वाचा, हा २५६ वर्षांचा माणूस मरताना काय म्हणाला !!

वाढदिवशी दीर्घायुशी हो म्हटलं जातं, कोणाची तरी आठवण काढत असताना तीच व्यक्ति समोर आली की तुला १०० वर्ष आयुष्य आहे असं म्हटलं जातं, मंडळी हे सर्व फक्त बोलण्या पर्यंतच, सध्याच्या काळात खरं आयुष्य म्हणजे ६०-७० वर्षांपर्यंत आक्रसलंय. मंडळी आज आम्ही अश्या एका माणसा बद्दल तुम्हाला सांगणार आहोत ज्याला “दीर्घायुशी हो” हा वरदान खऱ्या अर्थाने लागू झालाय. या माणसाचं वय होतं तब्बल २५६ वर्ष !! हो हो तुम्ही बरोबर ऐकलंत !! खरं वाटत नाही ना ? चला मग जाणून घेऊ काय आहे त्याची कहाणी !!
चीन मध्ये राहणाऱ्या ‘ली-चिंग यूएन’ या माणसाची हि गोष्ट. यांचा जन्म चीन मधल्या शेजिया शहरात १६७७ साली झाला म्हणजे थेट शिवाजी महाराजांच्या काळात बरं का. १९३३ मध्ये जेव्हा ते वारले तेव्हा त्यांचं वय होतं २५६.
ली-चिंग यांनी वयाच्या अवघ्या १० व्या वर्षी वनऔषधी विकण्याचं काम सुरु केलं. त्यांना मार्शल आर्टचंही ज्ञान होतं त्यामुळे वयाच्या ७१ व्या वर्षी मार्शल आर्ट शिकवण्यासाठी चायनीज आर्मी मध्ये ते भरती झाले. ज्या वयात माणसाला लहान सहन कामासाठी दुसऱ्याच्या आधाराची गरज भासू लागते त्याच काळात हे महाशय चक्क मार्शल आर्ट्स शिकवत होते.
१९३० सालच्या न्यूयॉर्क टाइम्सच्या बातमीनुसार ली-चिंग हे २५६ वर्षांचे होते. त्याच्या वयाचा पहिला पुरावा शोधून काढला ते ‘चेंगाडू’ विद्यापीठाचे त्याकाळातील प्राध्यापक वू- चुंग- चियाह यांनी. चायनीज सरकारने ली-चिंग यांना १५० व्या जन्मदिवशी १८२७ साली शुभेच्छा दिल्याचं त्यात आढळून आलं होतं. त्या शिवाय २०० व्या वाढदिवशी सुद्धा शुभेच्छा दिल्याचचं कागदपत्रात नमूद आहे. चीन सरकारच्या दप्तरी याबद्दल पुरावे आढळतात. टाइम्स मधल्या लेखानुसार ली-चिंग यांच्या शेजारी राहणाऱ्या एका वृद्ध माणसाने सांगितलं होतं की ‘मी जेव्हा लहान होतो तेव्हा ली-चिंग हे आधीच वयाने भरपूर मोठे होते.’
एवढ्या मोठ्या आयुष्याचं ‘सिक्रेट’ काय ?
वनऔषधी तज्ञ म्हणून काम करताना त्यांनी आपलं आरोग्य उत्तम सांभाळलं होतं. चीन भागातल्या कान्सू, शन्सी, तिबेट, अनाम, सिआम, मंचुरिया या भागात वनऔषधीचं त्यांना पूर्ण ज्ञान होतं. जोडीला मार्शल आर्ट मध्ये पारंगत असल्याने ली-चिंग यांना निरोगी राहण्यास मदत झाली. यादरम्यान त्यांनी रोजच्या खाण्याकडे विशेष लक्ष दिलं आणिआपला आहार निश्चित केला होता. धक्कादायक बाब म्हणजे असं म्हटलं जातं की ली-चिंग हे एकदा तब्बल ५०० वर्ष वयाच्या एका माणसाला भेटले होते आणि याच माणसाने ली-+चिंग यांना दीर्घायुष्याचा फंडा सांगितला. किगोंग नावाच्या व्यायामाबद्दल या माणसाने सांगितलं ज्यामुळे आपलं आयुष्य वाढतं.
२५६ वर्षांच्या काळात त्यांनी २३ वेळा लग्न केलं आणि २०० मुलांना जन्म दिल्याचं म्हटलं जातं. यादरम्यान त्यांच्या घरातील २५ पिढ्या लहानाच्या मोठ्या झाल्या.
ली-चिंग यांचा १९२७ मधील फोटो (स्रोत विकिपीडिया)
मरताना त्यांचे अखेरचे शब्द काय होते ?
“मन शांत ठेवा, कासवासारखं बसा, कबुतराप्रमाणे चाला आणि कुत्र्यासारखं झोपा” हे होते ली-चिंग यांचे अखेरचे शब्द. याचा सरळ सोप्पा अर्थ म्हणजे ‘दिलखुलास जगायचं, खायचं-प्यायचं, चांगली झोप घ्यायची आणि टेन्शन घ्यायचं नाहीं’
तुम्ही या गोष्टींवर विश्वास ठेवा अगर नका पण या वृद्ध माणसाने आरोग्यासाठी जे पथ्य पाळलं ते आजही आपल्या सर्वांना लागू पडतं हेच खरं.