f
computer

असे पाच अविश्वसनीय आजार ज्यावर तुमचा विश्वासच बसणार नाही !!

या जगात नानाविध प्रकारची माणसे राहतात. प्रत्येकाची शारीरिक वैशिष्ट्ये वेगवेगळी असतात. आपल्याकडे ‘व्यक्ती तितक्या प्रकृती’ अशी एक म्हण आहे. ही म्हण किती सार्थ आहे याची खात्री तुम्हाला या लेखातून पटेल…

आपल्याला सर्दी ताप खोकला असे साधारण आजार होतच असतात. कधी यापेक्षा जास्त त्रासदायक आजारही होतात आणि आपण त्या वेळी डॉक्टरांकडे धाव घेतो. या परिचित रोगांपेक्षा वेगळे असे काही रोग या जगात अस्तित्वात आहेत हे तुम्हाला माहीत आहे का? आज आम्ही सांगणार आहोत काही अतिशय विचित्र आणि वेगळे आजार ज्यावर तुमचा चटकन विश्वास बसणार नाही… पण होय! ते अस्तित्वात आहेत!

1. Auto-Brewery Syndrome (पोटात आपोआप अल्कोहोल तयार होण्याचा आजार)

आपल्यापैकी अनेकांना दारू पिल्यानंतर त्रास होतो, सकाळी डोकं जड पडतं, उलटी येते. पण ऑटो ब्रिवरी आजार असणाऱ्या लोकांना मात्र हा त्रास नेहमीच आणि दारू न पिताही सहन करावा लागतो. हा असा विचित्र आजार आहे जो पोटात आपोआप अल्कोहोल तयार करतो. कर्बोदके असलेले अन्नपदार्थ खाल्ल्यास हा आजार असणाऱ्या मनुष्याच्या पोटात इथेनॉल तयार होते आणि त्याचा परिणाम पूर्ण शरीरावर होतो जसा अतिमद्यपान केल्यानंतर होतो अगदी तसाच! जठरात असलेल्या एका यीस्टचा हा प्रताप आहे… हे यीस्ट कर्बोदकांचे फरमेन्टेशन करून त्याचे इथेनॉलमध्ये रूपांतर करते. परंतु, आहारात कर्बोदके कमी आणि प्रथिने जास्त ठेवल्यास काही प्रमाणात या आजारावर नियंत्रण ठेवता येते.

2. Foreign Accent Syndrome (परकीय भाषा बोलण्याचा आजार)

कल्पना करा, तुम्ही महाराष्ट्रात जन्मला आहात, नेहमी मराठी बोलता आणि एक दिवस तुमच्या डोक्यात काहीतरी मोठा आघात झाल्यास तुम्ही अचानक परदेशी भाषा बोलू लागता… हे शक्य आहे का? होय, हे शक्य आहे… ही सिनेमाची स्टोरी नसून हे वास्तव आहे! मेंदूवर जोराचा आघात झाल्यास एका विशिष्ट भागाला नुकसान पोचले तर त्याचा परिणाम असा होऊ शकतो. अभ्यासकांच्या मतानुसार, हा जरी शारीरिक आजाराचा प्रकार असला तरी काहीवेळा मानसिक रोगाचा परिणाम सुद्धा असू शकतो. पुरुषांपेक्षा महिलांमध्ये हा आजार जास्त प्रमाणात आढळून येतो. तसेच, 25 ते 49 या वयोगटात याचे प्रमाण जास्त दिसून येते. 

3. Fish Odor Syndrome (अंगाला माश्याचा वास येण्याचा आजार)

काही लोकांच्या अंगाला सडलेल्या माश्यांचा वास येतो. त्यांच्या घामाला, श्वासाला आणि लघवीला हा तीव्र दर्प नेहमीच येत असतो. हा वास येण्याचे कारण म्हणजे शरीर ‘ट्रायमिथिलामाईन’ या कंपाउंडचे विघटन करू न शकणे हे होय. वासाची तीव्रता व्यक्तिपरत्वे बदलत असली तरी आपसपास वावरणाऱ्या इतर लोकांना याचा त्रास होतो. त्यामुळे हा आजार असणाऱ्या व्यक्तींच्या दैनंदिन जीवनावर परिणाम होतो. अश्या व्यक्ती समाजात मिसळण्यास घाबरतात आणि एकटे राहणे पसंत करतात. कधी कधी यांना नैराश्य सुद्धा येते आणि त्याचा मानसिक स्थितीवर वाईट परिणाम होतो. हा आजार असणाऱ्या व्यक्तींनी आत्महत्या केल्याची उदाहरणे सुद्धा घडली आहेत.

4. Fatal Familial Insomnia (घातक निद्रानाशाचा आजार)

आपल्याला माहीत आहेच की पुरेशी झोप न मिळाल्यास शारीरिक आणि मानसिक स्थितीवर त्याचा प्रभाव पडतो. मग आपण शांत आणि गाढ झोप घेण्यासाठी वेगवेगळे उपाय योजतो. पण दुर्दैवाने हा आजार झालेल्या काही व्यक्ती इतक्या भाग्यवान नसतात. मेंदूमध्ये झालेल्या बिघाडामुळे अश्या व्यक्तींना कितीही प्रयत्न केले तरी झोपच येत नाही. सतत जागृत अवस्थेत राहिल्याने मेंदू थकतो आणि त्याचा त्रास शरीरावर आणि मनावर होतो. हा आजार झालेल्या व्यक्ती सतत चिडचिड करत राहतात आणि त्यांच्या स्वभावाचा परिणाम कुटुंबावर तसेच इतर माणसांवर होतो. या आजारावर औषध शोधण्यास अजूनही शास्त्रज्ञांना यश आले नाही. 

5. Proteus Syndrome (शरीराची अनियंत्रित वाढ होण्याचा आजार)

हा एक दुर्मिळ आजार समजला जातो. यात शरीरातील कुठल्याही भागातील पेशी आणि उती अनियंत्रित आणि वेड्यावाकड्या पद्धतीने वाढू लागतात. फक्त त्वचा आणि हाडच नव्हे तर शरीराच्या आतले अवयव सुद्धा याचे शिकार होऊ शकतात. हा आजार जन्मतःच ओळखू येत नाही. वयाच्या 6 ते 18 महिन्यापासून याचे परिणाम दिसण्यास सुरुवात होते आणि काळानुसार ते वाढतच जातात.

सबस्क्राईब करा

* indicates required