट: Nomadland
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री: फ्रान्सिस मॅकडॉर्मांड
सर्वोत्कृष्ट अभिनेता: अँथनी हॉपकिन्स
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीः युह-जंग युन
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता: डॅनियल कालुया

(डॅनियल कालुया)

सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक: क्लो झाओ
सर्वोत्कृष्ट मूळ पटकथा: Promising Young Woman
सर्वोत्कृष्ट रुपांतरित पटकथा:  The Father
सर्वोत्कृष्ट अ‍ॅनिमेटेड सिनेमा : Soul

सर्वोत्कृष्ट माहितीपट:  My Octopus Teacher
सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय फीचर : Another Round
सर्वोत्कृष्ट गाणे: Judas and the Black Messiah मधील “Fight for You”
सर्वोत्कृष्ट व्हिज्युअल इफेक्ट: Tenet
सर्वोत्कृष्ट चित्रपट संपादन: Sound of Metal

सर्वोत्कृष्ट मेक-अप आणि केशरचना: Ma Rainey’s Black Bottom
सर्वोत्कृष्ट माहितीपट (लघु) : Colette
सर्वोत्कृष्ट प्रोडक्शन डिझाईन - Mank
सर्वोत्कृष्ट मूळ स्कोअर: Soul
सर्वोत्कृष्ट चित्रपटसृष्टी: Mank
सर्वोत्कृष्ट वेशभूषा: Ma Rainey's Black Bottom

सर्वोत्कृष्ट प्रोडक्शन डिझाईन: Mank
सर्वोत्कृष्ट live action short : Two Distant Strangers
सर्वोत्कृष्ट अ‍ॅनिमेटेड शॉर्ट:  If Anything Happens I Love You
जीन हर्षोल्ट मानवतावादी पुरस्कार: टायलर पेरी

भारतात यावर्षी अगदी मोजके चित्रपट रिलीज झाले. सगळे वातावरण निवळल्यावर पुढच्या वर्षी मोठ्या स्क्रिनवर अनेक दर्जेदार चित्रपट पहायला मिळतील अशी अपेक्षा करूया.

 

लेखिका: शीतल दरंदळे

सबस्क्राईब करा

* indicates required