computer

रणवीर सिंगने घेतलाय डब्ल्यूडब्ल्यूईच्या ब्रॉक लेसनरसोबत पंगा. वाचा काय आहे हे प्रकरण?

सगळ्यात अतरंगी कपडे घालणारा माणूस कोण, याचं उत्तर द्यायला तुम्हांला एक सेकंदही लागणार नाही. तो मान एकाच माणसाकडे जातो-  रणवीर सिंग!! तो कुठल्या वादात शक्यतो अडकत नसला तरी भाऊवर नेहमी टीका होत असते. मध्यंतरी एका कार्यक्रमात फॅन्सच्या अंगावर उडी मारल्याने रणवीरने आता हे बालिश चाळे सोडावेत अशा प्रतिक्रिया सोशल मीडियावर उमटल्या होत्या. मंडळी,  असे म्हणतात की लग्न झाल्यावर माणुस सुधारतो.  पण रणवीरभाऊ लग्न झाल्यानंतर जास्तच धुमाकूळ घालत आहे. वेळोवेळी त्याच्या कपड्यांवरून बनलेले मिम्ससुद्धा वायरल होत असतात. मंडळी रणवीर एका इंटररव्ह्यूत म्हणाला होता, "जगाला फाट्यावर मारून आपल्याला जे योग्य वाटते तेच करायचे."  पण हा आगाऊपणा आता त्याला महागात पडण्याची शक्यता आहे. यावेळी त्याने मोठा पंगा घेतला आहे राव!! तो पण साध्या सुध्या माणसासोबत नाही, तर चक्क जॉन सेना सारख्या रेसलरला रक्तबंबाळ करणाऱ्या आणि सध्या डब्ल्यूडब्ल्यूई फॅन्सच्या गळ्यातला ताईत असलेल्या "ब्रॉक लेसनर"सोबत!!

आता काय रणवीरची खैर नाही राव!! ब्रॉक लेसनरसारख्या पहाडाशी पंगा घेतला म्हणजे रणवीरला किती महागात पडेल हे सांगण्याची गरज नाही. पण तुम्ही म्हणाल रणवीरने असे काय केले की चक्क ब्रॉक लेसनर रणवीरच्या मागे लागला? तर मंडळी, वाचा हे सविस्तर प्रकरण..

रणवीर भाऊ सध्या इंग्लंडमध्ये हवा करतोय. तुम्हाला वाटत असेल हा गडी इंग्लंडमध्ये फिरायला किंवा वर्ल्डकप बघायला गेला असेल आणि तिथेच त्याच्याकडून ब्रॉकअण्णाशी पंगा घेतला गेला असेल.  अहं, असं नाहीय.  रणवीर सध्या इंग्लंडमध्ये त्याच्या '83' या स्पोर्ट्सवर बनत असलेल्या सिनेमाच्या शूटिंगसाठी गेला आहे. पण तिथे त्याच्याकडून एक चूक झाली आणि ब्रॉकअण्णाला त्या गोष्टीचा जाम राग आलाय राव!! आता ती चूक त्याने जाणून बुजून केली की चुकून त्याच्याकडून ती गोष्ट घडली हे रणवीरलाच माहीत.  पण त्यामुळे ब्रॉकअण्णाने चक्क रणवीरवर केस ठोकण्याची तयारी केली आहे. 

मंडळी, ब्रॉक लेसनरसोबत रिंगध्ये येणारा एक सुटाबटातला गडी तुम्ही पाहिला असेल.  हा भाऊ लई पाताळयंत्री माणूस आहे हेही तुम्हाला माहीत असेलच. जेव्हाजेव्हा ब्रॉक मार खायला लागतो,  तेव्हा हा रिंग बाहेरून ब्रॉकला असा काय चेतवतो कि ब्रॉकअण्णा समोरच्या माणसाला रक्तबंबाळ करून टाकतो. तर या पठ्ठ्याचे नाव आहे पॉल हेमन!! हा भाऊ ब्रॉकचा सल्लागार, असिस्टंट, मॅनेजर आणि वकीलसुद्धा आहे. 

मंडळी डब्ल्यूडब्ल्यूईच्या रेसलर्सची काही ना काही स्टाईल असते. विशेषत: तसेच ते फाईट करायला आले की त्यांचे फॅन्स काही ना काही डायलॉग बोलून त्यांना प्रोत्साहित करत असतात.  जॉन सेनाचा "यु कान्ट सी मी"  हा डायलॉग प्रसिद्ध आहे.  तसाच इतर रेसलर्सचाही काही ना काही  डायलॉग असतो. ब्रॉकअण्णा फायटिंगला आल्यावर पॉल ब्रॉकला प्रोत्साहित करण्यासाठी जोरजोरात 'इट, स्लिप, काँकर, रिपीट' असे ओरडत असतो.  तर मंडळी, अशाप्रकारच्या डायलॉग्जवर त्या-त्या रेसलरचा कॉपीराईट असतो आणि जर का तो दुसरा कोणी वापरला तर त्यावर हे गडी थेट केस ठोकत असतात. आता आपल्या रणवीरभाऊने पण तीच चूक केली ना राव!! केली तर केली, थेट ब्रॉकअण्णाशी पंगा घेतला. 

या डायलॉगशी ब्रॉकअण्णाचे भावनिक नाते आहे मंडळी. तुम्हाला माहीत असेल 2003 मध्ये ब्रॉक लेसनरने डब्ल्यूडब्ल्यूई सोडले होते. पण जेव्हा तो परत आला, तेव्हा हाच डायलॉग त्याला लढायला प्रोत्साहित करत असे. एवढेच नाहीतर त्याच्या कपड्यांवर पण हेच शब्द लिहिलेले असतात. तर रणवीरभाऊने हा डायलॉग थोडासा फिरवून वापरला आहे. तुम्हाला वाटत असेल त्याने हा डायलॉग स्वतः साठी वापरला असेल, तर तसेही नाहीये मंडळी!! रणवीरने हा डायलॉग हार्दिक पंड्यासाठी वापरला आहे. हार्दिकभाऊ पण सध्या वर्ल्डकप गाजवत आहेत. म्हणून त्याला प्रोत्साहित करावे म्हणून रणवीरने 'इट, स्लिप, डोमीनेट, रिपीट याचे दुसरे नाव म्हणजे हार्दिक पंड्या' असे ट्विट केले. हे ब्रॉकचा मॅनेजर आणि वकिल असलेल्या पॉलच्या लक्षात आल्यावर त्याने रणवीरला चक्क धमकीच देऊन टाकली. त्याने ट्विट करून सांगितले कि या डायलॉगवर ब्रॉकचा कॉपीराईट आहे. म्हणून हे ट्विट तुला कोर्टात खेचू शकते. 

 

. @RanveerOfficial
ARE YOU F'N KIDDING ME???????????
1 - It's Eat Sleep CONQUER Repeat
2 - Copyright #YourHumbleAdvocate and @BrockLesnar
3 - I am litigious
4 - EAT SLEEP DEPOSITION REPEAT https://t.co/yppZe129eZ

— Paul Heyman (@HeymanHustle) June 19, 2019

मंडळी, पॉल ब्रॉकचा जवळचा माणूस असल्याने एक प्रकारे ही धमकी ब्रॉकअण्णानेच दिली असल्याचे बोलले जात आहे. आता यावर रणवीरभाऊ काय उत्तर देतो ते पाहणे मजेशीर ठरणार आहे.